सोबत (कथा)

सोबत
लेखन: अलकनंदा
चित्र: चिनाब


आज परत आशू शांतपणे बाकावर बसलाय, त्याचा लाडका मन्या जाऊन आज एक आठवडा झाला. मन्या गेला त्या दिवशी आम्ही सगळेच फार घाबरलो होतो. मन्याचा जोरात आलेला आवाज ऐकून आम्ही धावत बागेसमोरच्या रस्त्यापाशी गेलो. आधी तर आम्हाला काही कळलेच नाही. ती लाल गाडी वेगात निघून जाताना दिसली. आईने सगळ्यांना पटकन परत बागेत नेले. आशु आणि काकू तिथेच बसले. मला आशूच्या रडण्याचा आवाज आला. मीही त्या दिवशी बराच रडलो. त्या लाल गाडीचा मला खूप खूप राग आला.

मी आशूजवळ जाऊन बसलो. “खेळायला येतोस का?”, मी हळू आवाजात त्याला विचारलं. तो रोजच्या सारखं “नाही” म्हणाला. आज मलाही खेळावंसं वाटत नव्हतं. मी त्याच्यासोबतच बाकावर बसून राहिलो. तसंही आशू जास्त बोलका नव्हता. सगळ्यांसोबत रोज खेळायचा तो, पण त्याचा सगळ्यात आवडता दोस्त मन्या. दोघांनाही फुलपाखरांच्या मागं धावणं खूप आवडायचं. आताही तो फुलांकडे बघत होता. थोड्यावेळाने काकू परत त्याला बोलवायला आली आणि आशू घरी गेला.
आज मी ठरवलं आशूसोबतच बसायचं. तो बागेत आला, तसं मी त्याच्या शेजारी जाऊन बसलो. बराच वेळ झाला. आशू म्हटला, “मला मन्याची खूप आठवण येते.”

मी त्याचा हात हातात घेतला. तो हळूच रडायला लागला. “आपला मन्या होताच भारी, सगळ्यांनाच त्याची आठवण येते. आणि तुला तर खूपच येत असणार”, मी म्हटले.
आशू काही बोलला नाही, पण बराच वेळ माझा हात हातात घेऊन बसून राहिला. आज आशू बागेत आलाच नाही. त्याची वाट बघून बघून मग मी त्याच्या घरी गेलो. काकुंनी दार उघडले आणि न बोलताच आतल्या खोलीकडे पाहिले. मी जाऊन आशूसमोर उभा राहिलो. तो अभ्यास करत होता. मी त्याच्या शेजारी बसलो.
“खेळायला चल की, मग कर अभ्यास.”
“नको. मला खेळावंसं वाटत नाही.”
“चल, मी पण इथेच बसतो मग”, मी म्हटलं आणि कागद पेन घेऊन चित्र काढू लागलो. हळूहळू चित्र पूर्ण झालं. मी काकुंकडून रंग घेतला. माझ चित्र पूर्ण झालं तसं आशु माझ्या मागे येऊन उभा राहिला. “या इथं पायावर आणि शेपटीवर काळा रंग होता थोडा”, तो म्हटला. मी काळा रंगाचा खडू त्याच्या हातात दिला. तसं त्याने माझ्या समोरून कागद ओढून घेऊन चित्र पूर्ण केलं. बराच वेळ तो मन्याच्या चित्राकडे बघत राहिला.

खाली बघत तो हळूच बोलला, “मला काहीच आवडत नाही,दादा. कधीकधी शाळेतून घरी येतो तेव्हा वाटते, की मन्या धावत येऊन माझ्या अंगावर उडी घेईल. मी परत बागेत खेळायला गेलो, तर त्याला वाटणार नाही का, की मी त्याला विसरून गेलोय?”
“आपण त्याला आवडणाऱ्या गोष्टी केल्या तर?”
“त्याच्या शिवाय काही नाही करावे वाटत मला.”
“हो, मन्या तर सगळ्यात जास्त तुझाच दोस्त होता रे आशू! पण तो जर आपल्याला पाहत असला तर? तुला असं उदास बघून मन्याला काय वाटेल?”

त्याने डोळे वर करून माझ्याकडे पाहिले. मला त्याला रडवायचं नव्हतं. मी थोडंसं हसून म्हटलं, “चल ना, थोडावेळ खाली जाऊ आपण.”
आम्ही दोघं खाली बागेत गेलो. बागेत कडेने लावलेल्या फुलांच्या शेजारी आम्ही थोडा वेळ चाललो. मग काही वेळ सोबत बाकावर बसलो.
मला माहीत आहे, की आशूला अजून बरेच दिवस मन्याची आठवण येणार आहे. पण, तो एकटा नाहिये. मी आहे त्याच्या सोबत!