बाएं हाथ का खेल (कथा)

 बाएं हाथ का खेल (कथा)
लेखन व चित्रेः संज्ञा घाटपांडे

 

आज तर म्हणजे ‘हाईट ऑफ द हाईट्स’ झाली होती! आजपण आईनी भाजी बनवली नव्हती. कालच आम्ही ‘दही-साखर पोळी’वर गुजराण केली होती. आज परत तेच! माझं इतकं डोकं फिरलं ना, की बास! शाळेत सगळ्यांनीच काहीना काही ‘फॅन्सी’ आणलेलं. मी मात्र ‘लोणचं-पोळीची गुंडाळी आणि दहीसाखर! त्यातून बाबानी वेंधळेपणानी डबा भरलेला. कशाचंही झाकण कशालाही लावलेलं! त्यामुळे ‘ड्राय –फ्रूट्स’ चा डबा पिशवीतच सांडला. नॅपकिनचा तर पत्ताच नव्हता! आई नेहमी कसं व्यवस्थित सगळं लावून देते. पोळी चतकोर तुकडे करून, पातळ भाजीला ऍल्युमिनियम फॉईल लावून, न चुकता सोबत पाण्याची बाटली आणि ड्राय –फ्रूटचा छोटा डबासुद्धा. आज मात्र सगळाच ‘बट्ट्याबोळ’ झाला होता! आई-बाबांना मी ‘बोअर’ झालो होतो की काय, असा मला डाउटच आला!

   खरंतर सकाळी आमच्याकडे नेहमीच धांदल असते. प्रत्येकालाच आपापल्या ठिकाणी वेळेत पोचायचं असतं. आई-बाबांना ऑफिसला, अलोकदादाला कॉलेजला आणि मला शाळेत! बाकी सगळे आपापले तयार होतात, पण मला मात्र ‘कुणीतरी’ तयार करावं लागतं. (म्हणजे आई) तेव्हा सगळेच एकमेकांवर चिडचिड करतात आणि माझी ‘जबाबदारी’ एकदुसऱ्यावर ढकलतात. फक्त आईच माझं सगळं पर्फेक्ट करते. पण गेले ३-४ दिवस आईसुद्धा ‘ढकलंपंची’ करायला लागली होती. सगळेजण मला ‘इग्नोर’ करत होते आणि माझ्या डोक्यात ज्वालामुखी तयार होत होता!

  आज तर माझी पूर्णपणे सटकली! डब्यात परत ‘गुंडाळी’ बघून मी डबा खाड्कन बंद केला आणि मनाशी ठरवूनच टाकलं की घरी जाऊन फूल ‘राडा’च करायचा! सगळ्यांची अशी खरडपट्टी काढायची की बास! लहान मुलाला वाऱ्यावर सोडतात म्हणजे काय? रात्रीच्या जेवणापर्यंत मी माझ्या मनात भाषणाची जुळवाजुळव केली आणि सगळे एकत्र जेवायला बसल्यावर एकच ब़ॉंब टाकला!

   “या घरातले लोकं- स्पेशली आई - माझ्याबाबतीत खूपच निष्काळजी बनले आहेत. कुणालाच माझी जबाबदारी घ्यायची नाहीये. हे असंच चालू राहिलं तर एक दिवस मी बॅग उचलून घर सोडून जाईन.” (म्हणजे आजीकडे, पण हे काही मी सांगितलं नाही!) मी एका दमात बोलून टाकलं! मला वाटलं आई आता मला एक पेटवून देईल! (तसं ती कधीच मारत नाही, पण तिचे शब्दच मला दर्द देतात!) वरून आई जरी शांत दिसत असली, तरी आतून ती दात ओठ खात ‘कंट्रोल माया कंट्रोल’, असं म्हणत असावी असं मला वाटलं. बाबानी आईकडे एक ‘लुक’ टाकत तिला शांत राहायची खूण केली! “उद्याचा पूर्ण ब्रेकफास्ट तू बनवून दाखवलास, तर मीच बॅग उचलून घर सोडून जाईन.” आई चिडून म्हणाली. ‘शी! फूस! इतकं सोपं टास्क! नाश्ता बनवणं तर माझा ‘बाएं हाथ का खेल’ होता!’ तसंही हे लोकं साधं ऑम्लेट-ब्रेड तर खातात! “ई! त्यात काय! चल! चॅलेंज अॅक्सेप्टेड!”, मी म्हणालो. ‘उद्या सकाळी ‘सुपर-डुपर ब्रेकफास्ट’ बनवून सगळ्यांची बोलतीच बंद करतो’, असा विचार करत मी जेवण संपवून खोलीत गेलो.

