पाळीची गोष्ट

पाळीची गोष्ट

लेखनः संज्ञा घाटपांडे पेंडसे
चित्रः चिनाब

संपादकीय टिपः सदर कथेमध्ये महिलांना येणाऱ्या मासिक पाळीबद्दल सविस्तर व खुलेपणाने चर्चा आहे. तरी, आपल्या अपत्यांना सदर कथा कोणत्या वयात वाचू द्यावी याबद्दल सर्वस्वी निर्णय पालकांनी घ्यावा.
पाळी येण्याच्या वयातील मुलामुलींनी ही कथा वाचावीच, त्याचबरोबर त्या वयाच्या आधीसुद्धा मुलामुलींना याबद्दल प्रश्न पडल्यास/कुतुहल असल्यास या कथेच्या मदतीने या विषयी घराघरात चर्चा घडून येईल अशी अपेक्षा आहे.

-----

“आई, 'पाळी' म्हणजे काय गं?” कोडं सोडवता सोडवता मी आईला विचारलं. दादा प्रोजेक्टचं काम करत होता. बाबा किचनमध्ये खाऊचे डबे धुंडाळत होता आणि आई टेबल वर बसून कोथिंबीर निवडत होती. त्या तिघांनी एकाच वेळी एकमेकांकडे पाहिलं. उत्तर मात्र कोणीच दिलं नाही. दादानी परत प्रोजेक्टमध्ये डोकं खुपसलं.


“अं… मला माहीत होतं, तू कधी ना कधी हा प्रश्न विचारशील. पण एवढ्या लवकर विचारशील असं वाटलं नव्हतं. कसं सांगू आता तुला? तू थोडा लहान आहेस रे, अजून हे समजून घ्यायला.” आई विचार करत म्हणाली.
“मला तर वाटतं, त्याला थोडंथोडं का होईना समजेल.” बाबा चिवड्याचा तोबरा भरत म्हणाला. नशीब! या घरात निदान बाबाला तरी लक्षात आलंय, की मी आता लहान राहिलेलो नाही.

“पहिले हे सांग, की अचानक हा प्रश्न पडला कसा तुला?” आई विचारात पडली. आईकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तयार असतं खरंतर. आज मात्र ती उत्तर द्यायला, जरा जास्तच वेळ घेत होती. मला आधीपासून शंका होतीच, की या मोठ्या बायकांचं काहीतरी मोठं सीक्रेट होतं. आणि आता मला ते कळायलाच हवं होतं. सीक्रेट म्हणलं, की ते कळवून घेतल्याशिवाय मला चैनच पडत नाही.
त्याचं काय आहे, परवा आमचा वर्ग नेहमीप्रमाणे सुरू होता आणि अचानक रियाच्या वर्गातली एक मुलगी आली. “ताई, एक मिनिट येऊ का?” असं विचारून, उत्तराची वाट न बघता ती घुसलीच सरळ वर्गात! मी पहिल्याच बाकावर बसलो होतो, म्हणून मला त्यांचं बोलणं स्पष्ट ऐकू येत होतं.
“ताई, रियाला निरोप द्यायचाय की, रुहानी आज तिला घेऊन जाऊ शकणार नाही शाळा सुटल्यावर. तिला प्रतिक्षाच्या रिक्षातून घरी जायला सांगितलंय. तिची ना पाळी सुरू झालीये.” ताईंच्या अजून जवळ सरकत ती कानात कुजबुजली.
मी इकडे-तिकडे बघायची अ‍ॅक्टींग करत असलो, तरी माझं सगळं लक्ष मात्र त्यांच्या बोलण्याकडे होतं.
“अच्छा अच्छा. तब्येत वगैरे ठीक आहे ना तिची?” ताईंनी काळजीने विचारलं.
“हो.हो. बाकी ठीक आहे सगळं.”
“बरं. मी सांगते रियाला निरोप.” ताई म्हणाल्या.
तेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं. 'पाळी'.

