आज काये 'पेश्शल'? - २१ जून

आज काये 'पेश्शल'? - २१ जून

आज २१ जून आहे, हे तुम्हाला माहिती आहेच हो! पण, आजचा दिवस स्पेशल आहे बरं! आज काय काय आहे माहितीए का?:


१. विष्टंभ


आज असा दिवस आहे जेव्हा पृथ्वी अश्या जागी असते की  कर्कवृत्ताच्या बरोब्बर समोर सूर्य असतो. अर्थात त्यामुळे उत्तर गोलार्धात हा सर्वात मोठा दिवस असतो (आणि दक्षिण गोलार्धात सर्वात लहान). याला भारतीय पंचांगांत विष्टंभ असं म्हटलं जातं.

कर्कवृत्त भारतातून जात असलं तरी ते महाराष्ट्रातून जात नाही. ते भारतातील गुजरात (कच्छ), मध्यप्रदेश, छत्तिसगढ, ओरिसा या राज्यांतून जातं. तिथे आज (२१ जून २०१९) दुपारी ११:५४ मिनिटांनी सूर्य बरोब्बर डोक्यावर येईल. आज सूर्य आकाशात संपूर्ण वर्षातील सर्वात जास्त उंचीवर दिसतो. महाराष्ट्रातही मध्याह्नीच्या सुमारास ढग नसतील तर बाहेर जाऊन बघा, किती लहानशी सावली - तीही पायाशी - पडते आहे. 

२. जागतिक योग दिवस


याचबरोबर आज आहे 'जागतिक योग दिवस'. योग हा एक शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाचा असा व्यायाम प्रकार आहे. या प्रकाराची सुरुवात भारतात झाली आणि आता जगभरात अनेक व्यक्ती योगाभ्यास करतात. मुलांनो, तुम्हीही दररोज सूर्यनमस्कारासारखा अनेक महत्वाच्या आसनांना एकत्र करून तयार केलेला व्यायाम दररोज केलात तर शारीरिक आणि मानसिक क्षमतेत वाढ झाल्याचे नक्कीच जाणवेल.

३. जागतिक संगीत दिवस


आजच्याच दिवशी "जागतिक संगीत दिवस" देखील साजरा केला जातो. याची एक गमतीशीर गोष्ट आहे. १९७०मध्ये अमेरिकन संगीतकार जोएल कोहेन याने फ्रान्समध्ये उन्हाळ्याच्या स्वागतासाठी २१ जून रोजी संगीत महोत्सव सुरू केला होता. संगीतासोबत उन्हाळ्याचे स्वागत करण्याची ही कल्पना लोकांना एवढी आवडली की १९८२पर्यंत १२० देशांमध्ये संगीतासोबत हा दिवस साजरा होऊ लागला. आजही अनेक देशात आजच्या दिवशी संगीताच्या मोठमोठ्या मैफिली भरतात आणि वसंत (स्प्रिंग) सरून उन्हाळ्याचे(समर) आगमन जगभरात साजरे केले जाते.

तेव्हा आहे की नाही आजचा दिवस स्पेशल? तुम्ही आजचा दिवस कसा साजरा करणार?