रोमोच्या गावाला जाऊया (गोष्ट)

रोमोच्या गावाला जाऊया
लेखनः डी.व्ही. कुलकर्णी
चित्रेः योगिता धोटे

छानसा समुद्रकिनारा.

त्या किनाऱ्याला लागून उभी असलेली, समुद्राच्या वाऱ्यावर डोलणारी नारळाची झाडं.

संध्याकाळची वेळ.

समोर क्षितिजावर पसरलेला लालसर पट्टा.

हवेत सुखद गारवा.

किती छान निसर्ग!


पाण्यात बुडणाऱ्या सूर्याकडे पहात, जवळच्याच खडकावरून उडणारे पाण्याचे तुषार झेलीत राजू आणि संजू आपल्या चिमुकल्या विश्वात मग्न होते. लहर लागली की ते आपले पाय पाण्यात बुडवीत. तर पाणी एकमेकाच्या अंगावर उडवत. कधी मध्येच समोरच्या मऊसूत पांढऱ्या वाळूत आपले पाय उमटवीत. किती सुंदर जग होतं त्यांचं. डोक्यावरच्या निळ्याभोर आकाशासारखं स्वच्छ. समुद्रपक्ष्यांच्या थव्यासारखं स्वच्छंद.

खेळता खेळता धावता धावता राजू मध्येच थांबला आणि एका खडकाकडे निरखून पाहू लागला. नंतर दबक्या आवाजात म्हणाला, “संजू, त्या खडकाकडे बघ. काहीतरी वेगळं दिसतंय.” संजू एकाग्रपणे त्या खडकाकडे पाहू लागला आणि चमकलाच.

त्या खडकाच्या मागे त्यांच्याच वयाचा, गावात पूर्वी कधीही न बघितलेला, एक लहानसा मुलगा समुद्राच्या लाटांशी खेळत होता. आपल्याला आता नवा मित्र मिळाला म्हणून दोघेही आनंदले. धावत पळत त्याच्याजवळ गेले. दोघांनीही त्याला नीट निरखून पाहिलं.

“ए संजू हा आपल्याच वयाचा दिसतोय.”
“ते खरं रे, पण त्याला कधी इथे गावात पाहिलं नाही.”
“बहुधा पाहुणा असेल.”
“हं दिवाळीच्या सुट्टीत कोणाकडे तरी आला असेल”

राजूने समुद्राच्या वाऱ्यावर उडणारी आपली झुलूपं सावरली आणि कुतूहलाने त्या मुलाकडे पहात राहिला.

“ए संजू हा मुलगा जरा वेगळा दिसतोय नाही?”
“हो ना. मी मघापासून तेच पाहतो आहे.”
“ए! याच्या भुवईला केसच नाहीत.”
“आणि डोक्यावरही केसाचा एक झुपका तेवढा आहे. बाकी डोकं तुळतुळीत”
“म्हणजे टकलूच म्हणायचा की. आपल्या शेजारच्या जोश्यांसारखा.” दोघेही खुदकन हसले.
“बिच्चारा एवढ्या लहान वयात कसं काय बुवा याला टक्कल पडलं.”
“ए आणि याचे कपडेही वेगळेच दिसत आहेत.”
“हे असे कपडे शिवायला, आपण आपल्या बाबांना सांगायला हवं. रोज काय तीच ती शर्ट पॅण्ट घालायची.”
“मला देखील आवडले त्याचे कपडे. हे असे कपडे घालून शाळेत जायचं आणि आपल्या दोस्तांमध्ये भाव मारायचा.”
दोघांनी टाळ्या वाजवल्या. आणि हे नवीन पद्धतीचे कपडे शिवायचे या आनंदात मशगुल झाले.
“ए पण आपण त्याला विचारलं पाहिजे हे कपडे कोणत्या शिंप्याने शिवले म्हणून.”
संजूला राजूचं म्हणणं पटलं. त्याने मान डोलवली. “खरंय तुझं म्हणणं. निदान ओळख तरी होईल.”
“हो ना! आपल्याला खेळायला एक मित्र मिळेल”

दोघे धावत त्याच्या जवळ गेले. पण, दोघांना समजेना याला हाक काय मारायची. दोघे काही वेळ तसेच उभे राहिले. एवढ्यात त्या पाहुण्याचं त्यांच्याकडे लक्ष गेलं. राजू झटकन पुढे झाला. “हॅलोऽ मी राजू. हा संजू. आम्ही दोघं या गावातच राहतो.” त्या मुलाने या दोघांकडे पाहिलं. त्याच्या हातात एक कॅलक्युलेटरसारखा एक यंत्र होतं. त्या यंत्रावर त्याने काही बटणं दाबली आणि अहो आश्चर्यम! त्या यंत्रातून चक्क मराठी शब्द बाहेर पडले.

