आमच्या वस्तुंची गोष्ट : प्रस्तावना

प्रस्तावना: वस्तूंच्या गोष्टी कशा बरं आल्या?
लेखनः कल्पेश समेळ/प्रतीक्षा खासनीस (Tiny tales)

 

"दादा, मी रात्री झोपेत पण गोष्टच बोलत होती, मला झोपेत गोष्टच दिसत होती."
"दादा, मला सुचलंय अर्ध वाक्य! मी विकासला देतो, अर्ध मी बोलतो चालेल?"
"मी डुग्गा साठी costum करून आणलाय!"
"दादा, मी गोष्ट नाचत नाचत सांगते."

दिव्या, विद्या, शर्वरी, विकास, आयुष, विरु, साधना यांनी दुसऱ्या दिवशी प्रश्नांचा भडिमारच सुरू केला.
जोपर्यंत ती गोष्ट हातात येत नाही तोपर्यंत एखाद्या गोष्टीमागे झपाटून लागणं, हे लहान मुलंच करू शकतात.

सोनाळ्यात नाटक बसवण्यासाठी गेलो होतो. सुरवातीला मुलांशी खूप गप्पा मारल्या. जवळजवळ वर्षभराने गेलो होतो त्यांच्याकडे.  मग त्यांच्याशी नाटकविषयी गप्पा मारल्या. मुलं भरभरून बोलली. गेले ३ वर्ष त्यांच्यासमोर नाटकं बसवली जातात, ती मुलं सुद्धा अनेक नाटकात कामं करतात. त्यामुळे मुलांनी खुप वेळ चर्चा केली. मग त्यानंतर त्यांना काही गोष्टी मी सादर करून दाखवल्या.

छोटा राजकुमार ही गोष्ट सादर केल्यावर त्यांना खूप प्रश्न पडले. 'ही गोष्ट खरंच आहे का? ह्यातला राजकुमार कुठून आला?' किंवा गोष्टीतल्या काही वाक्यांवर होकार भरला. उदा 'मोठी माणसं अशीच असतात त्यांना सगळं समजावून सांगायला लागत किंवा मोठ्या माणसांना आकडे खूप आवडतात' इ. एखाद्या गोष्टीतला नेमका अर्थ या लहान मुलांना न सांगताच कळत होता.

मग गोष्ट झाल्यावर त्यांच्यासोबत चित्रातून गोष्ट तयार केली, मला त्यांना गोष्टींच्या लिखाणापर्यंत घेऊन जायचं होतं.
त्यांना म्हटलं 'जसं तुम्ही चित्रातून गोष्ट तयार केली तसंच मोठा विषय घेऊन लिहीण्यापेक्षा आपण अजून वेगवेगळ्या पद्धतीने, आपल्या आजूबाजूच्या वस्तुंमधून गोष्ट तयार करू शकतो'.
त्यांनी बाहेरून त्यांना आवडतील अशा वस्तू आणल्या. मग या वस्तूच निरीक्षण सुरू झालं. मी त्या वस्तूंना प्रश्न विचारायला सांगितले, प्रश्न निवडून उत्तरं लिहीताना विकास ओरडला 'अरे दादा गोष्ट झाली की ही, अजून सुचतंय लिहू का?'
'लिहा बिनधास्त' आम्ही ओरडलोच, मग मुलांनी गोष्ट लिहिली.

विकास आणि आयुषने काळ्या-पांढऱ्या खडकाच्या तुकड्यावर गोष्ट लिहिली. तो तुकडा लुटो नावाच्या ग्रहावर होता तेव्हा तो कसा होता आणि त्याचं काय झालं? याची गोष्ट! 'विद्या'ने लिलीच्या फुलाच्या शाळेची गोष्ट लिहिली. त्या शाळेत फुलं शिकाय-शिकवायला होती. त्या गोष्टीतले बारकावे बेफाम आहेत. विरु आणि दिव्याने डुग्गा ग्रहावरच्या दगडाची गोष्ट लिहिली. तर शर्वरी आणि साधनाने चिनू नावाची गोष्ट लिहिली. ज्यात फुल एका अपघातात वाचतं 

हे मुलांचं लिखाण जितकं साधं सोपं असत तितकंच ते जगाकडे, मोठ्या माणसांकडे विसंगतीने पाहणार असतं, छोट्याशा गोष्टीतून 'का?' असा प्रश्न विचारणारं असतं.

ह्या गोष्टी मुलांनी लिहिल्या, पूर्ण दिवस मुलं त्यावर काम करत होती, न कंटाळता.
दुसऱ्या दिवशी त्यांना मी १० वाजता सकाळी यायला सांगितल पण मुलं ८ वाजताच येऊन बसली. मग गोष्ट बसवायला मी मदत केली,गोष्ट बसली.  ३० एक प्रेक्षक गोष्ट बघायला आले आणि त्यांनी केलेल्या इतक्या मेहनतीने गोष्ट सगळ्यांना खूप आवडली.

मुलं गोष्ट संपल्यावर आम्ही कशी गोष्ट लिहिली हे सांगायला लागली. त्यांनी ज्या object वर गोष्ट लिहिली तो object मोठ्या माणसांना नीट बघायला सांगितला. मुलांबरोबर काम करताना आपण फक्त अनुकूल वातावरण तयार करून दिलं की ते आपोआप शिकत जातात, हे तत्त्व सतत जाणवतं. अश्या रीतीने ३ दिवस मुलांसोबत काम करून सोनाळ्यातुन निघालो, खूप सारा अनुभव घेऊन.
मुलांकडून मोठ्यांनी खरंच शिकलं पाहिजे.

उद्यापासून नियमीत अंतराने अटक मटक वर या गोष्टी प्रकाशित करणार आहोत. (गोष्ट प्रकाशित झाली की त्याची लिंक इथेही अपडेट होईल)
मुलांनी लिहिलेल्या गोष्टी-
लोटोतले 'यु' 'यु'
●डग्गा प्लेनेटवरचा दगड
●फुलवाडी
●चिनू

सोनाळ्यातील मुलांनी ज्या वस्तूंवरून या गोष्टी लिहिल्या त्यांचेही फोटो तुम्हाला दिसतील आणि या गोष्टी वाचून काही लहान मुलांनी चित्रेही काढली आहेत तिही सोबत देणार आहोत.
अर्थातच या गोष्टींच्या सादरीकरणाचे व्हिडीओ आमच्यापाशी नाहीत. मात्र ह्या गोष्टी बघायच्या असतील तर नक्की सोनाळ्यात जा. मुलं वाट बघतायत त्यांची गोष्ट सांगायला.