साबुल्याची आंघोळ (गोष्ट)

साबुल्याची आंघोळ
लेखन: गुलाब बिसेन, कोल्हापूर
चित्रकार: पारूल समीर


साबुल्या त्या दिवशी खूप खूश होता. पाकिटात पॅक झाल्यापासून तो माॅलमध्ये महिनाभरापासून पडून होता. कुणी त्याच्याजवळ आलं, की त्याला खूप आनंद व्हायचा. कुणी हातात घ्यायचा, किंमत बघायचा आणि परत आहे तिथे ठेवून द्यायचा. दुकानात रोज शेकडो माणसं यायची. कुणी रंग बघायचे, कुणी पाकिटावरील नाव बघायचे, कुणी नुसताच वास घेऊन बघायचे, कुणी लहान मुलांचे आहे का हे बघायचे, तर कुणी मोठ्या माणसांचे आहे का हे बघायचे - प्रत्येक माणसाची वेगळीच आवड आणि वेगळीच निवड.


कुणी हातात घेऊन नाकाजवळ नेत वास घ्यायचा, आवडलं नसल्यासारखा चेहरा करायचा आणि परत आहे तिथे ठेवून द्यायचा. त्यावेळी साबू हिरमुसायचा. महिनाभर एका जागेवर पडून राहून तो जाम वैतागला.
“काय हे, सारखं एका जागेवर पडून राहायचं. जाम वैताग आलाय.” तो वैतागून बोलायचा. “मला ना! बाथरूम बघायचं आहे. तिथे नळातून येणारं पाणी, शाॅवरमधून पडणारं ते पाणी मला बघायचं आहे. अंगावर घ्यायचं आहे.” तो स्वत:शीच पुटपुटायचा. त्याच्या अवतीभवती त्याचे बरेच मित्र. कुणी एकटे, कुणी तीन चारच्या ‘ऑफर पॅक’मध्ये एकत्र पॅक होते. परंतु साबुल्याला त्यांच्यासोबत काही करमायचे नाही. त्याला दुकानात येणार्‍या माणसांकडून ऐकलेले बाथरूम बघायचे होते. त्याचे बरेच मित्र आतापर्यंत बाथरूमच्या प्रवासाला निघाले होते. साबुल्याला आपला नंबर कधी कधी येतोय असं झालं होतं.

शेवटी साबुल्याची इच्छा पूर्ण झाली. कुणीतरी साबुल्याला आपल्या घरी आणलं आणि थेट बाथरूममधल्या सोपकेसमध्ये नेऊन सोडलं. साबुल्याने सोपकेसमध्ये आपला मुक्काम ठोकला. लहान बाळाच्या आंघोळीसाठी आणल्याचं थोडावेळापूर्वीच त्याला कळलं होतं. तसा तो अधिकच आनंदला. “अरे व्वा! बाळासोबत आंघोळ करायला मज्जा येणार.” तो स्वत:शीच पुटपुटला.

सोपकेसमध्ये आडवा पडून तो संपूर्ण बाथरूम डोळेभरून पाहू लागला. त्याने यापूर्वी दुसर्‍यांकडून ऐकलेलं नळातून पडणारं पाणी, शाॅवरमधून पावसाच्या पाण्यासारखं पडणारं पाणी, आंघोळीसाठी नळाचं गरम पाणी, कपडे अडकवण्यासाठीचे हॅंगर, त्यावर अडकवलेला टाॅवेल, एका बाजूला अडकवलेले ब्रश, एक छोटासा आरसा सगळं होतं तिथे. साबुल्या पार हरखूनच गेला हे सगळं बघून. 
“कसलं भारी आहे! हा मंद प्रकाश, हा मंद वास. आहाहा!” तो स्वत:शीच बोलला.

तो सोपकेसमध्ये निवांतपणे पडून, बाथरूमच्या भिंतीवरील समुद्री जिवांचे चित्र बघत असतानाच, अंगावर पाण्याचे थंड थंड थेंब पडत असल्याचे त्याला जाणवले. तो भानावर आला. इकडे तिकडे बघू लागला. कुणीतरी शाॅवर सुरू केल्याने शाॅवरमधून पाण्याचे थेंब त्याच्या अंगावर पडू लागले होते. थंड थेंबांच्या स्पर्शाने तो घाबरलाच. सोफकेसमधून बाहेर पडत सैरावैरा पळत सुटला.


त्याला असं पळताना बघून शेजारच्या सोफकेसमधील अर्धे आयुष्य संपलेले एक आजोबा फिदीफिदी हसायलाच लागले. साबूला त्यांचा रागच आला. त्याची परेड बघून भिंतीला अडकवलेले ब्रश आणि टाॅवेलही हसायला लागले.
“मला आवडत नाही हे गार पाणी. मला थंडी भरणार. सर्दी होणार. शिंका येणार.” म्हणत तो पळू लागला. परत सगळे फिदीफिदी हसू लागले.
तेव्हा सोपकेसमधले आजोबा त्याला म्हणाले, “अरे, पाणी तर आपला दोस्त आहे. त्याच्याशिवाय आपल्या जगण्याला अर्थच नाही. पाण्याशिवाय आपला फेस कसा बनणार? पाण्याशिवाय आपण रोगजंतूंनाना पळवूच नाही शकणार." आजोबांचे ऐकून तो थांबला. त्याला थोडा धीर आला. तो परत आपल्या सोपकेसकडे निघणार, एवढ्यात त्याला बाथरूममध्ये आंघोळीला आलेल्या बाळाने त्याला हातात घट्ट पकडलं. शाॅवर सुरू झाला. साबू शाॅवरमधील पाण्याचे थेंब अंगावर घेत बाळाच्या अंगावरून फिरू लागला. त्याला खूप मज्जा येत होती. फेसाचे फुगे तयार होत होते. बाळासोबतच साबूही आंघोळ करण्यात दंंग झाला.

घरातल्यांची सकाळची आंघोळ आवरेपर्यंत बाथरूममध्ये नुसती धावपळ सुरू असायची. मग मात्र बाथरूम शांत व्हायचं. तसा साबुल्या आणि साबण-आजोबा आपापल्या सोपकेसमध्ये निवांत पडायचे. साबुल्याही मग पडल्यापडल्या स्वप्नांत रंगून जायचा. त्याला सप्तरंगी फेसात खेळत असल्याचे स्वप्न पडायचे. दिवसाढवळ्या स्वप्न बघायच्या त्याच्या सवयीवर साबण-आजोबा मात्र पोट दुखेस्तोवर हसायचे. 

एक दिवस सकाळची आंघोळ आटपून साबुल्या निवांत पडला होता. तसा तो रोजच पडायचा. 
“आंघोळ करून अजून तास व्हायचाय. काय हा अवतार केलाय बघा याने.” बाळाच्या आईचा त्रासिक स्वर साबुल्याच्या कानावर पडला.
“अगं, लहान आहे तो. आता घाण नाही करणार, तर कधी करणार? बाथरूममध्ये घेऊन जा आणि साबणाने स्वच्छ आंघोळ करू दे.” तोच बाळाच्या पायातील वाड्यांचा आवाज साबुल्याला ऐकू आला. तसा साबुल्या सावध झाला. सोबत बाळाची आईही आली.
बाळ केसापासून नखापर्यंत घाणीने माखला होता. कपडे तर बघायलाच नको. आईने शाॅवर सुरू करून बाळाला चांगला भिजवला. मग साबुल्याला हातात घेत बाळाच्या अंगावरून फिरवू लागली. साबुल्याच्या अंगावर फिरण्याने बाळाच्या अंगावर फेसच फेस तयार झाला. साबुल्याने फेस काढत बाळाच्या अंगावरच्या घाणीसह सगळ्या रोगजंतूं ना पळवून लावू लागला.

फेसामुळे बाळाला अंगभर गुदगुल्या केल्यासारखं वाटू लागलं. तसं बाळाच्या रडक्या चेहर्‍यावर हसू खुललं. बाळ साबणाचे फुगे करून खेळू लागला. बाळाला हसताना बघून आईच्या चेहर्‍यावरही हसू खुललं. आंघोळ आवरून बाळ आणि आई बाथरूमच्या बाहेर पडले. साबुल्याही आता निवांत होत सोपकेसमध्ये विसावला. त्याला सोपकेसमध्ये मोकळं मोकळं वाटू लागलं. त्याने सहज स्वत:ला आरशात बघितलं, तर तो पूर्वीपेक्षा जवळजवळ निम्मा पातळ झाला होता. पण तरीही तो आज खूप खूश होता. घाण आणि रोगजंतूपळवून लावत कुणाला तरी मदत केल्याचं समाधान त्याच्या चेहर्‍यावर दिसत होतं.