test

शब्दांची नवलाई
जोडशब्द
लेखनः एकनाथ आव्हाड
चित्रेः रेवा क्षेमकल्याणी (इयत्ता ८वी, अक्षरनंदन)

दादा आमचा बोलताना
शब्दाला जोडतो शब्द
त्या जोडशब्दातून मग
भेटतो नवीन शब्द

बडबडणाऱ्याला म्हणतो
बोलू नका अघळपघळ
काटकसरीने वागा जगा
करु नका उधळमाधळ

अभ्यास करुनी परीक्षेत 
दाखवावी अक्कलहुशारी
मस्करीची होते कुसकरी
कशास हवी थट्टामस्करी

मित्र असावे साथीला
लाभावी संगतसोबत 
गप्पांची भरावी शाळा
उलगडावी गंमतजंमत

लहानथोर सा-यांचीच
विचारावी ख्यालीखुशाली
सबब सांगून कुठलीही
करू नये ढकलाढकली

दादा म्हणतो शब्दांचा
असा साधावा ताळमेळ
फुलत जाते भाषा तेव्हा 
पाहू नये काळवेळ...!

 

----000---

मित्रमैत्रिणींनो,
कविता आवडली का? या कवितेत ज्या गमतीबद्दल आपण बोलतोय त्याच्याशी निगडित एक खेळ आपण खेळणार आहोत. या खेळात आपण एक क्विझ घेणार आहोत. यात वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. बघुयात तुम्ही किती सोडवू शकताय: