फॅन फिक्शन: सहल (कथा)

सहल 
लेखन: सुमुखी 

चित्रे: आकांक्षा 
(लेखक व चित्रकार दोघीही इयत्ता ९वी, अक्षरनंदन, पुणे)

 

~~ १. धक्का ~~

पहाटे सूर्य पूर्ण वर येण्याच्या आधीच मी आणि शिवलीला आमच्या आज्जीसोबत शाळेत पोचलो. किती बाई तिथे थंडी! अगदी जीवच काढते. शिवलीलाने स्वेटर आणला होता करड्या रंगाचा, तिच्या आईनं सांगितलं त्यामुळे. तरी आज्जी मला म्हणत होती, अंगावर गरम घालून जा म्हणून. मलाही आणायला हवं होतं काहीतरी. आता काय, आता बसा कुडकुडत सहलभर. या उन्हाचाही भरवसा नाही. नको तेव्हा येतं आणि हवं तेव्हा नकारघंटा. चालायचंच.

एकीकडे पिशवी आणि दुसरीकडे पाण्याची बाटली सांभाळत आम्ही तिघी भिंतीकडे येऊन उभ्या राहिलो. अजूनही सगळीकडे अंधारच दिसत होता. मला “काळजी घे हो...” असं म्हणून आज्जी जायला निघाली, तेवढ्यात बाबूराव तिला भेटले. आमची आज्जी सगळ्यांशी गोडही बोलू शकते आणि मधूनच जिभेवर मिरची ठेवल्यासारखंही. परवा बाबूरावांनी आमच्या बागेची थोडीफार मशागत केली होती, त्यामुळे ते दोघं त्याचबद्दल बोलायला लागले. त्यांचं बराच वेळ बोलणं चालू होतं. एरवी मी गप्पांमधे रंगून जाणारी,पण आज लक्षच लागत नव्हतं. तो कुठे राहिला? अजून आला कसा नाही? मी अस्वस्थ झाले होते. हातातली पिशवी मी जोरजोरात मागेपुढे हलवायला लागले आणि मला वाटलं तेच झालं.

“अयाई ग! लागलं ना सुमे” माझी पिशवी कोणाच्या तरी गुडघ्याला चांगलीच लागली होती.

लंपन! इथेच होता हा खुळा! बोललाही नाही माझ्याशी एवढ्या वेळात. अंधारलेलं आहे म्हणून काय झालं? आज्जीचा आवाज नाही आला त्याला? मी वैतागलेच.

“घे तुझी शिक्षा! एवढा वेळ नुसत्या गप्पा ऐकतो आहेस आणि मला एका शब्दानेही बोलला नाहीस! का रे? ओळखत नाहीस मला तू?” त्याला चांगलं झापायच्या विचारात होते मी. 

“मला काय माहिती तू इथे आहेस? बरं सोड, फिरून येऊ मैदानापाशी. बाबूराव आम्ही भटकून येतो!” धूसरशा प्रकाशात चाचपडत, त्याने माझा हात पटकन पकडला आणि आम्ही पळत पळतच मैदानाच्या पायऱ्यांपाशी गेलो. आम्ही येणार ते बहुतेक शाळेला माहीत असणार, कारण शाळेचं फाटक उघडच होतं. मैदानाच्या पायऱ्या इतक्या गारेगार असतात! संगमरवरीच आहेत बहुतेक. त्यात आज पहाटे इतकी थंडी होती, की माझे पाय बधीर झालेले तिथे बसल्यावर. लंपनने मला त्याच्या वर्गातल्या परळ्या आणि परळ्याच्या भावाबद्दल सांगितलं. त्या दोघांनी त्याच्यांकडच्या मोठ्या, नाही भल्यामोठया (लंपन तसेच म्हणाला), पिशव्या आणि जास्तीचे डबे कुंपणातच लपवून ठेवले होते. सहलभर बाळगायला नकोत म्हणून. दोघे चावटच आहेत. आधी एवढं सामान आणायचं आणि मग लपवून ठेवायचं, त्यानंतरचा मास्तरांचा मार तो वेगळाच. नसत्या उठाठेवी.

आम्ही आणखी बोललो असतो, पण तुरा पाटील मास्तर आले आणि आल्याआल्या त्यांनी सगळ्यांवर ओरडायला सुरुवात केली. मग वेलंगीबाई आल्यावर ते जरावेळ शांत होते, पण बाई सूचना देत असताना कोणीतरी आगाऊपणा केला म्हणून ते परत डाफरले. बाईही तशा जमदग्नीच्या अवतार आहेत, पण आज जरा शांत दिसत होत्या. त्यांनी केसात मोगरा माळला आहे हे मला केवढं नंतर लक्षात आलं. नंतर लक्षात यायला कारणही तसंच होतं म्हणा.

