मनीचा विठ्ठल (कथा)

मनीचा विठ्ठल
लेखक: ज्योती गंधे
चित्र: रसिका काळे

श्रीहान भराभर चालला होता. त्याला घरी जाऊन स्वतःचं आवरून शाळेत जायचं होतं. जाताना शेजारच्या मावशीकडून डबा घेऊन, परत हॉस्पिटलमध्ये नेऊन द्यायचा होता. त्याच्या मनात विचारांची गर्दी झाली होती. ‘का? असं का?’ असं सारखं मनात येत होतं. आठ दिवसांपूर्वी सगळं कसं छान होतं. बाबा कंपनीत कामाला होते. खूप मोठे ऑफिसर नव्हते, पण सिनिअर पदावर होते. आई हॉस्पिटलमध्ये  कामाला होती, हेडसिस्टर म्हणून. कसं कोणास ठाऊक, नेहमीचाच जिना, पण उतरताना आईचा पाय घसरला आणि आईच्या पायाच हाड मोडलं fractureझालं. पण बाबा सगळं सांभाळत होत;त्यामुळे, फक्त बाबांना मदत करायची, शाळेतून जाता-येता आईला भेटायचं, बाबा सांगतील तसं आईजवळ थांबायचं, आणि शाळेत जायचं, नेहमीसारखा अभ्यास करायचा,एवढंच श्रीहानला करायचं असे.. आईबद्दल त्याला फार वाईट वाटत होतं. सगळ्यांची सेवा करणारी आई, आज पलंगावर होती. आईकडे त्याला बघवतच नव्हतं, पण आईच त्याची समजूत काढायची - तिला दुखत असूनसुद्धा.

त्या दिवशी हॉस्पिटलला बाबा स्कूटरवरून जात होते. सिग्नल जवळ होता, म्हणून स्पीड कमी केला होता म्हणून बरं! कोणालाच कळलं  नाही कसं, पण जवळचं होर्डिंग मोठ्ठा आवाज करत कोसळलं. कितीतरी जण जखमी झाले आणि सिरिअस स्थितीमध्ये  जे चारपाचजण होते, त्यात बाबापण नेमके होते. आईबाबा दोघेही हॉस्पिटलमध्ये , श्रीहानला एकटं पडल्यासारखं झालं. शेजारपाजारचे सगळेच जेवढी होईल तेवढी मदत करत होते.

श्रीहानला शाळेत जावंसंच वाटत नव्हतं, पण 'आंतरशालेय बालनाट्य स्पर्धा' जवळ आल्या होत्या. नाटकात त्याची प्रमुख भूमिका होती. आईनेच त्याला शाळेत जायला सांगितलं होतं. त्याला पहिल्या नाटकाची आठवण झाली. त्यात त्याला नोकराची - छोटी पण तशी महत्त्वाची - भूमिका होती. नाटकात जो मालक होता, त्याला खोकला झालेला असतो आणि डॉक्टर त्याला तपासायला येणार असतात. पण ऐन वेळेला तो मुलगा खोकायचेच विसरला. डॉक्टर यायची वेळ झाली, तरी हा खोकेच ना. श्रीहानने त्याच्याजवळ जाऊन म्हटलं होतं, “मालक, मंगाशी जो काढा दिल्लाता, त्यानी खोकल्याला जनू आराम पडलाया.” त्या मुलाच्या लक्षात आलं, तो म्हणाला,”अरे खरंच की, पण आता पुन्हा घसा खवखवायला  लागलाय”, असं म्हणून त्याने खोकायला सुरवात केली आणि डॉक्टर येईपर्यंत त्याचा खोकला चांगलाच वाढला होता.

श्रीहानच्या  ह्या प्रसंगावधानाचं चांगलंच कौतुक झालं. त्याची भूमिका पण चांगली झाली होती. ह्यावर्षीच्या नाटकात, तो विठ्ठलाच्या प्रमुख भूमिकेत होता.
आईने त्याला विचारलं होतं, “तुझी ह्या भूमिकेसाठी का निवड झाली माहितेय?”
तो म्हणाला होता, “मागच्या वर्षी मी चांगलं काम केलं होतं म्हणून.”
आई म्हणाली, “आणखी कोणतं कारण?”
“मी सगळ्यात उंच आहे, बाप्पा सगळ्यांपेक्षा मोठा दिसायला हवा न?”
“हो काय, आणखी कोणतं कारण?”
“आणखी? मला नाही माहित.तूच सांग.”
“अरे,विठ्ठलासारखाच तू प्रेमळ आहेस, सगळ्यांना खूप मदत करतोस न म्हणून!”
आई म्हणाली, “श्री, नाटकात का होईना पण तू देवाची भूमिका करणार आहेस. तेवढ्यापुरता का होईना देवाचा अंश तुझ्यात असेल, त्याला जप. त्याला धक्का लागेल असं कधी वागू नकोस. आणखी कोणत्याही संकटाच्या वेळी त्याची आठवण कर, त्याच्याशी बोल, तो तुला नक्की मदत करेल. स्वतः प्रसन्न रहा,आजूबाजूच्यांना, आजूबाजूच्या वातावरणालाही प्रसन्न ठेव.काळजी करत बसून दु:खी राहू नकोस.”