“नमस्कार मी रोमो. मी तुमचा मित्र आहे.” त्या यंत्रातून मराठी शब्द आल्याबरोबर राजू आणि संजू पार गोंधळून गेले. ते यंत्र त्यांच्याशी चक्क मराठीत बोलले होते. त्या यंत्राकडे पाहात राजूने प्रश्न विचारला.

“ए हे काय आहे?” पुन्हा एकदा त्या यंत्रावरील दिव्यांची उघडमीट झाली. यंत्राने राजूचा प्रश्न त्या मुलापर्यंत पोहोचवला. त्या छोट्या पाहुण्यानेही तत्परतेने उत्तर दिलं. “हे यंत्र म्हणजे एक छोटासा बहुभाषा आहे. तुम्ही जे काही बोलता, त्या ध्वनिलहरी हा आत्मसात करतो व त्या ध्वनिलहरींचे माझ्या भाषेत रूपांतर करून, तुमचं बोलणं तो माझ्यापर्यंत पोहचवतो. याच पद्धतीने माझं बोलणं तुमच्यापर्यंत पोहोचवतो. अर्थात त्यासाठी काही सांकेतिक बटणं मात्र दाबावी लागतात.” रोमाच्या हातातील ते यंत्र पाहून राजू आणि संजू विलक्षण खूश झाले. असं यंत्र त्यांनी कधीच पाहिलं नव्हतं.

“अरे वा मस्तच आहे की तुझ्या कडच हे यंत्र. एऽ रोमो आता मी तमिळ भाषेत बोलतो. हे बघूया तुला समजतं का?”
“आहा रे येते तरी का तमिळ भाषा?”
“येते ना. तुला या यंत्राद्वारे समजेल ना रे रोमो?”
रोमोने मान डोलवली. त्या यंत्राकडे अभिमानाने पहात म्हणाला, “ती भाषा या यंत्राच्या संगणकात समाविष्ट केली असेल तर निश्चितच समजेल. बरं का दोस्तांनो, हे यंत्र बहुभाषिक आहे. जगातील बहुतेक भाषा या यंत्राला येतात. निव्वळ काही बटणं दाबली, की मी कोणाशीही संभाषण साधू शकतो.”
“तर मग ऐक रे रोमेा”, असं म्हणून राजू कधी काळी ऐकलेलं सिनेमातलं तमिळ गाणं गाऊ लागला.
पुन्हा एकदा यंत्राची उघडमीट झाली आणि थोड्याच वेळात रोमोदेखील ते गाणं गाऊ लागला. तिघांनाही गंमत वाटली. ते हसू लागले. गाऊ लागले. नाचू लागले. 

राजू आणि संजूला ते यंत्र खूप आवडलं. त्यांनी त्याच्याशी निरनिराळे खेळ केले. गाणी म्हटली. कविता म्हटल्या. बघता बघता वेळ कसा गेला ते समजलही नाही. हळूहळू अंधार झाला. समुद्राच्या लाटा काळोखात गुडुप झाल्या. राजू आणि संजूची घरी जायची वेळ झाली. ते घरी निघाले. “बरंय रोमो आम्ही आता घरी निघालो. आमचे आई बाबा वाट बघत असतील. उद्या भेटू.” दोघेही धावत पळत घरी निघाले. पळता पळता दोघेही मध्येच थांबले. त्यांनी मागे वळून पाहिलं. रोमो तिथेच उभा होता. त्या दोघांकडे पहात होता. 

अरे हा अजून तिथेच उभा आहे. हा त्याच्या घरी का जात नाही? याचे आई बाबा कुठे आहेत? याला भूक नाही का लागणार? इथे याला खायला कोण देईल?

राजू संजू पुन्हा मागे फिरले.

“ए रोमो तू इथेच का थांबलास. घरी का जात नाहीस?” रोमोने त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. तो गप्पच बसला.

“ए तुझे आई वडील कुठे आहेत? तू इथे कोणाकडे आला आहेस का?”

