द्वितीय क्रमांक विजेती एकांकीका: दिडशे रुपये

दिडशे रुपये
लेखक: संकेत अविनाश कोर्लेकर, रोहा

(नमस्कार, कृपया आपले फोन स्वीच ऑफ अथवा सायलेंट मोड वर ठेवावेत, नाहीतर गाठ चिलकूट गॅंग शी आहे. चिलकूट गॅंग कोण? चिलकूट गॅंग म्हणजे काय?) (पडदा उघडतो) (मध्यभागी स्पॉट पडलेला आहे, पत्र्याचा डबा गळ्यात घातलेला, मळकट कपडे घातलेला, एक काळपट मुलावर स्पॉट पडलेला आहे, तालासुरात एकदम मस्त पत्र्याचा डबा वाजवायला सुरुवात करतो.) (एका विशिष्ट पॉईंट ला मोठ्यांनी थाप मारतो, थाप मारल्या मारल्या पूर्ण स्टेज वर प्रकाश येतो आणि सगळी चिलकूट गॅंग प्रवेश करते. आणि सुरात काहीतरी वाजवून प्रेक्षकांना तल्लीन करते.) (प्रत्येकाच्या हातात काहींना काही वाजविण्यासाठी आहे) (चिलकूट गँगमध्ये सर्वात मोठी असलेली ताई / दादा मध्ये येते. त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करते ते शांत होत नाहीत, मग शेवटी ती मोठ्यांनी ओरडते आणि सर्व शांत होतात.)

दीदी: नशीब थांबलात नाहीतर मीच देणार होते एकेकाला (रंगात आणि टपोरी Style मध्ये बोलते. लगेच सगळे बोलायला सुरवात करतात)
चंगू: मला वडापाव
मंगू: मला भजी
छो. हिमेश: सोबत extra पाव
कटिंग: चटणी पण
तिरसट्या: कटिंग चाय पण
कटिंग: ए मला हाक कशाला मारतयस! आता ती हाय ना तिला सांग
(दीदींकडे बोट दाखवतो)
दीदी: अरे बाटलीच्या झाकणा, स्वतः ला जास्त उघडू नकोस नायतर हवा निघून जाईल, नाहीतर मी काढीन.
मंगू: अग झालं काय तुला चिडायला?
कटिंग: नायतर काय प्रॅक्टिस पण नाही करून दिली.
दीदी: अरे बाप्पाला न्यायची वेळ झालेय आणि खूप तयारी बाकी आहे आजून
सर्व: अरे हो
दीदी: अले हो, चला तयारीला लागा (स्टेजच्या मध्यभागी येते आणि चिलकुट गॅंग तिच्याभोवती उभी रहाते.) दाखवून देऊ त्या शेजायच्या गल्लीतल्या पोरांना बाप्पाला त्याच्या घरी आनंदाने पाठवायला मोठी इच्छा लागते, मोठे पैसे नाही.
सर्व: क्या बात, क्या बात, क्या बात…..!
दीदी: चला चला तयारीला लागा
छो. हिमेश: चला चला हो चला तयारी करूया, बाप्पाला टाटा करूया हो..
तिरसट्या: करू हा करू, आधी नीट तयारी करू
(लागा कामाला. बोलून त्याला टपली मारतो. तयारी सुरु होते, कोणी गाडी सजवताय,कुणी बाप्पाला आणताय अशी तयारी चालू आहे, तितक्यात कटिंग विंगेतून बाहेर येतो आणि बोलतो)
कटिंग: चला निघा, शेजारच्या गल्लीतला बाप्पा निघाला पण!
सर्व: काय बोलतो, चला निघा
गणपती बाप्पा मोरया….
पुढल्या वर्षी लवकर या……
BLACKOUT

(लाईट, मुलीवर लाईट पडतो ती डोकं टेकून रडत बसलेली आहे) (तितक्यात थोडेफार भिजलेले पायाला वाळू लागलेले, केस ओले झालेले चिलकूट गॅंग विंगेतून Entry मारते)
कटिंग: चला बाप्पा आता Direct पुढच्या वर्षी येणार
तिरसट्या: पण जेव्हा येतो ना तेव्हा जाम मज्जा येते, आज आली तशी
चांगु,मंगू,: नुसती मज्जा, मस्ती आणि धमाल
छो. हिमेश: मजा आणि मस्ती बोले तो धूम मचा दे….
