देवाचा शोध (कथा)

देवाचा शोध

लेखन: वैशाली भिडे
चित्र: रोहिणी शुक्ल
(यांची इतर चित्रे इन्स्टाग्रामवर: @acadoodles इथे बघता येतील)

 

रमा आणि तेजस हे दोघे बहीण भाऊ दरवर्षी मे महिन्याच्या सुट्टीत त्यांच्या आजोळी, म्हणजे कोल्हापूरजवळच्या श्रीपादवाडीला, रहायला जायचे. महिन्याभराच्या सुट्टीत ते भरपूर मजा करायचे. उन्हाळी मेवा - जसे आंबा, फणस, जांभळं - खायचे. आजूबाजूच्या वाडीतल्या मुलांबरोबर शेतात फिरायचे, झाडावर चढायचे. आजीबरोबर साबुदाण्याच्या पापड्या, तांदळाचे खिच्चे करायचे. ही सुट्टी कधी संपूच नये असं त्यांना नेहमी वाटायचं.
कारणही तसंच होतं बरं का! इथे त्यांना त्यांच्या खंड्या कुत्र्याचे मनसोक्त लाड करायला मिळायचे. असेच ह्या सुट्टीतही ते आजोळी आले होते. अंगणात खंड्या कुत्र्याबरोबर खेळत होते. तेवढ्यात तेजसने आजोबांच्या देवाच्या आरतीचा आवाज ऐकला आणि दोघेही धावतच देवघरात गेले.

“आजोबा, देवापुढचा पेढ्याचा नैवेद्य खाऊ का?”, रमाने विचारलं.
“अगं थांब जरा. आत्ताच दाखवलाय नैवेद्य. देवाला जरा खाऊ देत. मग तू खा”, आजोबा म्हणाले.
“देव कधी खातो का नैवेद्य! तुम्ही बघितलं आहे का, कधी नैवेद्य खाताना त्याला?”, रमाने हसून विचारलं.
“नाही गं बघितलं, पण तो कोणी नसताना येऊन जातो. तू थोड्यावेळाने खा बरं तो पेढा.”
आजोबा गालातल्या गालात हसले आणि पेपर वाचायला गेले.
“आणि आजी, हे काय करतेस गं?” तेजसने आजीला विचारलं.
“अरे फुलवाती करते आहे निरांजनात लावायला, आणि ही गेजमाळ. बाळकृष्णाच्या गळ्यात घालायला. तुला कशी आई छान नटवते, तशी मी माझ्या बाळकृष्णाला नटवते. मग त्यालाही खूप आनंद होतो.”
“असं तो तुला म्हणाला का?”
“अरे, मला त्याच्या चेहऱ्यावरूनच कळतं.”
“ए आजी, चल ना आपण विचारूयात, की त्याला अजून कशाकशाने आनंद होतो?” तेजस आजीच्या मागेच लागला.
आजी हसून म्हणाली, “असं करा, तुम्ही आधी देवाला शोधा आणि मग विचारा.”

हे ऐकून रमाला एक आयडिया सुचली. ती म्हणाली, “आजी आपल्या फाटकातून एकदम शेवटपर्यंत सरळ गेलं, की काटकर गल्ली लागते. मग तिथे उजव्या हाताला वळलं, की लांडगेवाडी लागते. हो ना?
“अगदी बरोबर”, पेपर वाचता वाचता आजोबा म्हणाले.
“तिथे अबोली आणि वरदचं घर आहे. आम्ही त्यांच्याकडे जातो आणि मिळूनच देवाला शोधतो, चालेल का?” रमाने तिची कल्पना सांगितली.
“हो जा की, पण जेवायच्या वेळेपर्यंत घरी या हं!” आजीने सांगितलं.
“चालेल. बाया आजोबा, बाय आजी” रमा आणि तेजस खूश होऊन निघाले.

फाटकातून बाहेर पडल्यापडल्या लगेचच डाव्या हाताला गणपतीच्या मूर्ती बनवण्याऱ्या बनेकाकांचं घर होतं. सप्टेंबरमध्ये येणाऱ्या गणपतीची तयारी ते आतापासूनच करायचे. छान सुबक मूर्ती घडवायचे. रमा-तेजस त्याच्या घरापाशी आल्यावर त्यांनी आत बघितलं तर काका घराच्या आवारातच मूर्ती घडवताना दिसले.
रमा म्हणाली, “तेजस, आपण बनेकाकांना विचारूयात का, त्यांना गणपती बाप्पा कधी भेटला आहे का?”
“चल चल, जाऊयात”, तेजस म्हणाला.
तसे रमा-तेजस बनेकाकांच्या घरात गेले.

