या या यु यु ये ये (गोष्ट)

या या यु यु ये ये
लेखन: अमृता गोटखिंडीकर
चित्र: श्याम वानरे

एक असतो भूषणमामा . गट्टू नाक, गच्चू गाल, भरघोस मिश्या आणि ढमढम ढेरी. त्याला गप्पा मारायला आणि खायला खूप आवडायचं. सारखी त्याची बडबड आणि खायची गडबड. गप्पा मारायला लागला, की बाकी सगळं विसरायचा. गप्पा झाल्यावर भूक लागायची. मग खाता खाता गप्पा मारायला सुद्धा विसरायचा. 

तर एकदा काय झालं, भूषणमामाने ऑफिसमध्ये गुल्लू खाल्ले. त्याचा पाक त्याच्या शर्टावर सांडला, पण त्याच्या लक्षात आलं नाही. मग ऑफिसमधून घरी आल्यावर त्याने चहा प्यायला आणि बोलता-बोलता एक बिस्कीट तोंडात टाकायच्या ऐवजी खिशात ठेवलं. संध्याकाळी भेळ खाल्ली आणि हात धुवायचे विसरला. रात्री घरी आल्यावर सोफ्यावर बसून टीव्ही बघत बघत तसाच झोपी गेला. मग काय झालं...

थोड्या वेळाने एक मुंगी तिचं जेवण शोधत शोधत सोफ्याजवळ आली. तिला छान छान वास यायला लागला. त्या वासाच्या दिशेने ती हुंगत हुंगत गेली, तर तिला मामाच्या ढमढम ढेरीवर एक साखरेचा दाणा सापडला. तिने आपले पोट आत घेऊन पुढचे पाय हवेत उचलले आणि जोरात ओरडली... "या या यु यु ये ये..." म्हणजे काय..."भूषणमामाच्या अंगावर साखर सापडली".
मुंग्यांची भाषा वेगळी असते बरं का!.

तिने तो साखरेचा दाणा जरा चाटला. नक्की साखरच होती ती. मग ती तुरुतुरु भूषणमामाचं अंग उतरून सोफ्याच्या पायाजवळ आली. तिथे दोन मुंग्या त्यांचं अन्न शोधत होत्या. त्यांच्या जवळ जाऊन तिने एका मुंगीला शुकशुक केलं आणि आपण कसं डोक्याला डोकं लावून 'ठो' करतो, तसं त्यांनी डोक्यावरच्या अंटेनाने एकमेकांना 'ठो' केलं. दुसरी मुंगी जोरात ओरडली..."या या यु यु ये ये".. म्हणजे काय .."भूषण मामाच्या अंगावर साखर सापडली".
मुंग्यांची भाषा वेगळी असते बरं का!..

मग दुसऱ्या मुंगीने तिसऱ्या मुंगीच्या अंगाला अंग घासले. ती मुंगी जोरात ओरडली.."या या यु यु ये ये.. युम युम?" म्हणजे काय .."भूषण मामाच्या अंगावर साखर सापडली. पण कुठे?".
बघ हं किती वेगवेगळ्या प्रकारे मुंग्या एकमेकांशी बोलतात.

दोन्ही मुंग्या बाकीच्या मुंग्यांना सांगायला बाल्कनीमध्ये पळाल्या. तर पहिली मुंगी पळत पळत परत भूषण मामाकडे निघाली. जाताना तिने तिच्या अंगातून घामासारखा रस सांडला.
थोड्यावेळाने दोन मुंग्या त्यांच्या शंभर साळकाया माळकायांना म्हणजे मैत्रिणींना घेऊन सोफ्याच्या पायापाशी पोचल्या. इकडे भूषणमामा ढाराढूर झोपलाय काय! पहिल्या मुंगीने तिच्या अंगातून घाम सांडला होता ना, त्याचा वास घेत घेत साळकाया माळकाया सोफ्यावर चढायला लागल्या. जोरजोरात म्हणायला लागल्या, "या या यु यु ये ये.. म्हणजे काय ".."भूषण मामाच्या अंगावर साखर सापडली ".

इकडे पहिली मुंगी ढेरीवरून पळत पळत खिशाकडे निघाली. तिला तिच्या आवडत्या बिस्किटाचा वास येत होता.बाकीच्या मुंग्या हळुहळू भूषण मामाच्या ढेरीवर आल्या आणि कामाला लागल्या. काही मुंग्यांनी गट करून साखरेचा दाणा खाली न्यायचं ठरवलं. काही जणी बिस्कीट चाखायला निघाल्या. कोणाला मामाच्या भरघोस मिशीमध्ये अडकलेला शेवेचा कण खायचा होता. मामाच्या पोटावर अंगावर मुंग्यांची पार्टी चालू झाली. सगळीकडे नुसत्या आरोळ्या उठत होत्या... 'या या यु यु ये ये! या या यु यु ये ये..!' त्यातून मामाचे पोट खालीवर होत होते, त्याची सगळ्यांना गंमत वाटत होती.

मुंग्यांचा दंगा इतका वाढला, की थोड्यावेळाने त्याला गुदगुल्या व्हायला लागल्या. त्याच्या गट्टू नाकापाशी गेलेल्या एका मुंगीमुळे त्याला एक जोरदार शिंक आली. आकक्क्शीऽऽऽ 

मुंग्या तीन ताड उडाल्या. घाबरून मामाला चावायला लागल्या. मामा झोपेतून जागा झाला आणि ओरडायला लागला...

"या या यु यु ये ये"

"या या यु यु ये ये"