जंगल आजी ४: कोल्ह्याला द्राक्ष आंबट

गोष्ट चौथी: कोल्ह्याला द्राक्ष आंबट

लेखन: डी.व्ही.कुलकर्णी 
चित्र: प्राची केळकर भिडे

याआधीच्या गोष्टी: ससोबा का आयतोबा आजीच्या जवळी घड्याळ कसले. | करकोच्याचा पाहुणचार

एकेकाचा पाहुणचार स्वीकारीत आजी जंगल वाटेतून जाताना आजी कोल्ह्याला म्हणाली, “करकोचा वहिनीने खीर छान केली होती, परंतु त्यात काही फळे विशेषतः द्राक्ष घातली असती तर आणखी मजा आली असती.”
“द्राक्ष नको”, कोल्ह्याने चटकन उत्तर दिले.
“का रे?”
“नको. द्राक्ष आंबट असतात”, कोल्हयाचा सूर काहीसा नाराजीचा होता.
आजी मनापासून मोठ्याने हसली .म्हणाली, “कोल्होबा ,अजूनही द्राक्ष आंबटच आहेत कारे तुला ?”
“आजी! कर तू देखील माझी चेष्टा कर. कोणीही यावं आणि टपलीत मारावं, असं झालंय. त्यादिवशी मी द्राक्षाच्या मळ्यात नुसता बसलो होतो,  तर तो लबाड लांडगा लांबूनच ओरडतो, ‘कोल्ह्याला द्राक्ष आंबट’ म्हणून. आजी, आता तूच सांग. माझी बुद्धिमत्ता कुठे त्याची कुठे! हे तर काहीच नाही, तो यःकश्चित कावळा, त्याने तर कमालच केली. दोन द्राक्ष तोडली, माझ्या पुढ्यात टाकली आणि म्हणतो, ‘खा रे कोल्हया, चांगली गोड आहेत द्राक्ष’. म्हणजे आजी, कोणीही यावं आणि माझी कीव करावी? या सगळ्याचं एकच कारण आहे, मला आकाशात उडता येत नाही. उडता आलं असतं तर अशा उड्या मारायची वेळच आली नसती.” आजी हसली. 

तिने कोल्ह्याच्या पाठीवर हात ठेवला. म्हणाली, “बरं का कोल्होबा, अगदी तुझ्यासारखच माणसाला देखील वाटलं. आपल्याला उडता आलं पाहिजे. छानशी आकाशात गरुडझेप घेता आली पाहिजे. माणसांना प्रश्न पडला की, हवेपेक्षा जड असलेले पक्षी हवेत उडतातच कसे? माणसाने पक्ष्यांच्या पंखांचा अभ्यास सुरु केला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं कि पक्षी आकाशात उडतात याला कारण त्यांच्या पंखाचा विशिष्ट आकार. कसून संशोधन सुरु झालं. अनेकांनी प्रयोग केले. अनेकांचा कपाळमोक्ष झाला, परंतु माणसाने हर मानली नाही. अखेर १७ डिसेंबर १९०३ रोजी राईट बंधूनी पहिले विमान आकाशात उडवले. कीटी हॉक या गावात राईट बंधूंचे विमान आकाशात उडाले आणि सुरक्षितपणे जमिनीवर उतरले देखील. हवपेक्षा जड असलेले विमान आकाशत उडाले याचे मुख्य कारण म्हणजे विमानाच्या पंख्याचा आकार. विमानाचे पंख वरती वक्राकार असतात आणि खालच्या बाजूस सरळ असतात.

पंखाखालून वाहणाऱ्या हवेचा दाब जेव्हा पंखावरून धावणाऱ्या हवेपेक्षा जास्ती होतो,  तेव्हा विमान वर उचललं जाण्याची शक्यता निर्माण होते. विमानाच्या वजनापेक्षा हा दाब अधिक असला पाहिजे. विमानाच्या पंखाच्या वक्राकार भागाची लांबी पंखाखालील सरळ भागापेक्षा जास्त असते. त्यामुळे पंखावरील हवेला अधिक अंतर कापावं लागते. साहजिकच त्याचा वेग वाढतो. वायूंच्या गुणधर्मानुसार पंख्यावरील अधिक वेगाने धावणारी हवा, कमी दाबाचा पट्टा तयार करते. साहजिकच पंखाखालून वाहणाऱ्या हवेचा दाब अधिक असतो. हा दाब जेव्हा विमानाच्या वजनापेक्षा अधिक होतो, तेव्हा विमान वर उचललं जातं. विमानाला वर उचलणारी शक्ती जेव्हा विमानाच्या वजनाइतकी असते तेव्हा विमान हवेत स्थिर राहते. पंखांवरून जाणाऱ्या हवेचा वेग वाढवला की, विमानाला उचलणारी शक्ती वाढते आणि विमान आकाशात अधिक वर जाते.  विमानाला उचलणारे बल जेव्हा विमानाच्या वजनापेक्षा कमी होते, तेव्हा विमान खाली येते. अर्थात विमानाला उडताना हवेच्या घर्षणाला तोंड द्यावे लागते. कोल्होबा, किटी हॉक येथे साध्या ‘फ्लायर’ विमानाने सुरु झालेल्या प्रवासाने प्रगतीचे अनेक टप्पे पार केले आहेत. आता माणूस अंतराळात भराऱ्या घेतो आहे. द्राक्ष आंबट आहेत असं म्हणून हताश न होता प्रगतीशील असणं अधिक महत्त्वाचं आहे.”

(क्रमश:)

----------------------

लेखक शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनिअर असून, आजवर अनेक बालकथांचे लेखन केले आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांना विविध पुरस्कार प्राप्त आहेत. त्यांच्या या आधुनिक जंगल आजीच्या कथांना कोसामप आणि बालकुमारसाहित्य परिषदेने पुरस्कार दिले होते. या कथासंग्रहाबद्दल पु.ल. देशपांडे यांनीही लेखकाचे कौतुक केले होते. अटक मटक.कॉम'ची घोषणा होताच मोठ्या मनाने आपणहून त्यांच्या कथा साईटवर प्रकाशित करण्याची परवानगी त्यांनी दिली - त्याबद्दल त्यांचे आभार