समु आणि दुर्बिण (गोष्ट)

समु आणि दुर्बिण
लेखन: गोपाल वसंतराव खाडे
चित्र: पारूल समीर

समुला स्कूलबसमध्ये सोडून आई घरी आली. आईने जेवण आटोपले. स्वयंपाक घरातली आवराआवर करून तिने आपला मोर्चा समूच्या खोलीकडे वळवला. तिला वाटले हातोहात समूची खोली आवरुन घ्यावी व मगच झोपायला जावं. आई समूच्या खोलीकडे जात आहे, हे बघून समुची लहान बहीण अनन्यापण आईच्या मागे निघाली. आईने समुच्या खोलीचा दरवाजा लोटताच आतले चित्र पाहून तिला आश्चर्याचा धक्काच बसला. ती आतले चित्र बघतच राहली.
“अनन्या, कसला पसारा मांडला व या पोरानं.”


“बाप्पा बाप्पा! सबणच्या सबण ग्रह याच्या खोलीतनी ठाण मांडून बशेल हायेतं.”
“हो ना! पाह्य तरी, काही ग्रह इथं खाटिवर काही भिताडावर, तर काही जण तं छतावर जाऊन बशेल हायेतं.”
आईला आठवले, मागच्या महिन्यात समुच्या मामांनी त्याला खगोलशास्त्रावरील दहा बारा पुस्तकांचा संच पाठवला होता. हा त्याचाच परिणाम आहे हे ओळखायला तिला वेळ लागला नाही.
अनन्या म्हणाली, “आई, काहयी म्हण, पण समुड्यानं ग्रह इतले डिक्टो बनविले ना, की असं वाटते का सारे ग्रहचं घरात उतरले का काय!”
आईला पण मुलाचे जाम कौतुक वाटले. टेबलावर एक भली मोठी दुर्बीण ठेवली होती. पण, दुर्बिणीवरून ही दुर्बिण मात्र विकतची नक्कीच वाटत नव्हती. दुर्बिणीच्या बाजूलाच एक पुस्तक पडलेले होते. पुस्तकाचे नांव होते ‘घरगुती साहित्यापासून दुर्बिण कशी बनवावी?’ आईने ओळखले, गेल्या कित्येक दिवसांपासून दार बंद करुन समूचा हाच खटाटोप सुरू होता तर.

शेजारी सुरू असलेल्या शाम काकांच्या बिल्डिंगवर तो रोज शाम काकांशी काहीतरी बोलत बसायचा. शामकाकांनी त्यांच्या बिल्डिंगवरील बांधकामातून उरलेले पाइपचे तुकडे त्याला दिले होते. पठ्ठ्याने ते घासून पुसून स्वच्छ केले. बाबांकडून पैसे घेऊन त्याने दोन भिंग विकत आणली. पण आवश्यक ते व मनाजोगते भिंग त्याला भेटतच नव्हते. काही अडचण आली, की तो शामकाकांना फोन करून विचारायचा आणि काका त्याला योग्य उत्तर देऊन त्याच्या शंकांचे निरसन करायचे. त्यामुळे शामकाकांशी त्याचे चांगलेच मेतकुट जमले होते. याही वेळी त्याने शाम काकाला भिंगाविषयी फोन केला. शामकाकांनी त्याला विज्ञान साहित्य विकत मिळते त्या दुकानाचा पत्ता दिला. समु तिथं पण जाऊन आला. तिथे पण ते भिंग मिळाले नाही. तो नाराज होऊन दुकानातुन बाहेर निघतांना दुकानातील जुम्मनचाचांनी त्याला “समु” अशी हाक दिली. समु माघारी फिरला, “काय जुम्मनचाचा?”
“समु ,तुले पाहिजे असलेली वस्तू आता या शहरात फक्त भंगारगल्लीतला चिरागचाचाच तुले देऊ शकते बाबू.”
“काहो जुम्मनचाचा, चिरागचाचा म्हणजे थोच माणूस ना, ज्यांच्याकडं हजारो दिवनाल्याचा संग्रह आहे थो?”
“हो हो समु अरे थोचं चिरागचाचा”
समुला आठवलं. मागे एकदा तो शामकाकांसोबत गावात फिरायला आला होता, तेव्हा त्यांनी त्याला चिरागचाचांकडे नेले होते. त्यांच्या घरावर मोठी पाटी होती ‘दिया घर’
“शामकाका हे कसले नाव हो दिया घर?” समुने विचारले होते
“समु, आगे आगे देखो. सब पता चलेगा” शामकाका हसतच म्हणाले होते.
अंगणाच्या दारातली मोठी दीपमाळ पाहुन समु म्हणाला होता, “काका, दिपमाळ होयं का काय! होय काका? आणि ते बी घरातनी.”
घरातील दिपमाळ लक्ष वेधून घेत होती.
“काका, कोणाच्याच घरातनी या आधी म्या अशी दिपमाळ पाह्यलेली नाय. दीपमाळ फक्त मंदिरातचं पाह्यली होती म्या.”
त्यावर शामकाका म्हणाले होते, “अरे, थेच तर गंमत हाये! चिरागचाचा व त्यायच्या घराची.” समुने चाचाच्या घरातील दिवनाल्याची आरास पाहून तोंडात बोटं घातली. घरात एक दोन नव्हे तर हजारो दिवनाल्या व्यवस्थितपणे मांडून ठेवल्या होत्या.
चिरागचाचाने शामकाकांचे स्वागत करीत, "और केसे हो शामभाई. साथ मे यहं छोकरा कौन है?"
समुची ओळख करुन देत, “चिरागभाई ये है समु. हमारे पडोस मे रहता है. इधरसे गुजर रहे थे, तो सोचा आपसे मिलता चलूं और समुको आपका आशियाना दिखाऊ".
समुने विचारले होते ”शामकाका, चिरागचाचाकडे इतल्या दिवनाल्या कशा हो?”
काकांनी सांगितलं होतं “अबे, दिवनाल्याचा संग्रह करायचा नाद हाये त्यायले. ते कुठंबी जातीन तं तिथून दिवनाल्या आणल्याबिगर राहयत नायी. एका दिवनालीपासून सुरुवात केली आणि आज त्यायच्या घरी हजारो दिवनाल्या हायेतं.”
समु आ वासून सारं घर बघत होता.
"चिरागचाचा,तुमच्यावाल्या संग्रहातनी दगड,धातू व मातीच्या बी दिवनाल्या हायेत बुवा."
"संग्रहात फक्त दिवनाल्याची संख्या वाढावी एवढाच माहया उद्देश नसते, बाबु! तं त्या मागचा इतिहास शोधण्याची तळमळ असते. माह्या प्रत्येक दिवनालीच्या मागे एक विलक्षण कथा आहे.”
चाचा त्यांच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्यांना ते दिवे दाखवून त्यामागची कथा पण सांगत. दिव्यांसोबतच त्यांच्याकडे अनेक चमत्कारिक वस्तू सुद्धा त्यांच्या संग्रहात होत्या. समू भुतकाळातुन बाहेर आला. जुम्मनचाचाने चिरागचाचाचे नाव घेताच समुला खात्री पटली, की आपल्याला हवे असलेले भिंग नक्की तिथेच मिळणार.

