टेकडीच्या निमित्ताने २: पाठलाग

टेकडीच्या निमित्ताने २:
पाठलाग
लेखन व चित्रे: ओजस फाटक(इयत्ता ७वी, अक्षरनंदन)

 

अश्विन किंवा कार्तिक सुरू असेल. टेकडीवर सुरवातीला मुख्य चढ आहे. नंतर जास्तीकरून सपाटच. चढ संपल्या-संपल्या मारुती मंदिर लागतं. त्यानंतर लगेच एक भिंत लागते. भिंतीपुढे वनविभागाची हद्द सुरू होते. पुढे दक्षिणमुखी मारुतीचं मंदिर. ‘म्हातोबा’चं मंदिर लागतं.

वनविभागाच्या भिंतीला पार करायला वाट सरळ आहे. पुढेही सरळच जाते ती वाट. पण भिंत ओलांडल्यावर, भिंतीला समांतर अशी डावीकडे एक पाऊलवाट जाते. गवतातून, झाडाझुडपातून. कधीकधी आम्ही तिथूनही जायचो. एकदा असेच आम्ही डावीकडच्या वाटेनी गेलो.

बरीच झुडपं होती, हिरवंगार गवत. डावीकडे काही अंतरावर भिंत आणि उजवीकडे ग्लिरिसिडिया म्हणजेच उंदिरमारीची विरळ झाडं. सुमारे ३० वर्षांपूर्वी ग्लिरिसिडियाची लागवड केली असं आई म्हणाली. आम्ही पुढे जात राहिलो.

हळूहळू झुडपं वाढत गेली. वाट वळत होती. डावी-उजवी-उजवी-डावी-डावी-उजवी-उजवी-डावी.

मागे मी सहजंच वळून पाहिलं. मला मागाचपासून पावलांच्या आवाजाची चाहूल होती. मी दोन पावलं मागे गेलो.
एक आर्मीकट (केसांचा) केलेला, घाऱ्या डोळ्यांचा इसम दृष्टीस पडला. पायात चामड्याचे बूट, काळी पॅंट व काळ्या-पांढऱ्या पट्ट्यांचा विटका शर्ट होता.

माझ्याकडे टक लावून बघत होता, मारक्या म्हशीसारखा! मी पळ काढला.

पुढे बराच वेळ तो पाठलाग करत होता. आम्हाला थोडी भिती वाटत होती. तरी तो एकटाच होता. पण कुणास ठाऊक, सुरा-बिरा असला तर!

मी तर छानपैकी डाव्या हातात एक दणकट काठी, उजव्या हातात बाभळीचे ३-४ काटे तोडून घेतले.

मी वाॅटर-ब्रेक घ्यायला थांबलो. पाणी घ्यायला सॅक काढून ठेवली, चेन उघडली. आवाज आला, बहुदा माणूस जवळ होता. मी सॅक पाठीवर चढवून, दोन्ही हातात काठ्या घेतल्याक्षणी तो दिसला. त्या वळणापाशी होता. ते पुढे येत नव्हता, आम्ही तिघे होतो.
तो आमच्याकडे बघू लागला. मग त्याचं लक्ष काठ्यांकडे गेलं. क्षणभर थांबला, आणि थोडं इकडे-तिकडे बघून तो दृष्टीआड झाला.
त्यानंतर तो पुन्हा कधीही दिसला नाही.

(क्रमश:)

या लेखनाचे डिजिटल टंकन करण्यास मदत केल्याबद्दल उदय क्षीरसागर यांचे आभार