    उद्या रविवार होता त्यामुळे सगळे ८.३०-९ पर्यंत लोळत पडणार होते! आणि गरमागरम ‘ऑम्लेट-ब्रेड’ बनवून मी सगळ्यांना ‘शॉक’ देणार होतो. ‘आठ बजे का अलार्म लगा दो!’ मी अलोकदादाला ऑर्डर दिली. मला वाटलं तो नेहमीप्रमाणे माझ्या अंगावर मोबाईल फेकेल आणि वसकन् ओरडेल, “स्वत:चा स्वत: लावायचा! मी काय नोकर आहे का तुझा?” पण तो माझ्या हातात मोबाईल आपटत म्हणाला, “हे काही तू बरोबर केलं नाहीस! तिचा खूप ‘इम्पॉर्टंट प्रोजेक्ट’ चालूए! तिच्यावर आधीच खूप लोड आहे. त्यातून तू तिच्या डोक्याला ‘शॉट’ दिलास, बावळटा! भोग आता! स्वतःच्या चड्डीची नाडी नाही बांधता येत आणि म्हणे मी घर सोडून जाणार!” ‘आईशप्पथ!’ आता तर या जाड्याची जिरवायलाच हवी होती! पण मी पण स्वत:ला ‘कंट्रोल’ केलं. उद्या हेच सगळे लोकं माझ्याकडे ‘आ’ वासून बघणार होते! अलार्म लावून मी शांतपणे ताणून दिली! मला एकदम ‘सेलिब्रिटी फिलिंग‘ येत होतं.

   सकाळी एकाच अलार्ममध्ये मी उठलो आणि दात घासून सरळ किचनमध्ये घुसलो. फ्रीज उघडला. ‘च्या मारी!’ तीनच अंडी उरलेली! आणि ब्रेड तर नव्हताच! ब्रेकफास्ट बनवण्यासाठी आधी सामानपण तपासावं लागतं हे मी साफ विसरलो होतो! आता काय करू? खाली जाऊन सामान आणण्यासाठी या माकडाचे पाय धरावे लागणार होते! कसंबसं मस्का मारून मी अलोकदादाला उठवलं. तो तर उठायला तयारच नव्हता! शेवटी अगदी मोठं ‘एहसान’ करतोय असं दाखवत, तो उठून सामान आणायला खाली गेला. आज माझी ‘मजबुरी’ होती म्हणून नाहीतर याला धुतलंच असतं मी! 

   १०-१५ मिनिटांनी अलोकदादा उगवला. नशीब! त्यानी सगळं सामान व्यवस्थित आणलं होतं. माझ्यासमोर पिशवी भिरकावत तो आतल्या खोलीत पळाला जेणेकरून अजून काही काम गळ्यात पडणार नाही. त्याच्याकडे दुर्लक्ष करत मी ब्रेड उघडला, त्याला बटर लावलं आणि अंडी फोडायला घेतली. मला वाटलं होतं तसं ‘स्टाईलसे’ काही मला ती फोडता आली नाहीत आणि सगळा राडा झाला! एक अंडं तर माझ्या हातावरच फुटलं आणि २-३ टरफलाचे तुकडे भांड्यात पडले! ही सुरुवात काही माझ्या अपेक्षेप्रमाणे झाली नव्हती. मी कसंबसं अंड्याचं बॅटर तयार केलं. काहीच धड होतं नव्हतं. कुणाकडे मदत मागायची काही सोय नव्हती. अलोकदादानी तर पुढे आठवडाभर मला टोमण्यांनी हैराण केलं असतं. 

  मी गॅस पेटवला. आईनी मला गॅसवर दूध गरम करून आपापला ‘बोर्न-व्हीटा’ बनवायला शिकवलं आहे आणि त्यावर आजीची बोलणी पण खाल्ली आहेत, की ‘इतक्या लहान पोराला गॅसजवळ जाऊच कसं देतेस?’ पण आई काही तिला जुमानत नाही आणि माझ्यासाठी ‘डेंजर- डेंजर’ टास्क देतच राहते.

   पण आज काही माझं टास्क पूर्ण होईल असं वाटत नव्हतं. मी तवा शोधून त्यावर बॅटर ओतलं, तर ते वेगवेगळ्या दिशांना पसरायला लागलं. आईचं दरवेळी पर्फेक्ट गोल होतं आणि माझं मात्र इस्राईलच्या नकाशा सारखं होत होतं. ‘शीट!’ माझ्या डोळ्यासमोर माझ्या ‘सुपर-डूपर ब्रेकफास्ट’ चा ‘फ्लॉप शो’ होत होता आणि मी हातात उलथणं धरून हताशपणे तव्याकडे बघत होतो. आता तर ऑम्लेट धुरकट दिसायला लागलेलं कारण डोळ्यात पाणी जमा होत होतं. आता सगळे माझ्यावर हसणार आणि ‘उलुलूलु ‘करून मला ‘सिंपथी’ देणार असं चित्र माझ्या डोळ्यासमोर आलं, मग मात्र मला खूपच रडू यायला लागलं. पण आईनी शिकवलं आहे की, ‘हाती घ्याल ते तडीस न्या!’ म्हणजे काहीही झालं, कसंही झालं तरी टास्क पूर्ण करायचंच; म्हणून शर्टाच्या बाहीनी डोळे पुसत मी उलथणं घेऊन सरसावलो.

   तेवढ्यात मागून आई, “थांब! थांब!!” म्हणत धावून आली. बाबापण दारामागून ओरडला, “अगं! करत होता ना तो मॅनेज! कशाला गेलीस मध्ये?” अलोकदादा तर जोरजोरात हसायला लागला. “अरे कार्ट्या! माझ्या ‘नॉन-स्टिक’ तव्यावर स्टीलचं उलथणं वापरायला निघालेलास! निकालात निघाला असता ना माझा नवीन तवा! तुला काय त्याचं?”, आई वैतागून म्हणाली! (रडणाऱ्या माझ्यासमोरपण हिला तवा महत्त्वाचा होता!) अच्छा! म्हणजे हे लोकं मला बघत होते तर दारामागून! मग मात्र मला रडू कंट्रोल होईना. मी हातातला तवा टाकून धावत आईच्या मिठीत शिरलो. “हे खूपच अवघड आहे. सॉरी आई! मी पुन्हा तक्रार नाही करणार डब्यासाठी!” आता सगळ्यांनी माझी फजिती पहिलीच होती, त्यामुळे तोंड लपवून काही फायदा नाही असा विचार करून मी तश्याच ‘रडक्या-शेंबड्या’ अवस्थेत सगळ्यांसमोर उभा राहिलो. 

  आईनी पटकन मला जवळ घेतलं आणि डोक्यावर टपली मारली! “तुला वाटतं तेवढं सोपं नसतं सगळं बाळा!” असं म्हणत तिनी नवीन ऑम्लेट बनवायला घेतलं, बाबानी आणि अलोकदादानी ब्रेडला बटर लावून भाजायचं काम सुरू केलं आणि मला टेबल लावायचं टास्क दिलं गेलं. १० मिनिटांत माझ्या मनातला ‘सुपर-डूपर ब्रेकफास्ट' टेबलवर तयार होता. आम्ही चौघं अधाशीपणे अन्नावर तुटून पडलो, कारण सगळ्यांच्याच पोटात कावळे कोकलत होते. ८-३० चा ब्रेकफास्ट १० वाजता होत होता. 

  जेवता जेवता आई म्हणाली, “आजच्या या गोंधळावरून अर्णवला धडा मिळाला असेलच की स्वयंपाक हा काही त्याला वाटतो तसा ‘बाएं हाथ का खेल’ नाही.” मी खजील होऊन मान खाली घातली. “पण त्यापेक्षा महत्त्वाचं हे आहे, की बाकीच्यांनाही धडा मिळाला की ‘टीमवर्क’ केलं की कामं पटापट होतात आणि एका माणसावर ‘लोड’ येत नाही. जे झालं त्यात फक्त अर्णवची चूक नाही. बाबा आणि अलोक तुमचीही तेवढीच चूक आहे. तो लहान आहे, पण तुम्ही दोघं नाही. तुम्हालाही लक्षात येऊ नये की माझी धावपळ होते आहे? आपण स्वत:हून दोन कामांची जबाबदारी घ्यावी.” आता खजील व्हायची वेळ बाबा आणि अलोकदादावर आली. दोघंही निमूटपणे मान खाली घालून ऐकून घेत होते. (अलोकदादाला ओरडा बसल्यामुळे माझं दु:ख थोडं कमी झालं!) माझं जळकं ऑम्लेट सगळ्यांना थोडं-थोडं वाटून दिलं गेलं होतं वाया जाऊ नये म्हणून. मी कसंबसं ते घशाखाली उतरवत होतो. गुंडाळी याहून कैक पटींनी भारी लागते. हसत हसत जळकं ऑम्लेट खाणाऱ्या आईकडे बघून मला माझीच लाज वाटली आणि मोठं होऊन स्वयंपाकाला ‘बाएं हाथ का खेल’ बनवायचंच असं मी मनाशी ठरवूनच टाकलं!