बी (कथा)

बी
लेखन: स्वाती देवळे
चित्र: प्रीता

एक होती नाजुकशी छोटीशी बी. थोडीशी घाबरट,जराशी गोंधळलेली. एका दुकानात पिंपात पडून असायची. जेव्हा जेव्हा शेतकरी दुकानात यायचे, तेव्हा सगळ्या बिया पुढे पुढे करायच्या. ही चिमुकली बी मात्र चुकून जरी दुकानदाराच्या मापट्यात आली, तरी टुणकन्‌ उडी मारून परत पिंपात लपायची. सगळ्या बियांना खूप आश्चर्य वाटायचं.

त्या तिला म्हणायच्या, “अगं, तू वेडी आहेस का? अशी काय करतेस? शेतकरी किती प्रेमाने आपल्याला नेतात, रुजवतात. किती मस्त वाटतं.”
“नको बाई, मला खूप भिती वाटते. शेतकरी खोल खोल मातीत मला पुरणार, त्यावर बदाबदा पाऊस पडणार. मला तर विचारांनीच गुदमरल्यासारखं होतं. मी आपली इथेच सुरक्षित आहे.” तिच्या अशा बोलण्यावर सगळ्या बिया तिला हसायच्या, चिडवायच्या, समजावून सांगण्याचा प्रयत्न करायच्या, पण चिमुकल्या बीच्या मनातली भिती काही केल्या कमी होतच नव्हती.

एक दिवस काय झालं, दुकानदाराने दुकान बंद केलेलं तिने पाहिलं आणि मोठ्ठा निश्वास सोडला. पावसाळा जवळ आला होता, त्यामुळे त्या दिवशी बि-बियाणं घेण्यासाठी दुकानात शेतकऱ्यांची खूपच गर्दी झाली होती. चिमुकली बी त्या दिवशी उड्या मारून मारून इतकी दमली होती, की तिला अगदी गाढ झोप लागली.

अचानक कुठल्याश्या धक्क्याने चिमुकली बी जागी झाली. तिच्या अंगाला सूक्ष्म हेलकावे बसत होते. आजुबाजुला बिया दाटीवाटीने बसलेल्या. एकदम तिच्या लक्षात आलं, आपण आपल्या नेहमीच्या पिंपात नाही. अरे बापरे, मी कुठे आहे? इतकी गर्दी का झाली आहे इथे? आई, ग्गं, कसला तरी वास येतोय. कसला वास आहे हा? नेहमीच्या खतांचा किंवा औषधांचा ओळखीचा वास नाहिये हा? कुठे आहे मी?’ असा विचार करत असताना परत तिला एक धक्का बसला. चिमुकली बी दुसऱ्या बीच्या अंगावर आपटली.
“आई ग्गं, काय चाललंय? मला कुठे नेतायेत? मला खूप भिती वाटतीये.” असं म्हणत म्हणतच चिमुकली बी मुसमुसत रडू लागली.
"अगं रडतीयेस काय? आपण आता आपल्या आईकडे चाललोय. आम्ही सगळ्या जणी तर, खूप म्हणजे खूप खूष आहोत. तू काय रडतीयेस?"
"कोण आई? मला नाही जायचंय कुठे" चिमुकल्या बीला अजूनच रडू फुटलं.

तिने ह्ळूच पिशवीच्या बाहेर पाहण्याचा प्रयत्न केला. शेतकरी जोरात सायकल चालवत होता. भरभर मागे पडणारा रस्ता, पळणारी झाडं, फांद्याफांद्यावरून उडणारे पक्षी, मधेच दिसणारा एखादा प्राणी बघण्यात चिमुकली बी स्वतःचे रडणे काही वेळ विसरली. तेवढ्यात परत एक धक्का बसला आणि दुसऱ्या क्षणी सगळ्या बिया अंगणातल्या पोत्यावर मनमोकळ्या पसरल्या. चिमुकली बी भानावर आली. बाकी सगळ्या बियांचे हसणे खिदळणे चालूच होते, पण चिमुकली बी मात्र अजूनही लपण्याचा प्रयत्न करत होती.
शेतकरी सगळ्या बियांवरून प्रेमळपणे हात फिरवत होता. चिमुकली बी त्या स्पर्शाने जरा शांत झाली. आपण विचार केला होता तेवढे अवघड काही नसावे असे तिला वाटू लागले.

भल्या पहाटे शेतकरी सगळ्या बियांना शेतात घेऊन गेला. काळभोर शेत, त्यात केलेले शिस्तबद्ध वाफे, शेतात मध्यावर उभे असलेले मचाण, दुसरीकडे काठीला मडके लावून तयार केलेले बुजगावणे हे सगळं पाहून चिमुकल्या बीला गंमतच वाटू लागली.
शेतकरी पेरणी करू लागला, तशी चिमुकली बी पुन्हा घाबरून गेली आणि पिशवीच्या अगदी तळाशी जाऊन बसली. पण शेवटी तिची वेळ आलीच. दोन चार बियांबरोबर चिमुकली बी मातीत पडली. तिने डोळे गच्च मिटून घेतले.आता काय व्हायचे ते होवो. घाबरून तरी काय उपयोग! जीव गुदमरला तरी आता आपल्या हातात काहीच नाही.’ तेवढ्या काही क्षणात एवढे सगळे विचार तिच्या डोक्यात आले.

बी मातीत पडली आणि खोल गेली. पण तिला वाटलं होतं तसं तिचा जीव अजिबात गुदमरला नाही उलट एका प्रेमळ, उबदार, सुरक्षित ठिकाणी आपण आहोत असं तिला वाटू लागलं.

तिच्या मनात आलं, ‘आईचा स्पर्श का काय म्हणतात तो हाच असावा का? याच स्पर्शासाठी सगळ्या बिया त्या दुकानातल्या पिंपातून बाहेर पडण्याची धडपड करत असाव्यात कदाचित. अहाहा! किती मस्त वाटतंय. असं वाटतंय, कुणीतरी आपल्याला प्रेमाने जवळ घेतलंय, आपले लाड करतंय.’

एक दीड महिना कसा निघून गेला ते चिमुकल्या बीला कळलंच नाही. ‘माझ्या अंगावर काय पडतंय हे. आणि हा कसला दरवळ आहे? अहाहा ही कसली गार गार शिरशिरी येतीये माझ्या अंगावर. अरे, माझ्या अंगावर तर किती सुंदर कोवळे कोवळे कोंब आलेत. असा रंग मी तर पहिल्यांदाच पाहतेय. मस्त. माझ्याबरोबर आलेल्या सगळ्या बियांना सुध्दा असेच कोंब फुटले असतील का?’ चिमुकल्या बीला असंख्य प्रश्न पडत होते.
‘आई ग्गं, अरे ए, तुला कशाला बाहेर पडायचंय. किती अवखळ आहे हे रोपटं! अरे ए शहाण्या, मीच जन्माला घातलं नं तुला, मग माझंच ऐकत नाहीस म्हणजे काय!’

मातीच्या बाहेर येण्याची रोपट्याची धडपड बीला त्रास पण देत होती आणि सुखावत पण होती. शेवटी रोपट्याचा आणि पर्यायाने बीचा तो संघर्ष संपला. बीतून बाहेर पडलेले ते रोपटे आकाशाच्या दिशेने झेपावत मातीतून बाहेर पडले. बी अगदी आतून सुखावली, मोहरली, कृतार्थ झाली.