रोमो तरीही गप्पच. तो काहीच बोलेना. राजू आणि संजू विचारात पडले. हा बहुधा आपल्या आई वडिलां पासून दुरावलेला दिसतोय, पण आता या काळोखात याच्या आई वडिलांना शोधणार कुठे? तसंच याला अंधारात सोडायला नको.  याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे.  राजू-संजूला चिंता वाटू लागली. इतका वेळ सुंदर भासणाऱ्या समुद्राच्या लाटा आता भितीदायक वाटू लागल्या.

“याला आपल्या घरी नेलं तर!” राजूने लगेच आपल्या मनातला विचार बोलून दाखवला. “ए रोमो, तू त्यापेक्षा तू असंच कर ना. आजची रात्र आमच्याकडेच राहा. मग बघू काय करता येतं ते.”
राजूचा हा विचार संजूला खूप आवडला. रोमो आपल्या घरी राहणार या कल्पनेने तो हरखून गेला. “हो हो रोमो तू आमच्या बरोबर चल. उद्या आमच्या बरोबर आमच्या शाळेत ये. आपण खूप मजा करू. माझ्या मित्रांना तुझं हे यंत्र दाखवू. आमच्या गुरुजींना इंग्रजी भाषा येते. तसंच एक गुजराती मुलगा आहे, तो त्याच्या भाषेत तुझ्याशी बोलेल. धमाल येईल. नवा मित्र मिळाल्यावर त्यांनाही खूप आनंद होईल.”

रोमोने मान डोलवली. राजू आणि संजू दोघांबरोबर रोमो निघाला. समुद्रालगतच्या गावातच दोघांचे घर होते. मोठ्या खोल्या. पुढे मागे अंगण व अंगणात छानशी झाडी. दोघे घरात शिरले. रोमो बुजला व बाहेर अंगणातच उभा राहिला.

“ए रोमो आत चल ना”
“आलो. जरा बाहेर तुमची बाग बघतो आणि आत येतो.” रोमोने तिथे घुटमळतच उत्तर दिले.
“ठीक आहे” राजू म्हणाला.
एव्हाना रात्र बरीच झाल्याने दोघांचेही आई बाबा काळजीतच होते.
“काय हे राजू किती उशीर केलास? बाहेर काळोख किती पडलाय. कोणी काही केलं म्हणजे?”“ आई रागावून म्हणाली.
“ए आई.आम्हाला कोण काय करणार”
“अरे बाबांनो रात्री अंधार पडायच्या आत घरी यावं. रात्री भुता खेतांचा वावर असतो”
आईचं हे बोलणं ऐकून राजू भडकला. पटकन म्हणाला, “ए आई कसल्या अंधश्रद्धा बाळगतेस. आम्हाला चांगल्या शाळेत शिकवतेस आणि स्वत:: मात्र भलत्या सलत्या चुकीच्या कल्पना डोक्यात घेतेस.” 
संजूने देखील राजूला दुजोरा दिला. “आई तू आता आमची काळजी करणं सोडून दे. आता आम्ही मोठे झालो आहोत.”
“आहा रे मोठे म्हणे! अजून सगळ्या गोष्टींसाठी आई लागते. चला पटकन हात पाय धुवा आणि जेवायला चला.” आई स्वयंपाकघरात शिरली. व तिने दोन ताटं घेतली. तसा राजू पटकन म्हणाला, “ए आई तीन ताटं घे “
“का रे? आधी तुम्ही दोघं जेवा. मी आणि बाबा नंतर बसू.”
संजूने आईकडे एकटक पाहिलं व म्हणाला “अगं आई राजू म्हणतोय ते बरोबर आहे. आपल्याकडे एक पाहुणा आलेला आहे.”
“पाहुणा कुठाय?” आईने आजू बाजूला पहात विचारलं.
“आपली बाग बघतोय “

