आमच्या वस्तुंची गोष्ट-१: लोटोतले यु यु

 लोटोतले यु यु

लेखनः विकास (इयत्ता १ली)आयुष (इयत्ता- ३री)
चित्र: स्वरदा केदार करंबेळकर, इयत्ता ७वी, अक्षरनंदन

 

आम्ही दुसऱ्या ग्रहातून आलोय. माझं नाव यु यु कारोटे मोहरोचे. माझ्या बाबांचे नाव कारोटे बाबा. माझ्या आईचे नाव कारोटेया. मला ते जग आवडलं नाही म्हणून आम्ही तिथून ह्या ग्रहावर उडी मारली. 

आम्ही जेव्हा उडी मारली तेव्हा ढगांतून डायरेक्ट इथे पडलो. आधी आम्ही सफेद होतो. आम्ही जेव्हा उडी मारली तेव्हा आम्ही जमिनीवर एका दगडावर येऊन पडलो. तो दगड काळा होता. म्हणून मी पण काळा पडायला लागलो. मला वाटलं की आम्ही आता पुर्ण काळे पडणार, तेवढ्यात खूप जोराने पाऊस पडायला लागला. आम्ही खूप जोराने हलायला लागलो. आणि आम्ही उलटे झालो. !

अरेरे! देवा! मी डोक्यापासून काळे पडत चाललो आहे. आम्ही आमच्या ग्रहावर सफेद होतो आणि या ग्रहावर आम्ही काळे पडत चाललो आहे. आम्हाला आमचा ग्रह आवडतो. आम्ही इथे येऊन चूक केली. आपण वर गेलं पाहिजे. 

थांब आपल्या मित्राला आपला मेसेज करु. मिलाला. तो उद्या आम्हाला घ्यायला येईल. मग आम्ही आमच्या ग्रहावर निघून जाऊ आणि सर्वांची माफी मागू. पुन्हा कधी आम्ही ह्या ग्रहावर येणार नाहीऽऽऽऽऽऽऽऽऽ.

--------------------


ही कथा लिहिण्यामागची प्रक्रिया समजून घेण्यासाठी ही प्रस्तावना वाचता येईल.
ही कथा ज्या वस्तूवर रचली आहे तो दगड:

श्रेय अव्हेर:
सोनाळ्यातल्या मुलांसोबत काम करून त्यांच्याच भवतालातील वस्तुंशी संबंधित रचलेल्या या कथा आहेत. या आदिवासी भागातील मुलांच्या शिक्षणासाठी 'क्वेस्ट' संस्था गेले १२ वर्ष कार्यरत आहे. त्यासोबत मुलांच्या भाषिक विकासासाठी 'गीतांजली कुलकर्णी' यांनी 'गोष्टरंग' नावाचा प्रकल्प सुरू केला. या गोष्टरंगचाच भाग असलेल्या 'बालरंग' या उपक्रमाअंतर्गत 'कल्पेश समेळ'ने हा उपक्रम घेतला होता. 'अटकमटक'लाही त्यानेच या गोष्टी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याबद्दल त्याचे आभार.
पुण्यातील 'उदय क्षीरसागर' यांनी या गोष्टींचे युनिकोडमध्ये टंकन करून दिल्याबद्दल त्यांचेही आभार