आम्ही पत्ते खेळताना आजी म्हणते, “आता पत्ते वाटायची तुझी पाळी.” तशी पाळी माहीत होती मला. म्हणजे 'टर्न', 'बारी'. बहुतेक तसंच काहीतरी असावं. आज रुहानीची टर्न आली होती. पण म्हणजे काय करायची टर्न त्याची काही केल्या टोटल लागेना. ती मुलगी गेल्यानंतर मग शिकवणं सुरू झालं आणि मी त्याबद्दल विचारायचं विसरून गेलो. आज कोडं सोडवताना अचानक आठवलं.

“माझी कधी सुरू होणार पाळी?” मी उत्साहाने आईला विचारलं. आई, बाबा आणि दादा मोठ्यांदा हसले.
“अरे,येडबंबू. मुलांना नाही येत पाळी. फक्त मुलींना येते.” आई हसू थांबवत म्हणाली. म्हणजे हे 'द सीक्रेट' मला कधीच समजणार नव्हतं तर! हॅत्तरिक्कि!
“तुला पाळी येणार नसली, तरी मी सांगेन बरं का आमचं सीक्रेट. ये इकडे.” माझा उदास चेहरा बघून खुर्चीकडे इशारा करत आईने मला बोलावलं. मी उतावीळपणे तिच्या शेजारी जाऊन बसलो.

“सगळ्या प्राण्यांना पिल्लं होतात हे माहितीचे तुला. पण फक्त माद्यांना होतात. म्हणजे फीमेल्सना. बरोबर? जशी तुम्ही दोघं माझी पिल्लं आहात.” माझा गाल ओढत आई प्रेमानी म्हणाली. आई मुद्द्यावरच येत नव्हती.
“सगळ्या प्राण्यांमध्ये नर-मादी असतात. माणसांमध्ये पण असतात. जसं की तू, दादा आणि बाबा सगळे मेल्स आहात. म्हणजे नर आणि मी मादी.”
“हो की. मी असा विचारच नव्हता केला कधी. की असं मुलगा आणि मुलगी वेगळं का आहे?”
“सगळ्यात महत्त्वाचा हाच फरक आहे, की पिल्लं जन्माला घालण्याची पॉवर फक्त माद्यांकडेच असते. का? कारण त्यांना काही स्पेशल अवयव मिळाले आहेत. जे नरांकडे नाहीत. त्यातले मुख्य अवयव आहेत. अंडाशय आणि गर्भाशय म्हणजे ओव्हरिज आणि युटेरस.”
“हे बघ. हे असे दिसतात ते.” दादा लगेच टॅब घेऊन माझ्या दिशेने धावला.
मला एखादी गोष्ट माहीत नसली आणि ती त्याला माहीत असली की त्याला जो काही भयानक माज चढतो की विचारता सोय नाही. टॅब वर ती दोन चित्र बघून माझे डोळेच विस्फारले. बापरे! किती चमत्कारिक होतं सगळं.
“हे आहे तुझ्या पोटात?” मी उत्सुकतेने आईला विचारलं.


“अर्थातच! म्हणून तर तुम्ही दोघं झालात ना मला.” आई म्हणाली.
आता तुला मेन मुद्दा सांगते, की पाळी म्हणजे काय आणि ती कशी येते . “तर हे जे अंडाशय आहे…” अंडाशयाच्या आकृती वर बोट टेकवत आईने सांगायला सुरुवात केली, “...त्यातून दर महिन्याला एक अंडं गर्भाशयात पाठवलं जातं. ज्या अंड्याचं पुढे जाऊन बाळ बनणार असतं.”
“आईशपथ! म्हणजे मी आधी एक अंडं होतो!”, मला एकामागून एक धक्के बसत होते.