“काका, येऊ का?”, रमा म्हणाली.
“या या! काय गणपतीच्या मूर्ती बघायला आलात वाटतं? हे बघ, मी आता तयार करतो आहे ना, तो छान सिंहासनावर बसलेला गणपती आहे बरं का! आणि तो तिकडे आहे ना, तो कमळामध्ये बसलेला गणपती. आवडला का तुम्हाला?” काकांनी अगदी कौतुकाने मुलांना सांगितलं, “अशा वेगवेगळ्या मूर्ती मी दरवर्षी घडवतो. गणपतीदेखील खूश होतो बरं का!”
“तो तुम्हाला येऊन सांगतो का, की मी खूश झालो आहे?” तेजसनं विचारलं.
“अरे, तो कसा सांगेल! मला कळतं त्याच्याकडे पाहून की तो खूश झाला आहे ते.”
“काका, आम्हाला गणपतीला भेटायचं आहे. तो येईल का इथे?” रमाने विचारलं.
“गणपती यायला अजून चार महिने आहेत. अजून कितीतरी मूर्ती मला घडवायच्या आहेत. अख्ख्या श्रीपादवाडीसाठी! त्यामुळे मी खूप गडबडीत आहे आत्ता. पळा बरं इथून”, हसून बनेकाका म्हणाले.

तसे रमा आणि तेजस पुढे निघाले. आज त्यांना देवाचा शोध घ्यायचाच होता.
वाटेत त्यांना कैलासकाकांच्या घरात कोंबडीचं खुराडं दिसलं. त्यामध्ये एक कोंबडी पंखाखाली अंडी घेऊन शांत बसली होती.
तेजस हळूच कोंबडीजवळ गेला. तशी कोंबडी रागावून म्हणाली,
जवळ नको येऊस, त्रास नको देऊस.
ट्क ट्क चोची देतायेत ढुश्या,
अंड्याच्या आतून मारतायेत टोचा

रमा म्हणाली,
“आम्ही कशाला त्रास देऊ, आम्ही कशाला पिल्लं पाहू,
आम्ही शोधतोय देवबाप्पाला, भेटलाय का कधी तो तुला?”

तेव्हा कोंबडी म्हणाली,
“पंख उघडायला फुरसत नाही, चोच घासायला उसंत नाही,
काय करू बाप्पा शोधून, पळा आता तुम्ही इथून”

तेजस-रमाला पुढे लांडगेवाडीकडे जात असताना, वाटेत एक गाढव भेटलं. तेजसने विचारलं, “गाढवदादा, गाढवदादा, सांगा ना गडबडीत कुठं चाललात? येता का आमच्याबरोबर देवबाप्पाला शोधायला?”
“दिवसभर खूप राबतो, तेव्हा कुठं पोट भरतं.
आपलं आपण काम करावं आणि निमूट पडावं.”
असं म्हणून गाढव त्याच्या कामाला निघून गेलं.

समोरच एक शेत होतं. रमा आणि तेजस धावतच त्या शेतात गेले. शेतकरीदादाला कामापुढे फुरसतच नव्हती.
तो म्हणाला,
“पोरांनो घाम गाळतो, बी रुजवतो तेव्हा कुठं पोट भरतं.
सांग माझा निरोप देवाला. पाऊस पाडत जा, न चुकता.”

रमा आणि तेजसला आता खूप भूक लागली होती. जवळच एका झाडाच्या सावलीत ते बसले. त्याबरोबर झाड म्हणालं, “अरे पोरांनो माझी गोड गोड फळं खा. बरं वाटेल तुम्हाला.” दोघांनी पोटभर फळं खाल्ली. मस्त पैकी ढेकर दिली. “हं बोला आता झाडदादा, देवबाप्पाला कधी फळं देता?” तेजस, रमाने विचारलं. झाड म्हणालं,
“काय माहीत, कुणास ठाऊक,
देवबाप्पा कधी येऊन गेला,
माझी फळे खाऊन गेला
तुम्हाला भेटेल देवबाप्पा जेव्हा,
नक्की घेऊन या माझ्याकडे तेव्हा.

तेवढ्यात आकाशातून दोन ढग जाताना रमाने पाहिले, तशी ती जोरातच ओरडून त्यांना हाक मारून म्हणाली, “ढगदादा, ढगदादा निरोप दे ना देवाला, राहतोस ना इतक्या जवळ त्याच्या.”

“छे रे बाबा वेळ कुठला,
शेतकरीदादा वाट बघतोय,
पाऊस पाडायची तयारी करतो,
तुम्हा सगळ्यांना पाणी देतो.” असं म्हणून ढग पुढे निघून गेले.

अबोली - वरदकडे पोहोचायला उशीर होऊ नये म्हणून ते दोघं लगबगीने पुढे निघाले. तेवढ्यात तिथे उभ्या असलेल्या एका आजीबाईंनी त्यांना हाक मारली, “अरे मुलांनो इकडे या जरा. मला त्याबाजूच्या गल्लीत सोडता का? मला ना जरा नीट दिसत नाही रे.”

रमा, तेजस पळतच आजीबाईंजवळ गेले. “हो! सोडतो की”, असं म्हणून आजीबाईंना त्यांनी रस्त्याच्या पलीकडच्या गल्लीत सोडलं.
तसं आजीबाई दोघांना जवळ घेऊन म्हणाल्या, “गुणाची रे माझी पोरं. अगदी देवासारखे भेटलात!", असं म्हणून त्या रस्त्याच्या कडेकडेनं निघून गेल्या.
तेजस रमाकडे बघून आश्चर्याने एकदम म्हणाला, “रमा ऐकलंस का, आजीबाई काय म्हणाल्या ते!”
रमा, तेजस खूश होऊन मोठ्याने म्हणाले, “अगदी देवासारखे भेटलात रे!”