अश: इसी बात पे पार्टी हो जाने दे!
दीदी: कोण? तू देणारेस?
अश: माझ्याकडे पैसे नाही
कटिंग: तुझ्याकडे काय कोणाकडेच पैसे नाही.
(सगळे हसत, एकाच लक्ष त्या मुलीकडे जात चंगू बोलतो ती कोण आहे? त्याच्यापाठी सर्व Comedy pose देऊन उभे रहातात)
सर्व: कुठे?
चंगू: अरे, ती बघ न ती रडतेय!
तिरसट्या: (त्या मुलीकडे बघून) ए काय झालं रडायला?
दीदी: ए तिरसट्या जरा Chill मार खेकसू नको तिच्या अंगावर, श्रीमंत घरातली दिसतेय जेल मध्ये टाकेल
(घाबरून मागे जातो, दीदी तिच्या जवळ जाऊन बसते)
दीदी: ए, ऐक ना! कोण आहेस तू, हरवली आहेस का??
मुलगी: (मुलगी रडत रडत होकारार्थी मन हलवून.) हो
दीदी: रडू नको तू आम्ही आहोत ना तुझे मित्र आणि सोडू तुला घरी
कटिंग: (दीदीला बाजूला बोलावून (घरी सोडू काय घरी सोडू , पैसे कुठेयत)
दीदी: अरे अकलेच्या कांद्या ती रडायची थांबावी म्हणून बोलले मी, थांब तू
(परत त्या मुलीजवळ येते) ए सांग ना कोण आहेस तू कुठे राहतेस.
(मुलगी तिच्याकडे बघते परत रडायला लागते)
तिरसट्या: अरे हि परत रडली
कटिंग: अरे इसको हसानेकी जिम्मेदारी मेरी (वेगवेगळ्या Actions करून दाखवतो ए माकड,
ए ससा, ए हत्ती ती मुलगी काही हसत नाही पण)
तिरसट्या: आता मी. (पत्र्याचा डब्बा गळ्यात घालतो आणि मस्तपैकी नाचत नाचत इकडून
तिकडून डब्बा वाजवायला लागतो. ते बघून ती मुलगी खुद्कन हसते.. तेवढ्यात तो बोलतो)
बोललो ना ...
चंगू: ए हसली हसली मी जिंकलो जिंकलो बोललो ना ...
सगळे: कस काय रे?..
चंगू: माझा बा म्हणायचा.. नाचण्यामंदि लय पावर हल हमली क नाय...
दीदी: (ह्याच संधीचा फायदा घेऊन) हा सांग नाव काय तुझं?
मोना: माझं नाव मोना
छो. हिमेश: अरे मोना डार्लिंग
दीदी: अरे गप रे, मोना तू कुठे राहतेस?
मोना: मी इथून खूप दूर रहाते, आम्ही सगळीकडंच विसर्जन बघायला गेलेलो, पण तुम्ही सगळे
ते मस्तपैकी वाजवत होतात.. मग ते बघून मला खूप छान वाटलं मग मी बघत बसले.
(एका स्पॉट खाली येते) मला ना खूप आवडत तुमच्यात नाचायला पण मला कळलंच
नाही कि मिरवणूक पुढे आली आणि कधी मी आई पासून हरवले ते, माझी आई मला
हवेय... मला आई पाहिजे.. (रडायला लागते, सगळे तिच्या जवळ जातात)
दीदी: मोने, तू अजिबात काळजी करू नकोस. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत तुला घरी
पोचवायची जबाबदारी आमची (Music) मोना खुश होऊन दीदीला मिठी मारते.
छो. हिमेश: घरी पोचवणार.. आम्ही तुला आता.... पोचल्यावर फोन. करशील का.. मोना. मोना..
डार्लिंग. (सगळे आपापली Position घेतात)
दीदी: हा आता बोल
सगळे: बोल.. बोल. बोल.. लवकर लवकर बोल
गोजिरी: तुझ्या घरच्यांपैकी कोणाचा तरी नंबर सांग, चंदू काकाला फोन करून तुझ्या आई बाबांना बोलवून
घेऊ.
(मोना परत रडायला सुरुवात करते)
सगळे: काय झालं?
मोना: माझा नंबर पाठ नाहीए!
दीदी: बरं मी कुठे रहातेस तरी माहिती आहे का?
मोना: हो.. (हाताची घडी) वीरा देसाई रोड, बंगला नंबर ४, अंधेरी वेस्ट
बेबी: लागली वाट, अंधेरी….. जाम लांब.. जाम पैसे..
दीदी: अरे गप रे. रिक्षावाल्या काकांना Request करू ते सोडत आहेत का? (जातात)
अहो काका वीरा देसाई रोड, बंगला नंबर ४, अंधेरी वेस्ट इकडे जायचंय किती रुपये
लागतील?
रिक्षावाला: (विंगेतून) दीडशे
मंगू: अहो पोरगी हरवली आहे, जरा सोडा ना. हि पोहचल्यावर देईल तुम्हाला पैसे
रिक्षा: काय भरवसा? पोट हाय आम्हाला.. Risk कोण घेईल?
दीदी: बघाना काय होतंय का..?
रिक्षा: जमणार नाय.. दीडशे द्या. पोरीला सोडतो घरपोच
दीदी: दीडशे नाही आहेत ओ आमच्याकडे
रिक्षा: मग ते मला नका सांगू. चला निघा
मोना: (रडायला सुरुवात करते) मला आई पाहिजे
दीदी: ए मोने.. ऐक ना. तू रडू नको आणि पोचवणार तुला संध्याकाळपर्यंत तुझ्या घरी. माहितेय दीडशे रुपये खूप मोठी रक्कम हाय पण तू आम्हाला जरा वेळ दे .. जर जमा झाले तर ठीक.. नाहीतर पोलिसांकडे जाऊ आपण
मोना: नाही पोलीस नको मला भीती वाटते
दीदी: बरं मग संध्याकाळपर्यंत वेळ दे मला
मोना: हो
दीदी: बरं मग आता रडायचं (मोना नाही डोलावते) मजा कारणार आमच्यासोबत?
मोना: हो (खूप खुश होऊन)
कटिंग: मजा, मस्ती करू पण आधी दीडशे रुपये कसे जमवायचे त्याचा विचार करा.
सर्व: अरे जमतील रे
मोना: कसे जमवणार तुम्ही, तुम्ही भिकारी आहेत का (एकदम छोट्या मुलीप्रमाणे विचारते) (मनात काही नाही)
सगळे: ए. (रागात)
दीदी: (सगळ्यांना मोठे डोळे करत) मोना.. आम्ही फक्त दिसतो भिकाऱ्यांसारखे पण
आम्ही भीक मागत नाही.. आम्ही स्वतः च्या जीवावर कमवतो.. आणि एक वेळच का
होईना पण स्वतः च्याच कमाईचं खातो (ओळख करून देते)
हा कटिंग.. चहाच्या गाडिवर काम करतो
हा तिरसट्या. कार पुसायचे काम करतो
हा छोटा हिमेश.. रेल्वेमध्ये गाणे गातो
हि अश… हि नेहमी हिच्याबरोबरच असते
हि बेबी…. टोपल्या विणते
हि चिंगे…… हि नेहमी माझ्यासोबतच असते
हि गोजिरी….. हि आमची आहे
हे चंगु मंगू. बूट पॉलिश करतात
मोना: तू काय करतेस??
दिंदि: मी.. मी ना टिकली बांगड्या विकते
मोना: मला खूप आवडतात टिकली बांगड्या
दीदी: देईन हा तुला नक्की देईन
मोना: पण माझ्याकडे पैसे नाहीत
दीदी: तुला सुखरूप घरी पोहचवणे हेच माझे पैसे.
(मुलगी गोड हसते) चला सांगा कोणाकडे किती रुपये शिल्लक आहेत?
तिरसट्या: काय शिल्लक असणार. सगळे खर्च झाले आणि शेट आता उधार पण देणार नाय..
दीदी: अरे पण. आहे किती ते तर सांग सगळे
- माझ्याकडे चार रुपये
- माझ्याकडे पाच
- माझ्याकडे दहा
- माझ्याकडे ७ते ८
- माझ्याकडे पण १०-१२ असतील
दीदी: पण हे सगळे मिळून जेमतेम पन्नास होतील
मोना: दीदी मी घरी पोचेन ना
दीदी: आम्ही काहीही करून पैसे कमवू.. पण तुला तुझ्या घरी सुखरूप पोचवू
मोना: मी तुमचे सगळे पैसे परत करेन पप्पाना सांगून
तिरसट्या: कोणत्या कंपनीत आहेत ग तुझे पप्पा
मोना: आमची कंपनी आहे.. आणि एक आश्रम शाळा पण सांभाळतात माझे पप्पा
कटिंग: दीदी तुला काय झालं?
दीदी: काहीही करून पैसे कमवायला लागतील
तिरसट्या: अरे टेन्शन नॉट. माझ्याकडे एक भन्नाट प्लॅन आहे
सगळे: कोणता?
तिरसट्या: आता माझंच बघा.. मी ह्या आधी फक्त मालकाची गाडी पुसायचो, पण आज मी प्रत्येक
ट्रॅफिक वर जाऊन सगळ्या गाड्या पुसेन. जमतील ते जमतील पैसे
कटिंग: अरे हा.. मी पण चहा चा भांड घेऊन बागेत जाईन.. कमाई होईल ती होईल.
छो. हिमेश: मी पण सेंट्रल सोबत हार्बल ला काम करिन
चंगू मंगू: आम्हीपण एकाठिकाणी बूट पॉलिश करण्यापेक्षा सगळीकडे फिरत फिरत पॉलिश करू.
दीदी: मी पण बघते. काहीतरी करते
(मोना कुतूहलाने बघतेय)
तिरसट्या: मोना डार्लिंग काय झालं?
मोना: माझ्या वर्गातल्या मैत्रिणी मला बोलतात कि झोपडीत रहाणारी मुलं वाईट असतात, पण
तुम्ही सगळे किती चांगले आहेत
दीदी: असच असतं मोने. आंधळे आणि गाडीच्या काचेतून बाहेर बघणारे दोन्ही सारखेच.
मोना: आणि बाहुली सोबत खेळणार…….. बाहुली पण वाट बघत असेल माझी
तिरसट्या: बाहुबलीच खेळणं हाय तुझ्याकडे ..?
सगळे: बाहुबली नाय बाहुली
दीदी: (उभी रहाते) चला चला कामाला लागा
सगळे: चला
कटिंग: अरे काय चला. कुणी तरी एकाने हिच्यासोबत थांबा.. चंगू मंगू तुम्ही थांबा.
तशी तुम्हाला आता गर्दी नाय मिळणार.. (चला रे) गणपती बाप्पा... मोरया
(सगळे जातात, स्टेज वर मोना आणि चंगू मंगू आहेत मधला स्पॉट)
चंगू: ए मोने. मगाशी काय ग काय बोलत होतीस, आम्ही काय वाईट हाय काय..
मोना: अरे मी नाही.. आमच्या वर्गातल्या मैत्रिणी
चंगू: तू कोणत्या वर्गात जातेस?
मोना: 3rd standred
मंगू: काय शिकवतात तिकडे?
मोना: सगळं. Poem, Lessons, Games, Sports……..का? तुम्ही नाही जात शाळेत?
(दोघेही लोळून हसायला लागतात)
चंगू: अग मोने शाळत जायला पैसे असतो तर मी आज बूट पोलिश कशाला केली असती
मोना: आमच्यापण शाळेत रूल आहे. रोज बूट पॉलिश करावं लागतं, पण ना मला जमतच
नाही.. मग आमचा नोकर आहे ना.. पांडू दादा तो देतो करून. तुम्ही शिकवाल मला?
म्हणजे पांडू दादाचा त्रास वाचेल.
चंगू: शिकवू ना
मंगू: पण आधी आम्हाला Poem शिकव
मोना: चालेल.. मग रेडी?
दोघे: रेडी.
(बाबा ब्लॅकशीक शिकवते) (ते हलत डुलत गतात)
मोना: आता तुम्ही
(ते बूट पॉलिश शिकवतात)
मंगू: आहे कि नाय सोप्पं
मोना: हो आता उद्यापासून मीच करणार. तुमच्या मुळेच जमलं मला.. Thanku
दोघे: बस काय..
(तिरसट्या येतो)
तिरसट्या: काय मोने ह्या दोघांनी तुला जास्त भेजा फ्राय नाही ना दिला.
मोना: म्हणजे?
तिरसट्या: अगं म्हणजे त्रास नाही ना दिला?
मोना: अजिबात नाही, उलट त्यांनी मला बूट पॉलिश शिकवलं
दोघे: आणि तिने आम्हाला Poem...
तिरसट्या: जा चला आता हळू हळू गर्दीचा टाइम होतोय
दोघे: हो जातो. चल रे.
