साविला भेटली परी (गोष्ट)

साविला भेटली परी

लेखन: अनुराधा गटणे | चित्र: ज्योती महाले


सावि एक गोड मुलगी आहे. अगदी तुमच्या सारखीच हुशार आणि चुणचुणीत. सदोदित आनंदी असते. दिवसभर नुसती धमाल करत असते.


कधी आजीचा विणकामाचा लोकरीचा गुंडा घेते आणि त्याचा बॉल करून खेळते. तर, कधी आई पोळ्या करत असताना लाटणे पळवून, स्वतःच पोळ्या करायला घेते. दुपारी आजोबा झोपले की, त्यांच्या पोटावर हळूच बसते आणि हत्ती हत्ती खेळते. तर, कधी रात्री बाबाच्या पाठीवर बसून घोडा घोडा खेळते.

अशी ही आपली सावि. आईजवळ, आजीजवळ बसून गोष्टी ऐकताना अगदी तल्लीन होऊन जाते. रात्री गोष्ट ऐकल्याशिवाय मात्र ती कधीच झोपत नाही. एकदा रात्री झोपताना, आईने तिला चिंटुकल्या गुलाबी परीची एक गोष्ट सांगितली.

“आई, मला पण एक परी हवी मैत्रीण म्हणून”, सावि म्हणाली.
“अगं, परी नसते खरी. ती फक्त गोष्टीतच असते आणि गोष्टीतच राहते.”, आई म्हणाली.
पण इतकी शहाणी आपली सावि, ऐकायलाच तयार नाही. आईने समजूत काढली. बाबा आला, आजी आली, आजोबासुद्धा आले, पण साविचं आपलं एकच 'परी हवी, परी हवी! '

मग त्या दिवशी, सावि तशीच रडत रडत झोपली. अशी रडत रडत ती पहिल्यांदाच झोपली, बरं का!

सावि झोपल्यावर एक गंमतच झाली. आईच्या गोष्टीतली चिंटुकली गुलाबी परी, साविच्या स्वप्नात आली. तशीच गोडुली, कुरळ्या सोनेरी केसांची, घोळदार गुलाबी फ्रॉक घातलेली. तिला इवले इवले पंख होते आणि हातात जादूची छडी. पण, ती इतकी चिंटूली होती की, साविच्या तळहातावर पण बसू शकेल.

साविला खूप म्हणजे खूप आनंद झाला.

“एs, चल आपण खेळूया”, परी म्हणाली.
“अगं, पण तू इतकी चिंटुकली आणि मी इतकी मोठी, आपण कसं खेळणार एकत्र?”, सावि म्हणाली.
“अगं, तू काळजी करू नकोस”, परी म्हणाली.
परीने तिची जादूची छडी चक्क साविच्या डोक्यावरून तीनदा फिरवली आणि म्हणाली,
चिकी बम चिकी बम
बम चिकी बम बम
अक्कड राजा फक्कड राणी
तिच्या घरी पाणीपुरी
पुढचा आदेश येईपर्यंत
साविला बनव परी
चिकी बम चिकी बम
बम चिकी बम बम

आश्चर्य म्हणजे सावि अचानक चिंटुकली झाली, परीसारखीच! तिला परीसारखे दोन पंख पण आले. चिंटूकलं झाल्यावर आणि पंख आल्यावर, साविला खूपच गंमत वाटली.

मग दोघींनी हातात हात घातले, साविच्या बंगल्याभोवती असलेल्या बागेत हुंदडल्या, केळीच्या मोठ्या मोठ्या पानांवरून घसरगुंडी खेळल्या, जाईच्या फुलांच्या वेलीचा झोपाळा केला, उडत उडत नारळाच्या झाडाच्या शेंड्यावर पण जाऊन आल्या. साविची छोटी तीन चाकी सायकल बागेत होती. तिच्या सीटवर लोळत त्यांनी गप्पा मारल्या.

साविला अचानक पुन्हा उडायची लहर आली.
“मी परत एकदा उडून येऊ? ”, साविनी विचारलं
“हो,पण फार पुढे जाऊ नकोस. फार उंच आकाशात गेलीस आणि चांदण्यांच्या गावात पोचलीस तर रस्ता सापडणं अगदी कठीण होऊन जातं बघ! ”, परी म्हणाली.
छोटे छोटे पंख टूलुटूलु हलवत, सावि त्यांच्या बंगल्याच्या आसपास उडून आली.

मग फुलातला मध कसा खायचा ते परीनी साविला शिकवलं आणि शाळेतली गोड गाणी साविनी परीला शिकवली. खेळून खेळून, उडून उडून, गाऊन गाऊन, बोलून बोलून दोघी अगदी दमून गेल्या आणि एका झाडाच्या फांदीवर बसल्या. आता पक्षी किलबिल करायला लागले आणि सूर्य पण हळूहळू उगवायला लागला तशी परी एकदम उदास झाली.
“काय झालं तुला? ”, साविनी विचारलं.
“अगं, त्या उंचावर दिसणाऱ्या चांदण्यांच्या गावात माझं घर आहे. आता मला तुला सोडून जावंच लागेल. ”, परी म्हणाली.
आता साविचा चेहरापण इवलासा झाला.
परी जायला निघाली. पण, जाता जाता परत आली आणि म्हणाली, “अगं सावि, एक महत्त्वाचं काम राहिलंय ना! तुला नेहमीसारखं करते. नाहीतर उद्या, तू कोणाला सापडणारच नाहीस. ”
परीनी साविच्या डोक्यावरून जादूची छडी तीनदा उलट फिरवली आणि म्हणाली,
' चिकी बम चिकी बम
बम चिकी बम बम
अक्कड राजा फक्कड राणी
शेवेचे डोंगर त्यांच्या गावी
पुढचा आदेश येईपर्यंत
या परीला बनव सावि
चिकी बम चिकी बम
बम चिकी बम बम '

सावि पूर्वीसारखी झाली. मोठी! आणि तिचे पंखही नाहीसे झाले.
“एs, तू मला सोडून जाऊ नकोस ना! ”, सावि म्हणाली.
“अगं, मला जावंच लागेल. माझी आई वाट बघतेय ना! ”, परी म्हणाली, “तुला भेटायला मी नक्की येईन. ”
“उद्या येशील? ”, साविनी विचारलं.
“होsउद्या येईन. ”, परी म्हणाली.
“रोज रोज येशील? ”, साविनी विचारलं.
“रोज रोज येईन. हो पण, कोणाला सांगू नकोस. अगदी कुण्णाकुण्णाला. समजलं? आपलं सीक्रेट आहे हे! ”, परी म्हणाली.
मग परी सुळकन उडून आकाशात गेली आणि चांदण्यांच्या आड दिसेनाशी झाली. मग, साविपण जड पावलांनी घरात गेली.

दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यापासून साविची लगबग सुरू होती.
“काय गडबड आहे, सावि? ”, आईने विचारलं.
“अगं, आज ना...आपल्याकडे ना... ”, बोलता बोलता सावि एकदम गप्प झाली. सीक्रेट फुटलं असतं ना!
“अगं काही नाही, काही नाही…”, सावि म्हणाली.
तेवढ्यात दाराची बेल वाजली. सावि धावतच दार उघडायला गेली आणि ‘परी आली! परी आली! ’ म्हणून नाचायलाच लागली.

दारात एक साविच्याच वयाची मुलगी उभी होती. सोनेरी कुरळ्या केसांची, गुलाबी घोळदार फ्रॉक घातलेली. फक्त तिला इवले इवले पंख नव्हते आणि हातात जादूची छडी नव्हती. तिच्या मागे तिचे आई-बाबा होते.
“आम्ही आत्ताच शेजारच्या बंगल्यात नवीन राहायला आलो आहोत”,त्या मुलीचे बाबा म्हणाले.
“ बाहेर बागेत छोटी सायकल आणि काही खेळणी दिसली, त्यावरून आम्हाला वाटलं की, इथे एखादी छोटी मुलगी राहात असेल. बघावं तरी! ओळखही होईल”, त्या मुलीची आई म्हणाली.
साविच्या आईने सगळ्यांना घरात घेतलं. तोपर्यंत सावि नवीन मैत्रिणीला घेऊन बागेत पसार झाली होती.
“नाव काय आहे तुमच्या मुलीचं? ”त्या मुलीच्या आईने विचारलं.
“सावि. ”, साविच्या आईने उत्तर दिलं, “आणि तुमच्या मुलीचं नाव काय आहे? ”, साविच्या आईने विचारलं.
“परिणीता. पण, आम्ही तिला परीच म्हणतो. ”, परीच्या आईने सांगितलं.

मग साविच्या आईने सगळ्यांना चकल्या दिल्या. चिवडा दिला. गरम गरम चहा दिला. मोठ्या माणसांच्या गप्पा खूप रंगात आल्या. पण, सगळ्या मोठ्या माणसांना एक गोष्ट मात्र शेवटपर्यंत कळलीच नाही, की साविला परीचं नाव आधीच कसं ठाऊक होतं बरं!?

---000---

ही गोष्ट ऐकून आरोही देशपांडे (छोटा गट, अक्षरनंदन) नावाच्या आपल्या लहानग्या मैत्रिणीने काढलेले चित्रही पाठवलं आहे. तेही बघा बरं आणि तुम्हाला चित्र काढावंसं वाटत असेल तर जरूर काढा: