नॉर्बरी तलाव पोहून जाताना...

नॉर्बरी तलाव पोहून जाताना...

लेखन: साची
(अनुवाद: प्राची केळकर-भिडे)

हाय, माझं नाव साची. मी जवळजवळ १३ वर्षांची आहे. मी आठवीत शिकते. मी कॅनडातल्या कॅल्गरी इथे रहाते. कॅनडा हा अमेरिकेच्या उत्तरेला असलेला देश आहे. मी राहते तो भाग कॅनडाच्या मध्य-पश्चिमेला असलेल्या अल्बर्टा नावाच्या प्रांतात आहे.

एखाद्या विकांताच्या (विकेंड) सुट्टीत, मला नि माझ्या आईबाबांना, 'ब्रिटिश कोलंबिया' भागातील एका लहानशा ‘केबिन’मध्ये राहण्यासाठी जायला आवडतं. हा प्रांत कॅनडाच्या पश्चिमेला येतो. आम्हाला रॉकी पर्वतरांगा पार करून ‘बी सी फूटहिल्स’ला पोचायला चार तास ड्राईव्ह करावं लागतं. अतिशय एकांत असलेल्या, स्वच्छ आणि शांत अशा लहानशा तलावाच्या किनाऱ्यावर ही केबिन आहे. इथे एका बाजूला रॉकी पर्वतरांगेची वीण पूर्वेकडे जाते. तर बाकी बाजूंनी हा तलाव लार्च, पाईन आणि पॉप्लर वृक्षांच्या जंगलाने वेढला आहे. इथे सूर्यास्ताचे रंग, त्या प्रकाशाने झळाळणाऱ्या पर्वत शिखरांवर आम्ही नेहमी बघतो.

हा तलाव तसा लहान आहे. कदाचित सरळ अंतर २०० मीटर वगैरे असेल, त्यामुळे हा तलाव नेहमी स्थिर असतो. अर्थातच हा तलाव पॅडलबोर्डिंग, कयाकिंग आणि कानोईंगसाठी एकदम योग्य आणि सोयीचा आहे. पर्वतांवरच्या ग्लेशियरमधून निघणाऱ्या झऱ्याकडून येणारे (बर्फाचे वितळलेले) पाणी या तलावाला मिळतेच, शिवाय काही भूमिगत झरे देखील आहेत. त्या झऱ्यांच्या पाण्याचे बुूडबुडेही तुम्ही पृष्ठभागावर बघू शकता. या सगळ्या कारणांमुळे हा तलाव प्रचंड थंड असतो. किनाऱ्यावरच्या वाळू आणि गाळात बागडणं मजेदार असतं खरं, अर्थात जर तुमची गार पाण्यात पाय घालायची तयारी असेल तर!

तलावाच्या दुसऱ्या टोकाला गळून पडलेल्या फांद्यांवर 'पेंटेड टर्टल्स' (हे कासवांच्या एका जातीचं नाव आहे) राहतात. तलावात कधीकधी छोटे मासेही पाहायला मिळतात. कनोईंग करत असताना तुम्ही वर पाहिले, तर काहीवेळा एखादा 'लून' तुमच्या समोरच तुम्हाला उडताना दिसेल! ही 'पेंटेड टर्टल्स'ची जात कॅनडा आणि अमेरिका या देशांमध्ये आढळते. हिवाळ्यात जेव्हा इथली तळी गोठतात आणि पाणी अतिशय थंड होते तेव्हा ही कासवं, स्वतःला चिखलाखाली गाडून घेतात आणि वसंत ऋतूपर्यंत ती चक्क तिथेच झोपून राहतात. त्यांच्या मानेभोवती लाल रंगांचे पट्टे असल्याने त्यांना 'पेंटेड टर्टल्स' म्हणतात. 'लून' पक्षी बदकासारखाच असतो. हा पक्षी काळा असतो, त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात आणि डोळे लाल रंगाचे असतात. जोरात आणि कष्टाने ओरडल्यासारखा काहीसा विचित्र आणि विनोदी आवाज हे पक्षी करतात. त्यामुळे ते वेडसर माणसांसारखे वाटतात. वेडसर माणसांना कदाचित म्हणूनच कधीकधी 'लूनिज्' म्हणत असतील! हे पक्षी खूप काळ पाण्याखाली राहू शकतात आणि उत्तम पोहतात. त्यामुळे, एखाद्या पक्ष्याला तुम्ही डुबकी मारताना पाहिले, तर तो तलावाच्या दुसऱ्या टोकाहून बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही!

