एकदा काय झालं, सशाच्या पाठीवर पडलं पान (गोष्ट)

एकदा काय झालं, सशाच्या पाठीवर पडलं पान
लेखनः अदिती देवधर
चित्रेः आभा भागवत

एक होता ससा. सकाळपासून भरपूर पळापळ केली, इकडून तिकडे उडया मारल्या आणि आता दमून त्याच्या आवडत्या झाडाखाली तो मस्त झोपला होता. आज ऊनही छान, उबदार वाटत होतं. अधूनमधून वाऱ्याची झुळूक येत होती. 

आणि अचानक एक पान सशाच्या पाठीवर येऊन पडलं!

आता तुम्हाला वाटेल, भित्रा ससा घाबरेल आणि “आभाळ पडतंय! पळा, पळा, पळा” म्हणून सैरावैरा पळायला लागेल. 

पण नाही. आपल्या सशाला त्याच्या आजोबांनी ही गोष्ट सांगितली होती. त्यामुळे त्याला माहीत होतं की त्याच्या पाठीवर पान पडलंय, आभाळ नाही. 

त्या पानाकडे ससा बघत होता, तेवढ्यात वाऱ्याची मोठ्ठी झुळूक आली आणि आणखी पानं खाली पडली. एक पडलं सशाच्या समोर, एक पडलं सशाच्या शेजारी, आणि एक थेट आदळलं सशाच्या नाकावर. 

सशाला कळेना अचानक ही एवढी पानं आली कुठून? त्याने वर पाहिलं. आणि काय! त्याच्या आवडत्या झाडाची पाने गळत होती. एक झुळूक आली, की हीऽ एवढी पानं खाली यायची. 

“अरे, हे काय, माझ्या झाडाला होतंय तरी काय. झाडाचे असे एकेक भाग खाली का पडायला लागले? असं करत सगळं झाडच संपून गेलं तर!”  

ससा चांगलाच घाबरला. तो जन्माला आल्यापासून, म्हणजे २ महिन्यांपासून, ह्या झाडाच्या बुंध्याजवळचे त्याचे बीळ आणि हे झाड हेच त्याचं जग होतं. अगदी कालपर्यंत सगळं कसं छान चाललं होतं. आज हे अचानक काय झालं. 

एकवेळ आभाळ पडलं तरी हरकत नाही, पण हे झाड? नाही, नाही, काहीतरी केलंच पाहिजे.   

ही पडलेली पानं गोळा करून आपण परत झाडावर चिकटवली तर? मग आपलं झाड पूर्वीसारखं होईल. ही युक्ती सुचताच सशाने दोन पायांवर आनंदाने उडी मारली. 

पण एक गडबड होती. सशाला झाडावर चढताच येत नव्हतं. म्हणजे त्याने प्रयत्न केला नव्हता असं नाही. पण तो प्रयत्न कधी यशस्वी झाला नव्हता. आणि आई सुद्धा चांगलीच रागवली होती. 

तेवढ्यात सशाला त्याची मैत्रीण खारूताई दिसली. एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडया मारण्यात ती मग्न होती. खारूताईशी सशाची गट्टी होती. ती झाडावर उंच जायची आणि तिथून काय काय दिसतं ते सशाला सांगायची. 

खारूताईला बोलावून त्याने तिला युक्ती सांगितली. तिला युक्ती एकदम आवडली. 

मग दोघं मिळून कामाला लागले. सशाने पंजाने ओढून पानांचा ढीग केला. खारूताईने एक पान घेतलं आणि झाडावर चढली, एका फांदीजवळ जाऊन तिने पान फांदीला चिकटवलं. पण हे काय, पान फांदीला चिकटेच ना. 

खारूताई खाली आली आणि दुसरं पान घेऊन गेली. परत तेच. हे पानही फांदीला चिकटायला तयार नाही. त्यांच्या आवडत्या झाडाची आणखी पानं गळतच होती. ससा आणि खारूताईला रडूच आलं.

त्यांच्या रडण्याचा आवाज ऐकून झाडाच्या ढोलीतून गव्हाणी घुबडाने डोकावून बघितलं. हे घुबड खूप खूप वर्षांपासून इथे रहात होतं. सशाचे आजोबा लहान असल्यापासून आणि खारूताईच्या खापरपणजोबांपासून हे घुबड इथे होतं. 

ससा आणि खारुताईने त्यांना झाडाबद्दल सांगितलं. पानं परत झाडाला कशी चिकटवायची म्हणून विचारलं. 

घुबड खोखो हसायलाच लागलं, “अरे! हा उद्योग कशाला? पानं गळणारच”. 

ससा आणि खारूताईला काहीच कळलं नाही. 

“चला तुम्हाला गोष्ट सांगतो”, त्यांच्या गोंधळलेल्या चेहऱ्यांकडे बघून घुबड म्हणले. गोष्ट म्हणल्यावर ससा आणि खारुताई लगेच सांगा सांगा म्हणून झाडाजवळ फतकल मारून बसले. 

“हे आपलं झाड आहे ना त्याचं नाव वावळ. वावळ आहे पानगळीचा वृक्ष. पानगळीच्या वृक्षांची सगळी पानं वर्षातला काही काळ गळून जातात”, घुबड म्हणलं.   

