बायो बबल - भाग २ (प्रसार)

बायो बबल - भाग २ (प्रसार)
लेखन: विद्याधीश केळकर

व्हॅक्सीन, अ‍ॅंटीबॉडी, अ‍ॅंटीजेन, इम्युनिटी वगैरे शब्द काही आता आपल्याला नवीन नाहीत. जवळपास गेलं वर्षभर आपण हे शब्द ऐकतोय, वापरतोय. काहीजणांनी त्याबद्दल अधिक खोलात माहितीही घेतली असेल, तर काही जणांनी व्हॉट्स-ॲपवरून घेतली असेल. पण, एक तोंडओळख तर नक्कीच आहे या शब्दांची. याबद्दल बर्‍याच तज्ज्ञांनी लिहिलं, व्हिडिओ केले. तेव्हा, मी काही परत तेच सांगत बसणार नाही. मी काही त्यातला जाणकारही नाही. मीही त्याबद्दल अजून जाणून घेतो आहे. नुसतं त्याचं वर्तमानच नाही तर त्याचा भूतकाळसुद्धा. गेल्या काही महिन्यात या Immunology अर्थात ’रोगप्रतिकारशास्त्रा’नी मला चांगलीच भुरळ पाडली. आणि माझी एक खोडच आहे, मला काहीही आवडलं, पटलं की मला ते सगळ्यांना सांगायचं असतं. बघा तुम्हालाही आवडतंय का ते...!

याआधीचे भाग: भाग १

 

४थे शतक, चीन.
आजचा दिवस झ्हांग साठी खूपच वेगळा होता. एका नव्या विचित्र आजाराशी आज त्याची गाठ पडली होती. आतापर्यंत त्याने पाहिलेल्या रोगांपैकी कशाशीच याची लक्षणं जुळत नव्हती. झ्हांग पुरता कोड्यात पडला होता. त्याच्या डोळ्यासमोरून 'त्या' माणसाचं चित्र हलत नव्हतं. त्याच्या शरीरभर पुरळ उठले होते, काहीतर तोंडात आणि घशात देखील. तापानी फणफणलेला त्याचा देह, झ्हांगच्या मनातून जात नव्हता. त्याने ते सारं नेहमीप्रमाणे नोंदवून ठेवलं आणि काय असेल हा आजार? काय उपाय करावा यावर? याचा विचार करत करत त्याला झोप लागली.

६वे शतक, जपान.
साकुरा दोन दिवस खूपच काळजीत होती. यामातोचा ताप काही केल्या उतरत नव्हता. तो चीनच्या त्याच्या सफरीवरून परतला तोच हा आजार घेउन. त्याच्या जहाजावरच्या अजून दोन मित्रांचीही हीच दशा होती. हाताला चटका बसण्याइतका ताप होता यामातोच्या अंगात. त्याचं अंग अंग ठणकत होतं. मधून मधून उलट्या पण होत होत्या. साकुरा गार पाण्याच्या फडक्यानी त्याचं अंग पुसून घेत होती इतक्यात तिला त्याच्या हातावर कसलासा फोड आलेला दिसला. तिनी पाहिलं तर पोटावर, पायावर, पाठीवर पण असेच वण, फोड उठले होते. साकुराला काहीच कळेना. ती गडबडून उठली आणि तडक वैद्यांकडे निघाली.

७वे शतक, भारत.
मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशात कश्यप नेहमीप्रमाणे दिवसभराच्या नोंदी लिहून ठेवत होता.
"आजचा दिवस आमच्या गावाच्या इतिहासातला सर्वात काळा दिवस आहे. आज या नव्या अनोळखी रोगानी अजून २० बळी घेतले. यावर कोणाताच उपाय सापडत नाही. रोग्याचा ताप काही केल्या उतरत नाही. अंगावरच्या व्रणांमधून पांढर्‍या रंगाचा द्रव बाहेर पडतो. काही रोग्यांच्या घशात सुद्धा फोड आले होते. चरक संहिता, सुश्रुत संहितेतही याचा उल्लेख आढळला नाही. हे प्रभो, ह्या संकटातून आमच्या या गावाला वाचवा. माझे सारे उपाय आता थकले. आजार रोज एकाचा बळी घेतोय. माझ्याही अंगातला ताप आता वाढत चाललाय. हातावरचे व्रण अधिकाधिक स्पष्ट होत आहेत. यातून काहीच मार्ग नाही का?"

८वे शतक, स्पेन.
सिल्व्हियोचे डोळे जड झाले होते. अंग तापलं होतं. डोकंही खूप दुखत होतं. मोठ्या प्रयासानी तो जागा राहिला होता. आजच्या रात्रीच्या पाहर्‍याची जबाबदारी त्याच्यावर होती. दिवसभरच्या धावपळीनी असं झालं असावं म्हणून त्यानी दुर्लक्ष केलं आणि तसाच पहारा देत राहिला.
सकाळी सिल्व्हियोचे डोळे उघडले ते वैद्यांच्या तंबूमधे. डोकं अजूनही दुखतच होतं. तापानी भगभगलेल्या डोळ्यांसमोर अंधारी येत होती. अंगाला हलकीशी खाज सुटली होती. त्याला फारच अस्वस्थ वाटू लागलं. तो उठून बसायचा प्रयत्न करू लागला. इतक्यात एक वैद्य औषध घेउन आला. त्यानी सिल्व्हियोला उठून बसायला मदत केली आणि औषध त्याच्या हातात दिलं. सिल्व्हियोनी औषध घेतलं आणि घेतल्या घेतल्या त्याला भडभडून ओकारी झाली. पोट ढवळून निघालं. परत परत उलट्या होऊ लागल्या. त्या ताणानी ग्लानी येउन सिल्व्हियो पलंगावर बेशुद्ध होऊन पडला.

---
होता होता हा आजार युरोपभर पसरला. रोगात शरीरभर उठणार्‍या लहान लहान पुरळ आणि रोग सरल्यानंतर राहणार्‍या व्रणांवरून, ’pocks'वरून याचं नामकरण Smallpox असं केलं गेलं. अरबांच्या आक्रमणातून आणि देशविदेशातील व्यापारामधून युरोपात आलेल्या या आजारानी हळूहळू भीषण स्वरूप धारण केलं. रोग झालेल्या १० मधले ३-४ लोक या रोगाला बळी पडत होते. रोगातून बचावलेल्यांना सुद्धा पुढे आयुष्यभर त्याचा त्रास होत राही. पिकून गळालेल्या फोडांचे व्रण पुढे जन्मभर अंगावर रहात, मधूनमधून प्रचंड खाज सुटे. रोगावर काहीच उपाय सापडत नव्हता. युरोपभरातले डॉक्टर, संशोधक चक्रावून गेले होते. पण त्यांचे अथक प्रयत्न चालूच होते. रोगावरील उपाय नाही पण वर्षानुवर्षांच्या नोंदींमधून रोगाची काही वैशिष्ट्यं मात्र जाणवू लागली होती. एक म्हणजे हा रोग साथीचा रोग होता. एका विशिष्ट काळातच हा रोग मोठ्या प्रमाणात होई. रोग्याच्या संपर्कात आलेल्या माणसांना सुद्धा रोगाची लागण होत होती. पण त्यातही फरक होता. रोग ओल्या किंवा सुरुवातीच्या स्थितीत असताना झालेला संसर्ग हा जीवघेणा ठरे, पण फोड पिकताना अथवा पिकल्यावर संपर्क आला तर फक्त ताप येउन पुरळ उठत असत.
पण याहुनही महत्त्वाचं वैशिष्ट्य ते असं की एकदा हा रोग होऊन गेलेल्या व्यक्तीला तो पुन्हा होत नसे. हे सर्वात चक्रावून टाकणारं होतं. कारण आत्तापर्यंतचे सर्दी, खोकला, ताप हे आजार तर माणसाला पुन्हा पुन्हा होत होते. हा मात्र एकदाच. एकदा स्मॉलपॉक्स होऊन गेलेल्या व्यक्तीला पुढच्या साथीत काहीच होत नसे. हे कसं काय बुवा? कशामुळे या व्यक्ती पुढच्या साथीतून सुखरूप बाहेर पडत असतील? की ही देवाची परिक्षा आहे आणि त्यातून हे तावून सुलाखून आले आहेत? त्यांना काही नवीन शक्ती प्राप्त होते का? हा रोग कधीच न झालेल्या इतर लोकांना ही शक्ती कशी मिळवता येईल? असे अनेक प्रश्न लोकांना पडले होते.

आणि अशातच युरोपात स्मॉलपॉक्स विरोधातली एक नवी उपचार पद्धती येउन थडकली. या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारी. आणि तरीही काही नवे प्रश्न निर्माण करणारी. ती पद्धती म्हणजेच Variolation!

 

(क्रमश:)
चित्र: आंतरजालावरून साभार (चित्रस्रोत) सदर चित्र या आजाराचा चिनी देव T'ou Shen Niang Niang याचे आहे.


अटक मटकच्या मॉनिटरकडून:
ही एक नवीन लेखमालिका सुरू केली आहे. एकुणच लसीचा शोध आणि त्याचा इतिहास समजून घेणं अत्यंत रंजक आहेच तितकंच माणसाच्या चिकाटीबद्दल कौतुक वाटायला लावणारंही आहे. तेव्हा तय्यार रहा. दर बुधवारी या मालिकेतील पुढील भाग प्रकाशित होणार आहे. तुम्हाला जर याबद्दल काही प्रश्न असतील तर monitor.atakmatak@gmail.com या इमेल पत्त्यावर किंवा फेसबुक कमेंटमध्ये जरूर विचारा. आम्ही ते लेखकापर्यंत पोचवू. त्याचं उत्तर पुढील भागांत असेल किंवा आम्ही ते पुढील भागात देण्याची विनंती करू