“पण दरच वेळी या अंड्याचं पिलू बनत नाही. नाहीतर विचार कर मला किती मुलं झाली असती!”
आईला स्वत:च्याच कल्पनेवर जाम हसू आलं. 15-20 कलकलाट करणाऱ्या मुलांच्या गोतावळ्यात मधोमध उभं राहून आई जोरजोरात रडत आहे, असं मजेदार चित्र उगाच माझ्या डोळ्यासमोर आलं.
“तर, हे जे गर्भाशय असतं तिथे अंड्याचं बाळात रूपांतर होणार असतं. त्यासाठी तिथे स्पेशल अरेंजमेंट केली जाते. त्या लहानशा बाळाला प्रोटेक्ट करण्यासाठी रक्ताचं एक जाडसर आवरण बनतं आतमध्ये. बाळ पोटात असताना पूर्णपणे आईवर अवलंबून असतं. अगदी खाण्यापिण्यापासून ते श्वास घेण्यापर्यंत. पण जर बाळ तयार होणार नसेल, तर मग उपयोग काय त्या आवरणाचा? काही ठराविक काळाने मग ते आवरण आपोआप गळून पडतं रक्ताच्या रूपात. त्याला म्हणतात मासिक पाळी. दर महिन्याला येते म्हणून मासिक. मुली थोड्या मोठ्या झाल्या, साधारण 13- 14 वर्षांच्या की मग येते पाळी पहिल्यांदा. आणि मग 45-50 वर्षांपर्यंत पाठ सोडत नाही.” आईच्या चेहऱ्यावर वैताग स्पष्ट दिसत होता, “पाळी आली, याचा अर्थ ती मुलगी मोठी झाली. तिच्याकडे बाळ जन्माला घालण्याची शक्ती आली.”

“बाहेर कुठून येतं मग हे रक्त?” मला आता हे सीक्रेट मुळीच भारी वाटत नव्हतं. उलट थोडं भितीदायकच वाटत होतं.
“जिथून बाळ बाहेर येतं तिथून. जिथून आपल्याला शू होते, त्या भागाला लागूनच हा अजून एक मार्ग असतो मुलींमध्ये. त्याला योनी किंवा वजाइना असं म्हणतात. तुला एकदम हे लक्षात नाही राहणार सगळं. गुंतागुंतीचं असतं हे खूप. बाकी माहिती हळूहळू देईन मी तुला. शाळेच्या अभ्यासक्रमातसुद्धा असतं हे सगळं पुढे.” माझा आश्चर्यकारक चेहरा बघून आईने विषय आटोपता घेतला.
“पाळीच्या वेळेस दुखतं का गं तुला खूप?" मी आईला विचारलं. मला हे ऐकूनच फार वाईट वाटलं होतं की आईला दर महिन्याला असं रक्त येतं.
“हो! दुखतं ना! पोट,मांड्या, कंबर सगळंच दुखतं. चिडचिड होते. करणार काय पण? काहीच इलाज नसतो त्याला. सगळ्याच बायकांना होतं. निसर्गाची रचनाच आहे तशी.” आयुष्यात पहिल्यांदा मला निसर्गाचा भयानक म्हणजे भयानक राग आला. अन्याय आहे हा!


“काय करता मग तुम्ही? कसं थांबवता रक्त? यावर काहीच औषध नाही का?” मी प्रश्नांचा भडिमार केला.
“4-5 दिवस येतच राहतं हे रक्त हळूहळू. त्यासाठी मग आम्हाला 'पॅडस' वापरावे लागतात. म्हणजे जसे लहान मुलांसाठी डायपर्स असतात ना तसे. ते लावून मग आम्ही नेहमीप्रमाणे दिवसभराची कामं करू शकतो. त्रासदायक आणि गैरसोयीचं असतं हे. पण आता इतक्या वर्षांमध्ये सवय होऊन गेली आहे. मला मी 8वीत असताना सुरू झाली होती पाळी.” आईने माहिती पुरवली.
“आम्ही काही करू शकतो का तुमच्यासाठी?” मी कोथिंबिरीची लांबलचक काडी उचलत आईला विचारलं.
“थोडी थोडी मदत जशी तू आत्ता करतोएस. बास! अजून काही नाही बाळा!” आई प्रेमानी म्हणाली.