सगळी मुलं आल्यावर मास्तरांनी हजेरी घेतली आणि दोघादोघांच्या जोड्या करायला सांगितल्या. मी आणि शिवलीला एकत्र आलो. बाईंच्या सर्वात मागची, पहिली जोडी. लंपनने सर्वेश देशपांडेसोबत जोडी केली. ते रांगेत खूप मागे गेलेले. जोड्या झाल्यावर आम्ही निघालो - असरग्याच्या असर्गेश्वर मंदिरात.

झाडाझुडपांमधल्या नागमोडी वाटा घेत आम्ही कधी उतारावरून, तर कधी चढांवरून पळत होतो नुसते. आजूबाजूचं दृश्य पाहताना मला वेगळीच शक्ती मिळाल्यासारखं झालं होतं. त्यात मनात सारखे लंपनचे विचार. फांदीवरच्या दोन निळ्या पक्ष्यांना चोचीत चोची घालताना पाहून, दोन खारींची लपाछपी पाहून, एका बारीक खोडाला सुगंधी फुलाची वेल लगडलेली पाहून मला लंपन आणि माझे तळ्याकाठचे क्षण आठवत होते. अंधाऱ्या खोलीत नुसतेच बसून काढलेले ते तास डोळ्यांपुढे येत होते. मला काय झालं होतं ते माहीत नाही, पण आज लंपनला माझ्या मनातलं सांगायलाच हवं होतं.

हे सुखाचे विचार करण्यात मी गुंग होते, तेवढयात तुरा पाटील मास्तरांच्या आवाजाने एकदम दचकून भानावर आले. ते जोरात म्हणाले,“ऐका रे! हा मुलगा गाणं गातोय”. कोण बाई चालता चालता गाणं गायचं म्हणतो, अशा विचारात मी मागे वळले; तर पाहते काय! लंपनचा जोडीदार कुठेतरी दुसरीकडेच होता आणि त्याच्या जागी ही चंपा करजगीकर प्रकट झाली होती. 

चंपाने लंपनचा हात पकडलेला आणि ती त्याच्याकडे, तो म्हणजे तिचं सर्वस्व असल्यासारखं पाहत होती. लंपनही किती चावटपणा करतो! सगळं चालतं कसं ह्याला? तेसुद्धा माझ्यासमोर! 

त्याला हे माहीत नाहीये का, की आमची मैत्री ही फक्त मैत्री राहिली नाही आहे?
नाही नाही, या अमंगळ गोष्टी आत्ताच थांबवल्या पाहिजेत. जळो ती चंपा!


~~ २. गान ~~


मी रांगेत होते सगळ्यात पुढे. लंपन आणि ती बया रांगेच्या मध्ये कुठेतरी होते. आता त्यांची जोडी साखळी करूनच फोडावी लागेल, असा मी विचार करत होते. माझ्या मागे लता आणि लक्ष्मी होत्या, त्यांच्या पाठी आणिक दोन-चार जोड्या आणि त्यामागे मुलांच्या तीन जोड्यानंतर लंपन होता. आम्ही तसे बरेच शिस्तीत होतो. त्यामुळे रांग मोडली असती तर वेलंगीबाईंचा ओरडा खायला लागला असता. त्यामुळे सावध चाल करून मगच दरवाज्यात घुसू, असं मी ठरवलं.

तेवढ्यात लंपन गायला लागला- 

गगनि उगवला सायंतारा
मंद सुशीतल वाहत वारा 
हाक तुझी मज स्पष्ट ऐकू ये
येई सखे ये बैस जवळि ये...

‘हाक कितीही वेळा ऐकू आली आणि मला कितीही वेळा तू जवळ बोलावलंस तरी मी काही यायचे नाही.’ मी मनात म्हणाले. मास्तरही लंपनवर वैतागले होते.

“मूर्ख आहेस! संध्याकाळचं गाणं सकाळी? दुसरं म्हण!” त्यांनी लंपनला झापलं. लंपनने नवं गाणं चालू केलं-

आलो तुझ्याच दारी
मी प्रीतिचा भिकारी

‘तुझी चंपाच येईल तुझ्या दारात! मी नाही येत जा!’ माझे विचार थांबत नव्हते. माझ्याबरोबर मास्तरही शांत झाले नव्हते. 

“कसलं भिकाऱ्याचं गाणं! तिसरं म्हण.” ते खेकसले.