आई पटकन बाहेर आली. बागेत रोमो बुजल्यासारखा उभा होता. रोमोला पाहताक्षणीच आई किंचाळलीच. आणि तिने लगेचच बाबांना हाक मारली. “अहो पाहिलंत का आपल्याकडे कोणीतरी अनोळखी लहान मुलगा आलाय, अगदी विचित्र दिसतोय तो.” आईचं ओरडणं ऐकून बाबा लगेच धावत आले. बाबांनी रोमोला पाहिलं. त्याला पाहताच त्यांची नजर बदलली. ते स्वत:शीच पुटपुटु लागले. “कोण हा मुलगा? असा विचित्र का दिसतोय? हा आपल्यासारखा नाही.” नंतर त्यांनी राजूच्या आई कडे रोखून पाहिलं.
“तुझ्या लक्षात आलं का?” राजूची आई गंभीर झाली. तिने रोमेाचे हात पाय नाक चाचपून पाहिले.
“हा मुलगा वेगळा आहे. आपल्यासारखा नाही.” राजूला आईचे म्हणणे पटले नाही. त्याने ते म्हणणे खोडून काढले. “अग आई, हा आमच्यासारखाच आहे. इतका वेळ आम्ही एकत्र खेळत होतो.”
“तू जरा गप्प बसशील का?” राजूच्या आईने त्याला दटावले.
राजूच्या बाबांनी थोडावेळ विचार केला, नंतर आईकडे वळून म्हणाले, “थांब मी आलोच. जरा गावातल्या लोकांशी बोलायला लागेल.”
बाबांनी चपला पायात घातल्या. नंतर थोडेसे थांबले. “आणि हे बघ, तोवर या मुलाला घरात घेऊ नकोस.”

आता मात्र राजू चिडला. “अग आई असं काय करतेस. रोमोला आता भूक लागली असेल. रोमोने आता एवढ्या रात्री जायचं कुठे?” इतका वेळ शांत असलेला संजूही आता वैतागला. “आई, तूच आम्हाला सांगतेस ना सर्वांवर प्रेम करा म्हणून” संजूचे हे तिखट बोलणं आईला आवडलं नाही. तिने एक धपाटा त्याच्या पाठीत घातला.
“तुम्हा मुलांना काही अकला आहेत का? कोणीही रस्त्यावरचा मुलगा घरी घेऊन आलात”
“अग आई आम्ही मघापासून सांगतो आहोत हा मुलगा कोणीही नाही. हा रोमेा आहे. आई वडिलांपासून दुरावला आहे इतकंच.”
संजूने आईचा पदर धरला “आई आपण त्याला मदत केली पाहिजे, नाहीतर मुलं पळवणारे टोळीवाले त्याला पळवतील.”
आईने संजूचा हात झटकला. त्याच्याकडे रागारागाने पाहिले. “गप बस, तुम्हाला काही कळत नाही. चला तुम्ही जेवून घ्या.” 
“आणि रोमोचं काय?” राजूने विचारलं.
“बाबांना येऊ दे. तेच काय ते ठरवतील. तोवर तो बाहेरच थांबेल.”
“ठीक आहे. मग आम्हीदेखील बाहेरच थांबतो.” राजू आणि संजू एकसुरात ओरडले. हा सगळा तमाशा रोमो शांतपणे पहात होता.

आई घरात गेल्यावर तो पुन्हा राजूशी यंत्राच्या साहाय्याने बोलू लागला. “राजू तुला भूक लागली असेल, तर तू आत जा. मी थांबतो बाहेर, माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतेय का?”
“नाही रे रोमो! या अंधारात तुला आम्ही एकटं सोडणार नाही. तू काळजी करू नकोस. हा प्रश्न सुटेल. माझे आई बाबा स्वभावाने चांगले आहेत, त्यांचा थोडासा गैरसमज झालाय इतकंच.” राजू, संजू आणि रोमो बाहेरच उभे राहिले.

थोड्याच वेळात राजूचे वडील परत आले. त्यांच्या बरोबर गावातली प्रमुख मंडळी होती. गावचे सरपंच आबासाहेब जातीने हजर होते. गावातल्या शाळेचे मुख्याध्यापक होते. एकूण दहा पंधरा जणांचा जमाव होता. आबासाहेबांनी रोमोला नीट निरखून पाहिले. नंतर राजूकडे पहात त्याला म्हणााले, “राजू, हा मुलगा तुम्हाला कुठे सापडला?”
“आम्ही समुद्रावर खेळायला गेलो होतो, तेव्हा आम्हाला दिसला.”
“बरोबर कोणी होतं?”
“नाही कोणीच नव्हतं.”
सरपंचांनी रोमोकडे टक लावून पाहिलं, आणि त्याला दरडावून म्हणाले,  “काय रे पोरा तू कुठला कुठून आलास? तुझे आईबाप कोण आहेत?”
रोमो गोंधळून सरपंचांकडे पाहू लागला. त्यांच्या आवाजातील ती जरब पाहून तो थोडा घाबरला. सरपंचांची भाषा समजण्यासाठी हातातल्या यंत्राचे तो बटण तो दाबणार तोच सरपंचांच्या बाजूला उभ्या असलेल्या एका दांडगट माणसाने ते यंत्र खेचून घेतले.
“काय रे पोरा हातात रिमोट हाय व्हय! हे बटन दाबून काय बॉम्बस्फोट करायचा इचार हाय काय?”
त्याच्या प्रश्नाला रोमा कोणतेच उत्तर देऊ शकत नव्हता. आता रोमोची बोलतीच बंद झाली. कारण संवाद साधण्याचे माध्यमच त्याच्या हातात उरले नाही.
राजू आणि संजूने ही गोष्ट लोकांना सांगायचा प्रयत्न केला. पण कोणी त्यांच्याकडे लक्षच देत नव्हतं. लोकांच्या कोलाहलात त्यांचा आवाज चिरडला गेला होता. बरोबरचे लोक बोलू लागले. “भाऊ हा बोलत नाही. त्याअर्थी तुम्ही म्हणता ते खरं असणार.”
“इथे कायतरी काळंबेरं हाये.”

