रागोबाने ठोकली धूम (कथा)

रागोबाने ठोकली धूम
लेखन: गुलाब बिसेन, कोल्हापूर
चित्रे: ज्योती महाले

सई आपल्या आवडत्या बार्बी डाॅलसोबत हाॅलमध्ये ‘स्वयंपाक स्वयंपाकने’ एकटीच खेळत होती. शेगडीवरच्या एका भांड्यात, भाजीला फोडणी द्यायची तयारी करत होती. बार्बी तिच्या कडेलाच होती. एवढ्यात सईला दाराच्या चौकटीतून रागोबा खुणावू लागला.

सई स्वयंपाक करण्यात व्यग्र असल्याने तिने त्याच्याकडे लक्षच दिले नाही. शेवटी रागोबाच तिच्याकडे आला.
“सई, काय खेळतेस?”
“‘स्वयंपाक स्वयंपाकने’ खेळतेय.”
अनोळखी आवाजाने सईने आवाजाच्या दिशेने बघितले. केस विस्कटलेला, डोळे आगीसारखे लालेलाल झालेला रागोबा तिला दिसला.
“कोण रे तू? आत कसा आलास? शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहतो काय? कुणासोबत आलास?”, सईने प्रश्नांवर प्रश्न विचारत रागोबाला भांबावून सोडले.
“खरंच नाही ओळखलंस मला?”
“नाही.”
“अगं, मी तर सगळीकडे असतो.”
“पण, मी नाही ओळखलं तुला.”, खेळता-खेळताच सई बोलली.

“मी तर घराघरात असतो. एखाद्याला मनासारखं काही मिळालं नाही, की मी सरळ त्याच्या डोक्यातच शिरतो. तो आदळआपट करायला लागतो. मग मम्मी पप्पा त्याला शांत करण्यासाठी त्याच्या मनासारखं देतात.”
“पण, मी तर कधीच आदळआपट करत नाही. माझे मम्मी- पप्पा, आजी-आजोबा माझा खूप लाड करतात. मग तू इथे का आलास?”
“तुझी बाहुली बघितलीस?”
“काय झालं बार्बीला?” सई आश्चर्याने बघू लागली.
“तिचा ड्रेस बघ. किती मळलाय. केस बघ तिचे कसे विस्कटलेत!”
“मग काय झालं? ही माझी आवडती डाॅल आहे. मामाने दिलीय माझ्या पहिल्या बर्थडेला.”
“काय झालं? अगं, त्या ओवीकडे बघ, कशा नवनवीन बाहुल्या आहेत. तुझ्या बघ जुन्या पुराण्या!”
रागोबाने सईला डिवचलं.

रागोबाचं ऐकून सई मध्येच खेळ सोडून किचनमध्ये गेली. तिचे पप्पा आमटीसाठी वरण्याच्या शेंगा सोलत होते. सई आदळआपट करत पप्पांना नवीन डाॅल मागू लागली.
‘अरे व्वा! किती छान वाटतंय सईला आदळआपट करताना बघून’- रागोबा दारामागून सईची गंमत बघू लागला.

गेल्याच आठवड्यात खेळणी नको, म्हणून सईने नवीन ड्रेस घेत, यापुढे दोन महिनेतरी नवीन खेळणी मागणार नाही अशी सर्वांपुढे शपथ घेतली होती. आणि आज ती नवीन बाहुली मागताना बघून पप्पांनी तिच्या मागणीला केराचीच टोपली दाखवली.

पप्पांकडे आपली डाळ शिजत नसल्याचे बघून, मग सईने आपला मोर्चा मम्मीकडे वळवला. पण, मम्मी ऑफिसच्या कामात व्यग्र होती. लॅपटाॅपमधून डोकं वर काढत तिने आजीकडे बोट दाखवलं. मम्मी पप्पाने सईची मागणीच धुडकावून लावल्याने सईचा रागाचा पारा चढला. ती पाय आपटतच आजीकडे गेली.

आजी सोफ्यावर बसून निवांत पेपर वाचत होती. तिने रागावलेल्या सईला जवळ घेतलं. तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत, तिला तिच्या शपथेची आठवण करून दिली. आजीच्या मायेने ती थोडी शांत झाली. आजीने तिच्या बाहुलीचे विस्कटलेले केस नीट केले. बार्बीचा मळलेला ड्रेस बदलून नवा रंगीबेरंगी ड्रेस करून दिला.

नव्या ड्रेसमुळे बार्बी बाहुली पूर्वीपेक्षा सुंदर दिसू लागली. बाहुलीच्या नवीन लुकने सईचा राग कुठल्या कुठे पळून गेला. तिने “थॅंक यू आजी” म्हणत आजीचा मुका घेतला आणि ती परत पूर्वीसारखी स्वयंपाक स्वयंपाकने खेळायला लागली.

सईला आनंदाने खेळताना बघून रागोबा तिथून धूम ठोकत पळून गेला.