एक छोटी दुःखी खरी (गोष्ट)
मुळ पुस्तकः The Sad little fact । मुळ लेखनः जोनाह विंटर
एक होती खरी.
एक छोटीशी खरी.
एक दु:खी छोटीशी खरी.
आपल्या या 'खरी'ला कोणी मित्रच नव्हते. कोणीच तिला समजून घ्यायचं नाही.
सगळे म्हणायचे, “तू तर खोटी आहेस, आमचा तुझ्यावर अज्जिबात विश्वास नाही” आणि तिच्या बाजूने निघून जायचे. तिच्याकडे कोणी बघायचंसुद्धा नाही. या आपल्या खरीकडे सांगायला फक्त एकच गोष्ट होती, “मी खरी आहे. खरं नेहमी खरंच असतं आणि ही इतकी मोठ्ठी गोष्ट नाहीये.”
पण, ही खरी 'खरी' असणं फार मोठी गोष्ट होती.
एके दिवशी त्यांच्या राज्यातले मोठ्या पदावरचे लोकं खरीपाशी आले आणि म्हणाले, “तू खरी नाहीस, तू खोटी आहेस हे तुला सगळ्यांना सांगावं लागेल”; पण, आपली 'खरी', खोटं कसं बोलणार? तिने सरळ नकार दिला.
खरी नाही म्हणाली याचा त्या मोठ्या पदावरच्या लोकांना खूप राग आला. त्यांचा राग इतका वाढला की त्यांनी आपल्या खरीला एका पेटीत भरलं, पेटी घट्ट बंद केली आणि जमिनीत गाडून टाकली.
झालं? संपलं सगळं?
त्या पेटीमध्ये आत आपल्या खरीबरोबर छोट्या, मोठ्या, उंच, बुटक्या अशा अजून खूप ‘खऱ्या’ होत्या.आपल्या खरीला पाहिल्याबरोबर बाकीच्या खऱ्यांनी त्यांची स्वतः:ची गोष्ट सांगायला सुरुवात केली.
“माणूस माकडापासून जन्माला आला, असं सांगितल्यामुळे मला गाडलं.”
“मी प्रश्न विचारला म्हणून मला गाडलं.”
“मी खरं उत्तर दिलं, म्हणून मला गाडलं. आणि तू? तू इथे का आलीस?”
आपल्या खरीने हळूच उत्तर दिलं, “नाही म्हणाले म्हणून!”
एकामागोमाग एक सगळ्याजणी आपली गोष्ट सांगत होते.
असेच काही दिवस गेले. हळूहळू सगळ्या खऱ्यांचा श्वास घुसमटायला लागला, त्यांना बाहेर पडायचं होतं.
आपली छोटी खरी म्हणाली, “आपण पेटीला भगदाड पाडूया का?” पण कसं पाडणार? कारण, आपल्या खऱ्यांकडे पेटीला भगदाड पडेल असं कुठलंच हत्यार नव्हतं. त्या फक्त खऱ्या होत्या.
बाहेर एक वेगळाच गोंधळ सुरू होता.आपल्या खरीला आणि इतर खऱ्यांना गाडणाऱ्या मोठ्या पदावरच्या लोकांनी नवीन खऱ्या बनवायला सुरुवात केली. त्या स्वतःला ‘खरी’ म्हणायच्या, पण त्या 'खोट्या' होत्या.
या खोट्या खऱ्यांमुळे गोंधळ वाढतच होता. निराशेचा अंधार वाढत चालला होता.
आता मात्र खरोखरीच्या खऱ्यांवर विश्वास ठेवणारे काही लोक बाहेर पडले. “खऱ्या कुठे आहेत?” त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. दरवेळेस -खोट्या तयार केलेल्या- खऱ्यांकडे बोट दाखवून हे मोठ्या पदावरचे लोक "याच खऱ्या आहेत" असं उत्तर द्यायचे.
मग खऱ्यांना शोधायला या लोकांनी सुरुवात केली. त्यांच्याकडे टॉर्च, कुदळ एवढंच हत्यार होतं, पण खऱ्यांना शोधायचं त्यांनी पक्कं ठरवलं होतं.
खूप खूप खोल जमीन खणल्यानंतर त्यांना कसलातरी आवाज आला. हा आवाज तर आपल्या खरीचा होता! बाहेर पडण्यासाठी ती धडपडत होती.
सगळ्या शोध घेणाऱ्या लोकांनी, या आवाजाच्या दिशेनं खणत पेटी शोधून काढली. ती बंद पेटी त्यांनी जोरात उघडली. इतके दिवस दडवून ठेवलेल्या सगळ्या खऱ्या आपल्या खरीसोबत बाहेर आल्या.
दुसऱ्या दिवशी लख्ख प्रकाशात सगळ्या खऱ्या अजूनच चमकत होत्या. त्यांनी सगळ्यांनी खोट्यांना बांधून टाकलं होतं. आता त्या मुळीच घाबरत नव्हत्या, त्या जोरजोरात ओरडायला लागल्या,
“प्रश्न विचारणं चुकीचं नसतं.”
“मनुष्य हा ही एक प्राणी आहे.”
“पृथ्वी सूर्याभोवती फिरते.”
या सगळ्यात एक मोठा आवाज आला, “खरं नेहमी खरंच असतं". तो आवाज आपल्या छोट्या खरीचा होता, जी आता दुःखी नाही, आनंदी खरी झाली होती.
यानंतरही खऱ्यांना न मानणारी काही माणसं खऱ्यांकडे पाठ फिरवून निघून जात होती, पण आता छोट्या खरीला याची मुळीच फिकीर नव्हती. कारण, तिच्यासोबत खरं शोधणारे, तिच्यासारख्या खऱ्यांवर प्रेम करणारे अनेक मित्रमैत्रिणी होते.