एव्हाना गोष्ट षट्कर्णी झाली होती. गावातले बरेच लोक जमले. लोक म्हणत होते की हा मुलगा दिसायला अगदी वेगळा आहे. हा सामान्य माणसासारखा दिसत नाही. असला माणूस आम्ही कधी पाहिला नाही. कुणीतरी म्हणालं, “हा कोण्या गावचा आहे? कोण्या धर्माचा आहे? कोण्या जातीचा आहे? हा “आपला” नाही हे निश्चित”

एकाने मध्येच तारे तोडले. “हा शत्रूचा हेर असला पाहिजे. रोमोच्या हातात बहुभाषा नसल्याने त्याला गावकऱ्यांचे बोलणे समजत नव्हते. तो त्यांचा आरोपांना उत्तर देऊ शकत नव्हता. हळूहळू कोलाहल खूप वाढला. हा जर आपला माणूस नसेल, तर शत्रूचा हेर असला पाहिजे. ही भावना बळावली. सगळेजण त्याच्याकडे शत्रू म्हणून पाहू लागले. रोमोला धक्काबुक्की होऊ लागली. इकडे राजू संजू गर्दीला ओरडून सांगत होते, “अहो असं काय करताय, हा रोमो आहे. शत्रूचा हेर वगैरे काही नाही. आमच्यासारखाच आहे. अगदी थोड्या वेळात हा आमचा मित्र झालाय. त्याची भाषा वेगळी आहे इतकंच. आणि त्याचीही काही अडचण नाही. ज्याला तुम्ही रिमोट म्हणताय ना तो एक बहुभाषा आहे. बॉम्ब वगैरे फोडायचा रिमोट कंट्रोल नाही, तर निरनिराळ्या भाषा समजून घेण्याच एक यंत्र.”

राजू संजूचे चिमुकले शब्द त्या गोंधळात कोणाला ऐकू आलेच नाही. कोणीच त्यांच्याकडे लक्ष देत नव्हतं. वातावरण हळू हळू तापत होतं. एवढ्यात गर्दीतून कोणीतरी म्हणालं, “गावातल्या मतलबी लोकांचं हे कारस्थान असलं पाहिजे.”

झालं! आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले. जमावात गट पडले. लोक हमरीतुमरीवर आले. जमाव हिंसक होऊ लागला. रोमोच्या जीवालाही आता धोका निर्माण झाला 

आणि नेमकं याच वेळेला आकाश उजळून आलं. एक तेजाची झळाळी आकाशाला आली. गावकऱ्यांचे डोळे प्रकाशाने दिपले. त्यांना नेमकं समजेना नेमकं काय होतंय. त्यांनी आकाशात पाहिलं तर तेजाची एक धार आकाशातून खाली येत होती. तबकडी सारखा तिचा आकार होता. गावकरी अचंबित होऊन बघत होते.

“अरेच्च्या हे काय. हे तर वेगळ्याच आकाराचं विमान आहे.”
“पूर्वी कधी असं विमान पाहिलं नव्हतं.” त्या तबकडीला पाहून वातावरण स्तब्ध झालं होतं. वातावरणात कुतूहल होतं. थोडीशी भितीही होती.

तबकडी हळूहळू खाली आली. त्यातून रोमोसारखीच दिसणारी माणसं खाली उतरली. त्यांनी रोमोचा ताबा घेतला आणि क्षणार्धात त्या तबकडीने आकाशात झेपही घेतली.

 

गावकरी स्तब्ध झाले होते. त्यांच्या कल्पनेच्या पलीकडे होतं हे सगळं, अचानक त्या बहुभाषातून आवाज येऊ लागला.