दुकानाबाहेर उभी असलेली सायकल त्याने काढली आणि तो सुसाट वेगाने चिरागचाचाच्या घराकडे निघाला. चिराग चाचांनी हसतचं त्याचे स्वागत करत “आओ समु बेटा, आज कैसे चिराग चाचाची याद आली.”
समुने ग्रह, दुर्बिणीविषयी सर्वच माहिती चिराग चाचाला सांगितली.
"पण चाचा,मले पाह्यजे तसा भिंग भेटत नसल्यानं माह्यी दुर्बिण काम करुन नायी राह्यली हो."
चिरागचाचा, “देखो समु बेटा,तुले कसा भिंग पाहयजे हे तं मले नायी मालुम पण मी तुले एक पेटी दाखवतो तुले त्यातलं जे आवडीन ते तू घ्युन जायं.”
चाचाने मोठी पेटी उघडून समुच्या समोर ठेवली. पेटीत वेगवेगळ्या प्रकारचे गोल काचा, आरसे होते. त्याला आवश्यक असलेले भिंग त्याने निवडले, परंतू एका निळ्या रंगाच्या काचाने त्याचे मन वेधून घेतले. त्या निळ्या काचेतून अधुनमधून प्रकाश निर्माण होत होता असे समुला वाटले. त्याने तीन चार काचा घेतल्या. तो चिरागचाचांना काच दाखवण्यासाठी घेऊन गेला. “चाचा, याचे किती पैसे देऊ?” असे त्याने विचारताच चिरागचाचा खो खो करून हसले आणि म्हणाले, “बाबु, या काचेच्या तुकड्याची किंमतच काय रे? तुया चेहऱ्यावरच्या हसून मले लयं काही देलं.”
“चिराग चाचा, शुक्रिया.” म्हणून व सलाम करून तो सायकल दामटतच घरी आला.

आज कोणत्याही परिस्थितीत दुर्बिण पूर्ण करायची असे त्याने रस्त्यातच मनोमन ठरवले होते. घरी जाताच त्याने जेवण पटापट उरकले. त्याने आणलेली दोन भिंगं व एक काच पाइपमध्ये व्यवस्थितपणे लावले. दोन्ही पाइप व्यवस्थित अंतरावर लावून घेतले. बराच वेळ खटाटोप करून त्याची दुर्बिण शेवटी तयार झाली. दुर्बिण घेऊन तो आता तडक घराच्या टेरेसवर आला. त्याने आपली दुर्बिण एकदाची सेट केली. टेरेसवर सर्वत्र अंधार होता आणि त्याने दुर्बीणीमधून पाहायला सुरुवात केली. दूरवरचे ग्रह जवळ दिसत होते.

