लॉकडाउनमध्ये चालत जाणारी माणसं

लॉकडाउनमध्ये चालत जाणारी माणसं

लेखनः कल्याणी वर्तक
चित्रः मुक्ता जयकर

 

कोरोनाची गडबड चालू असताना आपल्या सगळ्यांना घरात बसायला सांगितले आहे. आपली शाळा पण बंद आहे. अशावेळी एवढी सगळी माणसं रस्त्यावरून, ट्रेनमधून आणि बसेसमधून कुठे चालली आहेत बरं?

चालणारी माणसं कोण आहेत?

ही सगळी माणसं आपापल्या घरी जायचा प्रयत्न करत आहेत. आपल्याला पण वाटत ना तसंच! बरेच जण, आपल्या घरी न राहून दुसऱ्या गावी काम करत असतात. जसं कामासाठी आपले बाबा किंवा आई गावाला जातात, काही दिवस तिथे राहून काम करतात अगदी तसंच! तुम्हाला माहिती आहे, आपल्या शहरात काम करणारे बरेच लोक हे दुसऱ्या गावातून किंवा कधीकधी तर दुसऱ्या देशातूनसुद्धा आलेले असतात!

चला, आपण आपल्या जवळच्या प्रत्येक माणसाला विचारून पाहू की 'तो किंवा ती कुठून आले आहेत?' आई, आजोबा, आजी यांचे मूळ गाव कुठलं? आपल्या घरात काम करणार्‍या मावशी, आपल्या बिल्डिंगमधले वॉचमन काका, सकाळी दूध टाकणारे काका, कचरा उचलणाऱ्या मावशी, ड्रायव्हर, बांधकामावर काम करणारा गडी, फळवला भैय्या ह्या सगळ्यांना विचारून पाहूया ते आपल्या शहरात कधी आले, कुठून आले, का आले? तुम्हाला गंमत वाटेल, पण ज्या लोकांशी आपण बोलू त्यातली बरीचशी लोक दुसर्‍या गावातून आली असू शकतात. ही दुसरी गावं कुठली? ती आपल्याच राज्यातील किंवा परराज्यातील असू शकतात.

या लोकांना कामाची गरज आहे आणि आपल्या शहराला त्यांची! पोळ्या बनवणाऱ्या काकू किंवा शाळेत सोडणारे रिक्षावालेकाका आलेच नाहीत तर आपल्याला किती अडचण होईल ना? आपण ज्या इमारतींमध्ये राहतो, त्याचं बांधकाम दुसऱ्या गावाहून आलेल्या मजुरांनी केलं असतं. त्यांच्या कष्टांमुळे आपण आपल्याला रहायला फ्लॅट मिळतात. आपल्या शाळेची इमारत, रस्ते, फ़्लायओव्हर हे सगळं शहराबाहेरून आलेल्या मजुरांनीच तर उभारलं आहे.

तुम्हाला माहिती आहे, आपल्याला आवडणाऱ्या आंब्याच्या कितीतरी बागांतदेखील नेपाळहून आलेले मजूर काम करतात. शेतावर सर्व कामे करायची, आंबा कोणी पळवत नाही ना? वात्रट पोरं/चोरटे किंवा माकडं यावर ते लक्ष ठेवून असतात. आंबा पिकला की ते झाडावर चढतात आणि तोडून खाली आणतात. हे जर मजूर नेपाळहून आलेच नसते तर? कदाचित इतका चांगला आंबा आपल्याला खायला मिळणार नाही!

आताच्या लॉकडाउनमुळे बरेच मजूर, बरीच लोकं घरापासून दूर वेगवेगळ्या जागी, वेगळ्या शहरांमध्ये अडकली आहेत. त्यांची परत जायची काहीच सोय नाही. त्यांच्याकडे मोटारगाडी नाही किंवा स्कूटरही नाही. बस व ट्रेन बंद असताना ही माणसं आपापल्या घरी कशी जाणार? अशा या कठीण परिस्थितीत बरेच जण चालत जायचा प्रयत्न करत आहेत.