पाणी खूप थंड असल्यामुळे सहसा या तलावात कोणी पोहत नाही. पण उन्हाळ्यात एखाद्या दिवशी मी आणि आई तलावात पटकन एखादी डुबकी मारतो. यापूर्वी, माझ्या आईने हा तलाव दोनदा पोहून पार केला आहे. मात्र तेव्हा तिच्याबरोबर जाण्याची मला हिंमत झाली नव्हती. ह्याला दोन कारणे होती - तलावाचे पाणी खूप थंड असतंच, पण हा तलाव मध्यभागी साधारण १५ मीटर खोल आहे. त्यामुळे जर मी थकले तर मध्ये थांबून आराम करायची काहीच सोय नाहीये.

पण यावेळी मात्र काहीही करून हा तलाव पोहून पार करायचाच, असा मी निश्चय केला होता. आईचे मला यावरून चिडवणं थांबावं हे एक कारण होतंच पण मलाही स्वतःला दाखवून द्यायचंच होतं की मी हे करू शकते!

आम्ही पूर्णं तयारी केली. माझा बाबा माझ्या बाजूने 'कनोई'मधून टॉवेल आणि फ्लोटर्स घेऊन येणार होता. आम्हाला नंतर अंग पुसायला टॉवेल्स आणि मध्ये दमले तर टेकायला म्हणून फ्लोटर्स. माझी मैत्रीण योलांडा तिची पॅडलबोट घेऊन आली. आई बाबाबरोबर कनोईमधून परतणार होती. योलांडा तिच्या पॅडल बोटला जोडून माझी पॅडल बोट घेऊन येणार होती, जी मी परतताना चालणार होते.

मी आणि आईने आमचे पोहण्याचे पोशाख घातले आणि पाण्यात उडी मारली. पाणी गार होते पण हवा बऱ्यापैकी उबदार होती त्यामुळे मी ठीक होते. आम्हाला पाण्याची सवय झाली. मग बाबा नि योलांडापण त्यांच्या बोटींत बसले. आम्ही पोहायला सुरुवात केली!

आम्ही ठराविक गतीने तलावाच्या विरुद्ध दिशेला असलेल्या एका धक्क्याकडे 'ब्रेस्ट स्ट्रोक' पद्धतीने पोहत निघालो. तो धक्का खाजगी होता पण त्याभोवतीचे पाणी उथळ होते. एक तृतीयांश पोहून झाल्यावर मला थोडे दमायला झाले. तोपर्यंत मी इतकी रोमांचित होते की पाणी किती खोल आहे हा विचारच केला नव्हता. मग थोडावेळ मोकळा श्वास घेता यावा म्हणून मी 'बॅक स्ट्रोक'चा पर्याय निवडला. अर्धे अंतर पार केल्यानंतर एक भीतीचा क्षण येऊन गेला.मी पाहिले तर माझे आई, बाबा नि मैत्रीण माझ्यापासून बरेच लांब होते. तेव्हा मला खूप एकटे वाटले.

पण थोड्याच वेळात मला धक्का स्पष्ट दिसू लागला आणि मी परत रोमांचित झाले. आतापर्यंत मला पाण्याच्या थंडपणाची व्यवस्थित जाणीव होऊ लागली होती, पण आम्ही पोचतच आलो होतो! माझ्या काही सेकंद आधी आई पोचली आणि पाण्यातच थांबून माझा उत्साह वाढवत होती. मी पोचले! आम्ही अंग पुसले आणि आमच्या कनोई व पॅडल बोटीतून परत जायला निघालो.

मला माझा खरंच खूप अभिमान वाटत होता. मी एक माउंटन लेक (पहाडी तलाव) पोहून पार केला होता! मी काही खूप चांगली जलतरणपटू नाही, की खूप धाडसीही नाही, पण तरीही मी हे केले! पुढल्या वर्षी मी आणि आई तलावाच्या दुसऱ्या टोकाला जाऊन, परततानाही पोहत येणार आहोत. अन् मी त्याबद्दल फारच उत्सुक आहे! या पोहण्यातला सर्वोत्तम भाग म्हणजे तलावाचे अतिशय् स्वच्छ पाणी आणि पोहून झाल्यानंतर वाटणारी प्रसन्नता!

मला आता वाटतंय की, मला हा मिळणारा विशेष फायदा आहे की हा अनुभव मला घेता आला; आणि मी किती नशीबवानही आहे की जगात अजूनही अशा सुंदर नि अस्पर्श्य जागा शिल्लक आहेत!

तुम्हाला माझा हा अनुभव वाचायला मजा आली असेल अशी अपेक्षा करते.

-साची

श्रेयअव्हेर: सोबतची छायाचित्रे लेखासोबत पाठवली आहेत. त्याचे प्रताधिकार साचीकडेच आहेत