पण तेेव्हढ्यात काहीतरी गडबड झाली. दुर्बिणमधे लावलेल्या निळया काचेतून प्रकाश लुकलुकला. प्रचंड आवाज झाला आणि कुणीतरी समुला दुर्बिणमध्ये ओढून घेतले. मगाशी लुकलुकणारा प्रकाश फेकणार्‍या निळया काचेतून आता मात्र निळ्या प्रकाशाचा मोठा झोत निघत होता. एखाद्या घोड्यावर बसवावे तसे समुला त्या निळ्याझोताने आपल्यावर स्वार करुन घेतले. समुच्या आजूबाजूला प्रचंड अंधार होता. मात्र निळ्या प्रकाशझोतामुळे समोरचा परिसर लख्ख दिसत होता. त्याच्या हातात काहीही नव्हते. निळा प्रकाशझोत जिकडे नेईल तिकडे समु चालला होता. त्याला मजा पण वाटत होती, पण मनातुन तो पार घाबरला पण होता. या प्रकाशझोतावरून आपण चुकून पडलो तर थेट पृथ्वीवरच जाऊन आपटणार व आपला मृत्यूच होणार अशी त्याला भीती वाटत होती.मग मात्र त्याला शामकाकाची आठवण झाली. शामकाका नेहमी म्हणायचे, “संकट आली तर घाबरायचे नाही. घाबरल्याने संकट कमी होत नाही तर ती वाढतात.” त्याने मागे पाहिले तर मागे त्याची दुर्बिण अजूनही निळा प्रकाशझोत फेकत होती. दुर्बिणीचे समोरचे झाकण हवेत उडत होते आणि त्याचवेळेस त्याला मार्ग सुचला जर आपण दुर्बिणीचे झाकण लावून घेतले तर.

त्याने दुर्बिणीचे झाकण लावले आणि काय आश्चर्य! घराच्या टेरेसवरुन ज्या ग्रहाकडे तो दुर्बिणीतून पाहत होता त्याच ग्रहावर तो आणि त्याची दुर्बीण स्थिरावली. मात्र निळा प्रकाशझोत कुठे गायब झाला ते समजायला मार्ग नव्हता. आता घरी कसे जायचे? ही नवीनच समस्या समुच्या समोर उद्भभवली. आता मात्र तो घाबरला, पण संकटाला डगमगणार्‍या मुलांपैकी तो नव्हता. त्याच्या लक्षात आले होते, की टेरेसवरुन दुर्बीणीतून जो ग्रह आपण पाहिला होता त्याच ग्रहावर आपण आलो आहे आणि आता जर आपण याच दुर्बिणीतून आपल्या घराचे टेरेस पाहिले तर नक्कीच आपण टेरेसवर पोहचणार. त्याने दुर्बिणीचे लावलेले झाकण उघडले, पण आता निळा झोत बाहेर आला नाही त्याने दुर्बिणीच्या मागच्या बाजूने दुर्बिणीतून आपल्या घराच्या टेरेसकडे पाहिले. पुन्हा त्याच निळया काचेतुन प्रकाश लुकलुकला.

कोणीतरी पुन्हा त्याला दुर्बिणीच्या आत जोराने ओढले. दुर्बिणीतून पुन्हा निळा झोत बाहेर आला. झोताने त्याला परत आपल्यावर स्वार करून घेतले आणि परत तो समुला घेऊन निघाला. आधी ग्रहाकडे जाताना त्याने प्रकाशझोतावरून आजूबाजूचा परिसर बघितला नव्हता, कारण तो जाम घाबरलेला होता. परंतू आता मात्र तो घरी जाणार म्हणून आनंदी होता. त्यामुळे तो आजूबाजूचा परिसर न्याहळू लागला. सगळे कसे मजेशीर वाटू लागले. प्रकाशझोतावरून पृथ्वी त्याला खूप छोटी भासत होती. मोठमोठ्या बिल्डिंग किड्यामुंग्यासारख्या दिसत होत्या. डोंगर,टेकड्या,नद्या सार्‍या कशा इटुकल्या पिटुकल्या वाटत होत्या. तो गावात शिरताच सगळे जण त्याच्याकडे आश्चर्याने पाहात होते, की समु कशावर बसला आहे. समुपण ओळखीच्या सर्वांनाच हात दाखवत होता समोर त्याला आपल्या घराचे टेरेस दिसले. त्याने लगेच दुर्बिणीच्या समोरच्या भागाचे झाकण लावून घेतले. तो व त्याची दुर्बिण टेरेसवर लगेच स्थिरावले. मागच्या वेळेप्रमाणेच निळा झोत याही वेळेस गायब झाला होता. समु कुठे गेला म्हणून त्याची आई घरी त्याची वाटच पाहात होती. समुने धावत जाऊन तिला सर्व हकीकत सांगताच ती ‘खो खो’ हसत सुटली. तो तिला वारंवार सांगत होता, “अवं हे सबण खरं हाये, अवं हे सबण खरं हाये” आणि आई मात्र पुन्हा खो खो करून हसत होती. समु मात्र ही अद्भुत गोष्ट आपल्या मित्रांना सांगण्याकरता घरातून केव्हाच पसार झाला होता.

---

लेखन: गोपाल वसंतराव खाडे - जि.प.विद्यालय कामरगांव ता. कारंजा जि.वाशीम
चित्रे: पारूल समीर - पुणे