तिरसट्या: ए मोने. जाणार तू घरी. नक्की जाणार. फक्त रडू नको आपलयाला वाईट वाटत..
मोना: तुला एक विचारू
तिरसट्या: बस काय..
मोना: तुला सगळे तिरसट्या का बोलतात?
तिरसट्या: त्याच काय हाय ना. आपण ज्या गोष्टी रोज ऐकतो, बघतो त्या आपल्या अंगात
शिरणारच ना
मोना: म्हणजे?
तिरसट्या: एका श्रीमंत माणसाकडे मी गाड्या पुसतो, तो मला जाम शिव्या देतो जाम ओरडतो..
तेच रोज रोज ऐकून माझं पण तोंड असं झालाय, म्हणून मला तिरसट्या बोलतात .
मोना: आमच्याकडे पण गाडी पुसायला एक दादा येतो, पण माझे बाबा त्याचाशी कधीच रागवून
बोलत नाही उलट प्रेमानी बोलतात.
ती: बरं हाय मग. आपली पण बघ सेटिंग लागते का
मोना: म्हणजे
तिरसट्या: म्हणजे तुझे बाबा प्रेमानी बोलतात ना.. मग मी पण दोन - तीन शब्द प्रेमाचे शिकेन
मोना: म्हणजे जसे आजूबाजूचे बोलतात तसे आपण बोलतो तसे आपण बोलतो
तिरसट्या: अगं वागतो पण. मी पण एकदा वाईट मार्गाला लागलेलो आपली दीदी नसती तर
आता असतो जेल मध्ये.. म्हणून जे जे चांगले आहेत त्यांच्यासोबत आपण जाऊन
बसतो
(कटिंग आणि हिमेश येतात)
कटिंग: ए तिरसट्या उगाच पकवत बसू नको रे तिला
मोना: तिरसट्या दादा खूप चांगला आहे.
हिमेश: क्या बात.
तिरसट्या: अरे तुम्ही बस आता मी जाऊन आलो Road ला Traffic झालं असेल. मै चू गया यु आया
(कटिंग आणि हिमेश गाणं म्हणतात, तिला हसवायचा प्रयत्न करतात)
आयो हो मेरी जिंदगी मी तुम बघर बनते.
अरे मन मे यूही रहना.. ओ ओ ओ
दोघे: बोलो रानी. काय हवंय तुम्हाला..?
मोना: सांगू?
दोघे: बिनधास्त.
मोना: मला भूक लागलेय.. पिझ्झा किंवा बर्गर मिळेल का?
कटिंग: अगं हे आम्ही खाताना बघू शकतो, पण हे घ्यायला नाही पैसे, पण तू वडापाव किंवा
भजीपाव खाणार. मस्त एकदम टेस्टी
मोना: मी हे कधी खाल्ल नाहीए
दोघे: मग आता खा ना
कटिंग: आम्ही आलोच……… तू बसून रहा
(वातावरण एकदम शांत.. रंगमंचावर फक्त ती एकटीच, पुढे येते)
भाजी पाव, वडा पाव, चटणी आई मला खूप आठवण येते तूझी. ये ना मला घेऊन जाना.. इथे सगळं खूप वेगळं आहे. पण माझे मित्र खूप मस्त आहेत, सगळेच खूप छान आहेत . (त्या वातावरणात ती हरवून जाते आणि गाड्यांच्या आवाजावर विंगेत जाते. ती जशी विंगेत जाते तसे दीदी, चंगू,मंगू ती येतात)
दीदी: मोना कुठेय?
तिरसट्या: कटिंग आणि हिमेश कुठय? (ते येतात)
दीदी: मोना कुठेय?
कटिंग: अरे इथेच असेल कुठेतरी. शोध
(संगीत वाढू लागत)
दीदी: अग कुठे गेलेलीस तू..?
तिरसट्या: आम्ही घाबरलो ना
चंगू: किती काळजी वाटली माहितेय
मोना: मला आईची आठवण येतेय (दीदी विषय बदलते आणि बोलते)
दीदी: चला चला गल्ला सांगा, किती किती झालाय
(सगळे गोल बसतात)
- माझे २२
- माझे १५
- माझे २३
- माझे ३०
दीदी: हे घ्या माझे ६०
कटिंग: दीदी एवढी कशी झाली खरेदी?