आईला काय म्हणायचं आहे, श्रीहानला काहीच कळलं नव्हतं, पण आता मात्र त्याला त्या विठ्ठलाशी बोलावसं वाटू लागलं. तो मनाशी म्हणाला, “खरच तू असशील माझ्यात, तर ह्या संकटातून आईबाबांना बाहेर  काढ. त्यांना लवकर बरं कर. मला माहितेय ते बरे होणार आहेत, नक्कीच होणार आहेत.” आणि त्याला एकदम मोकळं वाटायला लागलं. त्याला कोणीतरी आपल्याबरोबर आहे, असं वाटायला लागलं. त्याचा चालण्याचा वेग आणखी वाढला. घरी येऊन, त्यानी स्वतःचं आवरलं. शाळेची तयारी केली. शेजारच्या काकुंशी बोलला. छोट्या पिंट्याशी खेळला. त्यांच्याकडेच जेवला आणि आईबाबांसाठी काकूनी दिलेला डबा घेऊन तो निघाला. का कुणास ठाऊक, पण मघाशी आलेली मरगळ,उदासीनता आता वाटत नव्हती.तो उत्साहाने  चालत होता.

तो हॉस्पिटलला पोचला आणि काय आश्चर्य! आई दुसऱ्या सिस्टरच्या मदतीनी चालण्याचा प्रयत्न करत होती. आई त्याच्याकडे बघून हसली. सिस्टरच्या मदतीने आईला घेऊन तो तिच्या बेडकडे आला. तिला बेडवर बसवली. तिच्याशी गप्पा मारू लागला. तेवढ्यात डॉक्टरनी त्याला बोलावल्याचा निरोप आला. श्रीहान मनातून घाबरला. पण आईला तसं न दाखवता तो खोलीबाहेर पडला आणि डॉक्टरांच्या केबिनकडे निघाला. मनातल्या विठ्ठलाला तो म्हणाला, ‘काही नाही होणारे बाबांना,हो न विठ्ठला?’

त्यानी केबिनच्या दारावर टकटक केली. डॉक्टरानी त्याला आत बोलावलं, बसायला सांगितलं. त्याच्याकडे हसून बघत म्हणाले, “श्रीहान, your father is out of danger! असेच साथ देत राहिले, तर लवकरच ICUमधून त्यांना शिफ्ट करता येईल.”आणि त्याला काही सूचना दिल्या. त्यांचा निरोप घेऊन श्रीहान परत आईजवळ आला. तिला चांगली बातमी सांगितली आणि तो विठ्ठलाशी कसं बोलला ते ही सांगितलं. त्यानी आईला विचारलं,“खरंच का गं माझ्या मनात आता विठ्ठल आहे?”

आई हसली आणि म्हणाली, “अरे तो प्रत्येकाच्या मनात असतो, वेगवेगळ्या नावानी. आपण जेव्हा त्याच्याशी बोलतो, तेव्हा तो आपल्याला बरोबर मार्ग दाखवतो.”

“म्हणजे काय आई?” श्रीहाननी विचारलं.

“म्हणजे आपल्या मनात देव आहे म्हटलं, की आपण त्याच्याशी सगळं बोलतो. आपल्याला हलकं वाटायला लागतं आणि नकळत आपल्या मनावरचा ताण कमी होऊ लागतो. आपल्या मनात चांगले विचार येऊ लागतात आणि त्यातच आपल्याला कदाचित एखादा मार्गही सापडतो. थोडक्यात स्वतःशीच बोलायचं पण थोडं उदास, वाईट वाटणाऱ्या विचारातून अलिप्त करायचं. ते करण्यासाठी मनातल्या देवाला हाक मारायची; म्हणजेच वाईट विचार दूर करायचे, सकारात्मक विचार करायचे असंच मनाला सांगत राहायचं. मग आपल्याच मनात चांगले, सकारात्मक विचार येऊ लागतात. असलेल्या परिस्थितीतही काहीशी ऊर्जा येऊ लागते, सगळा ताण कमी होऊ लागतो. आपल्याला नवीन आशा,नवीन उमेद मिळते. आपल्याला त्यातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी मार्ग सापडतोही कधीकधी”

श्रीहानच्या लक्षात आलं होतं, मनातला विठ्ठल म्हणजे आपल्याला सकारात्मक विचार करायला लावणारी प्रेरणा. तो आता त्या विठ्ठलाला नेहमी जपणार होता.