मग लंपनने कसलं ते सैनिकाचं गाणं म्हणायला सुरुवात केली. मास्तर खूश झाले असावेत, कारण त्यापुढे ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा’ आणि अजून दोन-तीन गाणी लंपनने गायली. 'गर्जा जयजयकार' म्हणताना रिमझिम पाऊस पडायला लागला. मी आणि शिवलीला 'ओलं व्हायला नको अन् नंतरची चिकचिक नको' म्हणून वेलंगीबाईंच्या पाठोपाठ वडाच्या झाडाखाली पळालोच. उघड्या रस्त्यावर चार-पाचच मुलंमुली होत्या. लंपनच्या वर्गातली दोन मुलं पावसात भिजायचं म्हणूनच तिथे थांबली होती. बाकीची दोघं एखाद्या प्रेमी युगुलासारखी हातात हात धरून गाणी गात होती. म्हणजे एकच गात होता. लंपनला गाणी गाताना आजूबाजूचं कधीच भान राहत नाही. मागे एकदा आज्जी आणि आजोबा (माझे हं) त्याला तळ्यापाशी थांबलेलं बघून हाक मारत होते, तर हा आपल्याच गुंगीत. शेवटी त्याजवळ जाऊन पाठीवर धपाटा घातला आजोबांनी, तेव्हा कुठे भानावर आला.

पाच-दहा मिनिटं पाऊस पडून थांबल्यावर परत रांग बनायला लागली. पोरंपोरी आपापल्या जागेवर येत होती, तेव्हाच माझ्या लक्षात आलं - हीच ती योग्य वेळ. मी शिताफीने लंपनच्या मागे उभ्या राजम्मा अंकळगेरीला ‘पुढे जा’ असं खुणावलं आणि तिच्या शेजारच्या रमाचा हात पकडून  दुसऱ्या हाताने ‘शुक्’ची खूण केली. ती गप्पच बसली, तशी ती चुगली करणाऱ्यातली नव्हतीच कधी. पण आपल्याकडून सारी काळजी घ्यायला हवीच. 

माझ्या बरोब्बर पुढे असलेल्या लंपन आणि चंपाकडे मी काहीवेळ पाहत होते. शत्त्रूच्या दारी घुसलो, पण शत्रूशी दोन हात कसे करावेत याचे डावपेच कुठे आखले होते?

पण मी जास्त विचार करण्याच्या आधी शत्रूनेच मला संधी दिली. चंपा लाडात येऊन लंपनच्या घट्ट पकडलेल्या हाताला झोके देत म्हणाली, “ए, तू किती सुंदर गाणी म्हणतोस रे!" आणि माझा संयम सुटला. 

“ए हे हे, म्हणे कित्ती छान गाणी म्हणतोस! गाण्यातलं काही कळतं का तुला? आणि गाणी म्हणून घसा दुखायला लागला म्हणजे? नुसती सोनचाफ्याची फुलं केलात माळली म्हणजे झालं वाटतं सगळं!” मी एका दमातच सगळी गरळ ओकून टाकली तर ती बया माझ्यावरंच ओरडली. “तू काय गं वेगळं करतेस! या भोळ्याभाबड्या लंपनच्या आजूबाजूला उंडारत गाणी गात असतेस ती! अन् आता मलाच बोलतेस!” आपल्या बारीक किनऱ्या आवाजाला जेवढं तारस्वरात नेता येईल तेवढं नेऊन ती म्हणाली. "निदान मला कळतं तरी गाणं! तुझ्यासारखं नुसते सारेगम नाही येत बरं मला!" मी ठसक्यात म्हणाले.

या विषयावरून पुढची दहा-पंधरा मिनिट आमच्यात खडाजंगी झाली, पण शेवटी तिला हार मानावीच लागली. जोरजोरात पाय आपटत तिनं पुढे असलेल्या विजयाचा हात धरला. धरला नाहीच, ओढला. 

भांडण संपून रांग पुढे चालायला लागली, तेव्हा मात्र मला रहावलं नाही. मी लंपनला म्हणाले, “ए, माझं ते आवडतं गाणं म्हण ना…” लंपनला पहिल्यांदा काहीच कळलं नाही. “कोणतं?” त्याने विचारलं “ते रे! ‘रानात सांग कानात आपुले नाते...’” लंपनने माझ्याकडे पाहून मान डोलावली आणि गाणं गाण्यासाठी तोंड उघडलं, पण तेव्हाच आजूबाजूची मुलं शाळेत शिकवलेल्या कविता म्हणू लागली. अवतीभोवती दाट, हिरवीगार झाडी, वाळक्या पानांमुळे लालसर दिसणारी पायवाट, मध्येच ऐकू येणारी पक्ष्यांची चिवचिव आणि इथे आमच्या सगळ्यांच्या गाण्याचं मोहोळ उठलेलं. गाणी गाण्यात आम्ही इतके गुंग होतो, की उतारावरून खाली येऊन मंदिरापाशी कधी पोचलो ते कळलंच नाही. छान वाटत होतं एकदम. 