“सगळी म्हणजे सगळी पानं”? 

“हो. सगळ्याच वृक्षांची पानं गळतात. पानगळीच्या वृक्षांची थोड्याच काळात सगळी पानं गळतात. काहींची वर्षभर थोडी थोडी गळत राहतात, त्यामुळे ते संपूर्ण निष्पर्ण होत नाहीत. ते सदाहरित वृक्ष”. 

“पण पानं गळतातच का”? सशाचा प्रश्न. 

झाडाची पानं त्याला अन्न तयार करायला मदत करतात. पण त्याच पानांच्या वाटे झाडातलं पाणी बाहेर जात असतं. आत्ता कशी छान थंडी आहे की नाही. ती संपेल आणि मग उन्हाळा सुरू होईल. उन्हाळ्यात सूर्य त्याच्या किरणांनी पाण्याचे बाष्प करून टाकतो. सगळी जमीन कोरडी होऊन जाते. आपल्यालासुद्धा पाणी मिळवायला खूप त्रास होतो. 

आपण काय मग, इथे तिथे पाणी शोधत फिरतो. पण झाड काय करणार. त्याला काही आपल्यासारखे पाय नाहीत किंवा उडता येत नाही. 

पळणारी आणि उडणारी झाडं डोळ्यासमोर येऊन खारूताई खुद्कन हसली. 

“पण मग झाड काय करेल, तहान लागली तर?”,  सशाला काळजी वाटली. 

“झाड जे काही थोडं पाणी आहे, त्यात भागवतं”, घुबड म्हणालं “आणि त्यासाठी ज्या पानांमधून पाणी बाहेर जातं, ती सगळी पानं ते गाळून टाकतं.”     

“कसली भारी युक्ती आहे”, ससा डोळे मिचकवत म्हणला. 

“आणखी एक गंमत आहे. ही पानं बघा कशी जमिनीवर सगळीकडे पसरली आहेत. त्यामुळे मातीला सुद्धा उन्हाचा त्रास होत नाही. कितीही ऊन असलं, तरी मातीत ओलावा टिकून राहतो. शिवाय अनेक किडे ह्या पानांच्या थराखाली छान राहतात. त्यांनासुद्धा उन्हाचा त्रास होत नाही”. 

आत्ता सशाला कळलं, मगाशी तो पानं गोळा करत होता, तेंव्हा एक अळी त्याच्यावर एवढी का चिडली. ती मस्त पानाखाली बसली होती आणि सशाने तेच पान नेमकं उचललं. तेंव्हा तो झाडाच्या काळजीत होता, त्यामुळे हे त्याच्या लक्षातच आलं नाही. 

“आम्ही उरलेली गोष्ट ऐकायला येतोच, ५ मिनिटांत”, ससा म्हणला. “चल खारूताई, आपण गोळा केलेली पानं परत होती तशी पसरवून ठेवू”. 

दोघं उडया मारत गेलेसुद्धा. घुबड कौतुकाने त्यांची लगबग बघत होतं. 

ढीगातली सगळी पानं दोघांनी नीट पसरवली आणि गोष्ट ऐकायला परत येऊन बसले. 

त्यांना आता प्रश्न होता की 'ह्या पानांचं होणार तरी काय? आणि झाडाचं काय? ते असंच राहणार?' दोघांनी घुबडावर प्रश्नांची सरबत्तीच केली.  

“सांगतो सांगतो”, घुबड म्हणाले. “थोड्या दिवसांनी झाडाला नवीन पानं यायला लागतील, छान छान हिरव्या रंगाची. झाड परत पूर्वीसारखं दिसायला लागेल. उन्हाळा संपला ना, की मग येतो पावसाळा”. 

ससा आणि खारूताईला काहीच कळलं नाही. घुबडाच्या लक्षात आलं ह्या पिटुकल्यांनी अजून पावसाळा बघितलाच नाही. 

“म्हणजे आभाळातून पाणी पडायला लागतं. एकदा सुरू झाला की ४ महिने पाऊस पडत राहतो. ही सगळी खाली पडलेली पानं आहेत ना, त्या पाण्यामुळे ही पानं तुटतील, त्यांचे छोटे छोटे तुकडे होतील, आणि हळूहळू ती मातीत मिसळून जातील. आणि हे दरवर्षी होतंच राहणार”. 

“हे सगळं तुम्हाला कसं कळलं”, सशाला खूपच आश्चर्य वाटलं. 

“अरे, मी कितीतरी पावसाळे बघितले आहेत ना, म्हणून”, घुबड मिस्कीलपणे म्हणलं.   

“डिट्टो माझ्या आजोबांसारखं बोलतात”, ससा नाक उडवून म्हणला. 

खारूताई आणि घुबड हसले. 

---------

आपल्या देशात एकही वाळलेले पान जाळले जाऊ नये. पानांचे जमिनीवर आच्छादन करा, अथवा त्यांचे खत करा. कसे? सोप्पे आहे, ह्या लिंक वर क्लिक करा, आणि पीडीएफ माहितीपुस्तिका डाऊनलोड करा , 

सूचना: चित्रांतील बारकावे अधिक नीट बघण्यासाठी, शक्य असल्यास ही गोष्ट पुन्हा मोठ्या स्क्रीनवरही दाखवा.