“पृथ्वीवरच्या लोकांनो, घाबरू नका. आम्ही युबास्को ग्रहावरील माणसं आहोत. तुमच्या या सुजलाम सुफलाम अशा या भूमीला कोणताही धोका नाही. आम्ही तुमच्यावर हल्ला करायला आलेलो नाही. आम्ही मैत्रीचा हातच पुढे करीत आहोत. तुमच्या पृथ्वीपासून काही प्रकाशवर्षे दूर असलेल्या सूर्यमालेत आमचा हा ग्रह आहे. आमच्याच ग्रहमालेत मिताभा नावाचा आणखी एक ग्रह आहे. या मिताभा ग्रहावर जीवसृष्टी नाही. परंतु जीवसृष्टीसाठी पोषक वातावरण मात्र आहे. या मिताभा ग्रहावर स्वर्गनगरी बसावी असे आम्हाला वाटते. तेथे माणसामाणसात कोणतेही भेद नसावेत. जातीच्या धर्माच्या भिंती नसाव्यात फुलांच्या ताटव्यासारखं सुगंधित जग असावं. मंद वाऱ्याच्या झुळकीसारखं प्रसन्नता देणारं स्वातंत्र्य तेथे नांदावं. परंतु हे शक्य कसं होईल? कारण आम्ही युबास्को ग्रहावरील माणसंही तुम्हा पृथ्वीवासीयांसारखेच भांडतो आहोत. आम्ही देखील येथे महायुद्धे खेळतो. संहारक शस्त्रे निर्माण करतो. हिंसाचार करतो. तेव्हा आम्ही मिताभा ग्रहावर वस्ती करायचं ठरवलंतरी तिथे स्वर्ग नांदायचा कसा? तेव्हा पृथ्वीवासियांनो, आम्ही एक प्रयोग करायचा ठरवलं आहे. स्वप्नातील जग निर्माण करण्यासाठी केलेला एक अभिनव प्रयोग. त्या प्रयोगाला तुमची साथ फक्त हवी. आम्ही असं ठरवलंय की या प्रचंड विश्वात जिथेजिथे जीवसृष्टी आहे तिथल्या लहान मुलांचा एक गट करून “मिताभा” ग्रहावर एक वेगळी वसाहत उभी करायची. मुलांचं एक वेगळं विश्व तिथे निर्माण करायचं. माणसा माणसातील भेदाच्या भिंतींपासून दूर असलेलं. एक निरागस विश्व. मिताभा ग्रहावरील ही निरागस मुलं जेव्हा मोठी होतील तेव्हा आजूबाजूचे दुहीचे संस्कार त्यांच्यावर नसल्याने एक स्वर्गनगरी तेथे निर्माण होईल. आमची आजची यात्रा हा त्या प्रयोगाचाच एक भाग होता. राजू संजू आणि रोमोची जमलेली गट्टी पाहून आमचा प्रयोग दिशेने चालला आहे याची आम्हाला खात्री पटते. बरंय तर मुलांनो धन्यवाद भेटू लवकरच.”

एवढं बोलून त्या यंत्राची धडधड थांबली. तो बहुभाषा बोलायचा थांबला. उडत्या तबकडीनेदेखील आकाशात झेप घेतली होती. भारावलेले गावकरी कधी आकाशाकडे तर कधी यंत्राकडे पहात होते.

आकाशात मात्र पुन्हा एकदा काळोखी दाटून येत होती.

----------

लेखक शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनिअर असून, आजवर अनेक बालकथांचे लेखन केले आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांना विविध पुरस्कार प्राप्त आहेत. सदर कथा त्यांच्या 'दे धडक बेधडक' या कथासंग्रहातील असून या संग्रहास 'केशव भिकाजी ढवळे पुरस्कार' मिळाला होता.
'अटक मटक.कॉम'ची घोषणा होताच मोठ्या मनाने आपणहून त्यांच्या कथा साईटवर प्रकाशित करण्याची परवानगी त्यांनी दिली - त्याबद्दल त्यांचे आभार

 

सुचना: सदर लेखन जुन्या पद्धतीच्या फॉन्ट डिपेंडन्ट लेखनातून युनिकोडमध्ये आणले आहे, या प्रक्रियेत काही टंकनदोष संभवतात. शक्य तितके दोष दूर करण्याचा प्रयत्न केला आहे, तरी काही दोष राहिले असल्यास चुभुदेघे.