समोरचं दृश्य पाहून आम्ही भानावर आलो. मास्तर म्हणाले, “आलं आपलं मंदिर!” आणि सगळ्या मुलांनी स्वतःला परिसरात झोकून दिलं. छोटे-छोटे झरे, झऱ्यांवरचे धबधबे आणि धबधब्यांच्या जवळ हिरवीगार झाडं यांच्यात ते मंदिर वसलेलं होतं. ते पांढरंशुभ्र मंदिर मला खूप म्हणजे खूप आवडलं. हवेत गारवा होता, पण सकाळसारखा अंगाला बोचणारा नाही, तर समाधान देणारा. ओल्या मातीचा वास येत होता आणि असर्गेश्वर मंदिर नटलंच होतं जणू या निसर्गामुळे. 

धबधबे आणि झरे पाहिल्यावर मुलं लगेच भिजायला पळली. मी शिवलीलासोबत बुचाची आणि केवड्याची फुलं गोळा केली आणि नंतर एका धबधब्याखाली जाऊन चिंब भिजलो. काहीवेळाने वेलंगीबाईही आम्हाला येऊन मिळाल्या. याच वातावरणात लंपनला ती गोष्ट सांगायला हवी होती. हीच ती योग्य वेळ होती.

लंपन सगळ्यात मोठ्या धबधब्याखाली उभा होता. मी हळूच त्याच्या डाव्या बाजूला येऊन उभी राहिले, आणि त्याचा हात धरला. लंपन त्याच्या तंद्रीतून बाहेर पडतच होता. तेवढयात मी त्याच्याकडे डोळे भरून पाहिलं. त्याच्या तपकिरी डोळ्यांवर, टोकदार नाकावर, केसात साचलेल्या आणि चमकणाऱ्या पाण्याच्या थेंबांवर मी नजर टाकली. हळूहळू माझ्या चेहऱ्यावर हसू तरळलं. लंपनसारखी मलाही तंद्री लागणार होती, तोच लंपनने माझ्याकडे पाहिलं. 

"मगाशी चंपाने संगितलेली सगळी गाणी म्हणलीस आणि मी सांगितलेत एकही नाही! असं कसं?" त्याच्या पकडलेल्या हाताला झोके देत मी त्याला म्हणलं.

लंपन  माझ्याकडे पाहून नेहमीसारखा गोड हसला मग समोरच्या कोसळत्या धबधब्याकडे त्याने एकदा पाहिलं आणि मोठ्ठा श्वास घेऊन तो गायला लागला - 

रानात सांग कानात आपुले नाते
मी भल्या पहाटे येते 
पाण्यात निळ्या, गाण्यात
भावना हलते
हळुहळू कमलिनी फुलते
त्या तिथे तुला सांगते... 

तो गातागाता अचानक थांबला. काहीतरी अचानकपणे समजल्यासारखं त्याने माझ्याकडे पाहिलं.

“याआधी मला आजच्याइतका या ओळींचा अर्थ कळला नव्हता!” तो म्हणाला. मी त्याच्याकडे हसून पाहिलं. 

पुढचा काही वेळ आम्ही गप्प होतो आणि आमचे डोळे बोलत होते. झऱ्याजवळच्या  फुलझाडावरच्या फुलांवर दोन केशरी फुलपाखरं पिंगा घालत होती. एका लयीत. जणू काही ती कसले तरी गान गात होती. आमच्या दोघांच्या अंगावर पाण्याचे तुषार उडत होते. सूर्यप्रकाशात ते तुषार हिऱ्यासारखे चमकत होते.

“अर्थ सांगायचा होता, म्हणूनच तुला म्हणायला लावलं हे गाणं!” मी पुटपुटले, पण त्याला स्पष्ट ऐकू जाईल अशा आवाजात. 

लंपनच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. आश्चर्याची पुसटशी छटा त्याच्या डोळ्यांमध्ये मला दिसली. लगेचच ती छटा आनंदात बदलली. मी त्याच्याकडे हसून भुवया उंचावल्या.

त्याने माझ्याकडे पाहून मान डोलावली. धबधबा आता मधुर स्वरात कोसळत होता.

~~~ooo~~~

 

सदर लेखन हे फॅन फिक्शन आहे. यातील पात्रं परिचित असली तरी ही लेखकाची स्वतंत्र अभिव्यक्ती आहे. या लेखन प्रकाराबद्दल अधिक माहिती या विकीपीडिया पानावर मिळेल