मला आजी, मीनलमावशी, ऋषिका, शाळेतल्या सगळ्या ताया, रिया, प्रतीक्षा, आणि आता रुहानी सगळ्यांची दया आली. पण त्याच बरोबर ह्या सगळ्यांना एक सॉलिड सुपर पॉवर मिळाली आहे याची जाणीव होऊन थोडं समाधान पण वाटलं. अर्थात निसर्गावरचा राग कमी झाला नव्हता. चूक केली होतीच त्यांनी. वादच नाही त्यात काही.
“ही इतकी अवघड आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, की अजूनही त्यावर संशोधन सुरू आहे. कितीतरी गोष्टी अजून शास्त्रज्ञांना पण नाही समजल्याएत.” आई परत कोथिंबिरीकडे वळत म्हणाली.
“मी तुला काही व्हिडियोज दाखवतो यावरचे. आमच्या वर्गात मागच्या वर्षी दाखवले होते. खूप भन्नाट आहेत. अ‍ॅनिमेशन वाले. समजायला सोपे एकदम.” दादा उत्साहाने म्हणाला. त्या दिवशी मी या विषयावरच्या बऱ्याच लहान लहान व्हिडियो क्लिप्स पाहिल्या. आपलं शरीर म्हणजे एक जादूची पेटी आहे. याआधी मला पुसटशी कल्पनाही नव्हती, की आपल्या शरीराच्या आत एवढ्या साऱ्या गोष्टी एकाच वेळी घडत असतात.

माझ्या डोक्यात इतका मासळी बाजार झाला होता की रात्री बराच वेळ मला झोपच येईना. हा एवढा मोठा चमत्कार पचवायला थोडा वेळच लागेल मला. दादा मात्र ढाराढूर झोपला होता.
“थोडी घाई केली का, मी हे सगळं सांगायला?” आईचा हळू आवाज माझ्या कानावर पडला.
“नाही मला तर नाही वाटत. आता जग इतकं फास्ट झालंय. सगळ्याचंच वय अलीकडे यायला लागलंय. आणि तसंही तुला काय वाटतं तू नसतं सांगितलंस तर त्यांनी दुसरीकडून नसती मिळवली ही माहिती?” बाबा म्हणाला, “मला तर उलट बरंच वाटलं. एक तर त्यांनी सरळ तुला येऊन विचारलं. आणि तूही आढेवेढे न घेता त्याला लगेच उत्तर दिलंस. सोप्या भाषेत. मोकळेपणाने.” बाबाच्या बोलण्यात कौतुक होतं.
“मला त्याला ही खात्री पटवून द्यायची होती की तो आपल्याला कधीही, कुठलेही प्रश्न विचारू शकतो. न घाबरता, न लाजता. म्हणून देऊन टाकली सगळी माहिती, जास्त विचार न करता.”, आई म्हणाली.
“चुकीच्या मार्गाने चुकीची माहिती मिळवण्यापेक्षा, ती अपेक्षेपेक्षा लवकर मिळणं कधीपण परवडत. तुम्हा बायकांना जेव्हा पाळी सुरू होते, तेव्हा तुम्ही तरी कुठे कळत्या वयात असता? तुम्ही करता ना मॅनेज बरोबर सगळं. आम्हाला तर फक्त ऐकायचंय त्याबद्दल. समजून घ्यायलाच हवं की.” बाबा म्हणाला.
“मुलं मोठी होताहेत आता. मला आपली लहान लहानच वाटतात.”


पांघरूण लपेटून घेत मी डोळे मिटले. आतून खूपच अभिमान वाटत होता. माझ्या आईबाबासारखे पालक जगात कुणाचे नसतील. मी आता ऑफिशियली मोठा झालो होतो आणि माझ्या आजूबाजूच्या बायकांना पाळी चालू असताना कमीतकमी त्रास व्हावा ही मोठी जबाबदारी माझ्यावर होती. मासिक पाळी नसली तरी आता माझी पाळी आली होती.
म्हणजे टर्न.बारी.