पण त्यांना घरी का जायचं आहे?

बाहेर जोराचा पाऊस पडत असेल किंवा वादळ असेल तर आपल्याला आपल्या घरी परत येऊन किती बरं वाटतं ना? प्रत्येकालाच आपलं घर सुरक्षित वाटतं. आपल्या घरी आपले आई-बाबा ताई-दादा आजी-आजोबा असतात. थोड्या वेळानंतर आपल्याला त्यांची आठवण येते की नाही? शहरात अडकलेल्या लोकांना पण त्यांच्या घराची आठवण येते. लॉकडाउनमुळे त्यांना शहरात काम नाही आणि उत्पन्न नाही. अशा परिस्थितीत ते शहरात राहणार तरी कसे?

लोक घरी चालत का जात आहेत?
लॉकडाउनचा निर्णय अचानक घेण्यात आला. लोकांना याची काहीच पूर्वकल्पना नव्हती. ट्रेन्स, बसेस कॅन्सल करण्यात आल्या. बरेच लोक अडकले. अनेक जण मार्च महिन्यात घरी चालत निघाले. कडक ऊन, अन्नपाण्याचा तुटवडा यामुळे 60 लोकांचे मृत्यू झाले. मग सरकारने घोषणा केली की काही दिवसांनी आम्ही तुमच्यासाठी ट्रेन आणि बस चालू करू. हा कालखंड वाढत गेला. लोकं थांबून कंटाळले. थोड्या प्रमाणात ट्रेन्स व बसेस चालू केल्या होत्या, पण त्या पुरेशा नसल्यामुळे ट्रेन स्टेशनवर गर्दी झाली. परत जायची कुठलीच सोय होत नाहीये, म्हणून बरीच लोक परत चालत निघाली.

सरकार अन्न देत असताना, लोकांना घरी जायची काय गरज आहे?
अन्न (धान्य) ही माणसाची एक गरज आहे, पण ती आपली एकमेव गरज नव्हे. सरकारने गरजू लोकांना धान्य देऊ असं सांगितलं. अन्नधान्य सोडून पण आपल्याला जेवायला आणि जगायला कितीतरी गोष्टी लागतात की नाही? दूध, तेल, साखर, भाजीपाला, फळं इत्यादी. आपण आपल्या कुटुंबाचा विचार करूया, फक्त धान्य खाऊन आपण किती दिवस राहू शकतो?

जेवण सोडून आपल्याला दिवसात काय काय लागतं? आपण आपलीच एक यादी करूयात का? कपडे, पाणी, वीज, घर, घरातली माणसं या त्यातल्या काही थोड्या गोष्टी झाल्या. ह्या आपल्या गरजा पुरवण्यासाठी आपले आई-बाबा नोकरीवर जातात, काम करतात. पण त्यांना काम नसेल तर? काम आणि कामातून मिळणारे पैसे हे आपल्या गरजा पुरवतात. धान्य आपली एकच गरज असती, तर आपल्या भोवतीच्या मोठ्या माणसांनी नोकरीसाठी एवढे खटाटोप केले असते का?

ट्रेनच्या रुळांवर लोक का झोपलेत?
बरीच माणसं ही दिवसभर चालून-चालून थकली, रात्री विश्रांती घ्यायला थांबली. रुळांवर किंवा काँक्रीटच्या रस्त्यांवर साप, विंचू, डास, किंवा इतर प्राणी यायची शक्यता कमी असते. म्हणूनच पायी प्रवास करणारे बऱ्याचदा रस्त्यावर झोपतात. लॉकडाउनमुळे सर्व ट्रेन बंद आहेत अशी माहिती रुळांवर झोपलेल्यांना होती. रात्री कुठली ट्रेन येणार नाही अशी त्यांची समजूत होती. रुळांवर झोपले. दिवसभर चालून ते सगळेच दमले होते. त्यामुळे त्यांना दुरून येणाऱ्या मालगाडीचा आवाज आला नाही. या अपघातात त्यांचे प्राण गेले. या अपघातासाठी त्यांना दोषी ठरवणं बरोबर नाही.