तिरसट्या: गिऱ्हाईक कसे मिळवलेस?
दीदी: अरे खूप शोधले.. पण कोणी घेतच नव्हतं, पैशाची पण अड होती, मग जिथून माल घेतलेला तिथेंच कमी किमतीत विकला, ते सोडा…. चला पैसे मोजा
(मोजत असतो तो सांगतो)
१४० झाले दीडशे नाही जमले
(मोना रडते)
दीदी: थांबा थांबा (रिक्षा वाल्याकडे जाते विंगेत सगळे Mute मध्ये तिला समजवतायत)
दीदी: अंधेरी वीरा देसाई रोड किती?
रिक्षावाला: दीडशे
दीदी: १४० मध्ये सोडा ना.
रिक्षावाला: भाजी मार्केट वाटलं का.. चल निघ (मुलांजवळ जाते आणि नाही अशी मन डोलवते,
आणि येऊन बसते. शांतता. मोना हुंदके देत समोर येते आणि बोलते..
एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होत आई………..
एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होत आई………..
कधी घेशील कुशीत मला सांग ना ग आई..
ना ना ना ना ना...
(foreign photographer entry)
(सगळी मुलं तिला बघत बघत पुढे येतात आणि ना ना ना ना. बोलतात हे सगळं तो foreign photographer बघतो आणि त्या मोनाच्या हातात १०० रुपये ठेवतो. आणि निघून जातो)
(तिरसट्या आणि सगळे त्या photographer कडे विंगेत जाताना बघतात आणि तिरसट्या मोठ्यांनी ओरडतो गणपती बाप्पा मोरया..)
कटिंग: अरे शंभर रुपये मिळाले
हिमेश: २४० झाले.. (सगळे तिच्याभोवती रिंगण करून नाचतात)
दीदी: मोना. चल.. निघूया...
मोना: तुम्ही पण चला ना.
दीदी: आम्ही नाही येऊ शकत तू जा.. नशिबाने जे जगणं मिळालाय ते मस्त मजा कर.
चला रे निघूया
कटिंग: एक मिनिट (आत जातो डबा घेऊन येतो) मोना डार्लिंग आम्ही तुला असंच जाऊन
नाय देणार.. बजाओ रे (मिरवणुकीसारखा तिला विंगेपर्यंत नेतात)
दीदी: ओ दादा अंधेरी वीरा देसाई रोड, बंगला नं ४, अंधेरी वेस्ट..हिला व्यवस्थित सोडा
रिक्षावाला: दीडशे रुपये आहेत का?
दीदी: हे. घ्या २४० रुपये तुमचे दीडशे रुपये काढून घ्या आणि उरलेल्या पैशानी एखाद्या
अडलेल्याला सोडा... (सगळे टाळ्या वाजवतात)
मोना डोळे बंद कर (दीदी बोलते) ती तिच्या हातावर बांगड्यांचा पाकीट ठेवते..
आता जा नीट जा
रिक्षेचा आवाज (Bye…. Bye…. मोना)
BLACKOUT
(सगळे मोनाच्या आठवणीत आहेत) (तिरसट्या येतो)
अरे भाईलोग. कोणीतरी पांडू दादा हि चिट्ठी देऊन गेलाय
चंगू: अरे म्हणजे मोना चे नोकर
दीदी: थांबा थांबा वाचते
(Silent Music)
मुलांनो, मी मोनाचे बाबा. मोना सुखरूप पोहचली. तुमच्या सगळ्यांचे खूप उपकार आहेत आमच्यावर (एकमेकांकडे बघतात) एक विनंती करतो, आता तुम्ही काहीच करायचं नाही... तुमची नोकरी सोडा आणि सामान गुंडाळून बंगल्यावर या. एका आश्रम शाळेत मॉनिटर म्हणून मी तुमची निवड करतोय
पत्ता आणि नोकरीची माहिती पाठी लिहिलेली आहे, लवकर या. मोना वाट बघतेय. (पान पलटते)
वीरा देसाई रोड, बंगला नं ४, अंधेरी वेस्ट...
तिरसट्या: दीदी दीदी... नोकरीचे पैसे किती मिळणार प्रत्येकाला...?
दीदी: दीडशे रुपये दिवस... (Music) (सगळे आनंदात तयारीला लागतात)

पडदा

एकांकीकेचा प्रयोग करायचा असल्यास लेखकाची परवानगी आवश्यक.