जंगल आजी ५: सिंहाची फजिती

सिंहाची फजिती
लेखन: डि व्हि कुलकर्णी
चित्रे: प्राची केळकर भिडे

याआधीच्या गोष्टी: ससोबा का आयतोबा आजीच्या जवळी घड्याळ कसले. | करकोच्याचा पाहुणचार | कोल्ह्याला द्राक्षं आंबट


माकडाने गळ्यात ढोल अडकवला आणि दवंडी पिटायला सुरुवात केली. `ढूम ढूम ढुमाक! ऐका हो ऐका!! समस्त जंगलवासीयांनो ऐका! ढूम ढूम ढुमाक! आपले जंगलचे बादशहा सिंहराज गिरकर यांनी नवीन आदेश काढला असून, या आदेशानुसार जंगलात राहणाऱ्या प्रत्येक प्राण्याला आपल्या शिकारीतला पाव हिस्सा सिंह राजांना द्यावा लागेल. जो कोणी आज्ञेचं पालन करणार नाही, त्याला जंगल कायद्यानुसार शिक्षा ठोठावली जाईल हो!’

दवंडी ऐकल्या नंतर जंगलात संतापाची लाट आली. जो तो म्हणू लागला, "हे काय, आम्ही मेहनत करायची आणि याने आयताच त्यावर डल्ला मारायचा याला काय अर्थ आहे. छे छे या सिंहाची जुलमी राजवट आता नको. याला पाठवून द्या आफ्रिकेच्या जंगलात जिथून आला तिथे. सतत अरेरावी आणि धाक. आम्हाला आयतोबा नकोत. हा म्हातारा झाला म्हणून काय झालं. आम्ही देखील म्हातारे होतो, तेव्हा आम्हाला कोण देतं पेन्शन? ते काही नाही. या सिंहाची राजवट उलथून टाकायलाच पाहिजे."
परंतु सिंहाची राजवट उलथून टाकायची कशी? तो आपल्याला नको हे ठीक. परंतु, त्याने एक डरकाळी फोडली की, सगळ्यांचे पाय लटपटतात. याच्यावर काहीतरी मार्ग काढला पाहिजे. प्राण्यांनी आपला मोर्चा हत्तीकडे वळवला.
"हत्तीदादा तू शक्तिमान आहेस. तुझे पाय मजबूत आहेत. तुझ्या सोंडेत ताकद आहे. तू सहज सिंहाला फेकून देशील."
आपली मान हलवीत हत्ती म्हणाला, "खरंय तुमचं म्हणणं, परतू माझ्या स्थूल शरीराचं काय करायचं? सिंहाने मागून हल्ला केला तर मी काय करणार?"
हरीण घाबरत घाबरत हळूच म्हणालं, "मला वाटत, आजीचा सल्ला घ्यावा.आपल्या सुदैवाने ती जंगलातच आहे."
हरिणाची सूचना सगळ्यांनी उचलून धरली.

आजीने सगळं ऐकून घेतलं. विचार केला. एक निश्चित योजना आखली. कोल्हा त्यानुसार सिंहाकडे गेला.
"नमस्कार महाराज. अलीकडे आपला घसा बसला आहे का?"
सिंहाने मोठी डरकाळी फोडली आणि म्हणाला, "मूर्ख कोल्हया, तुला माझा घसा बसलेला वाटतो?"
"नाही महाराज!! पण तो दुसरा सिंह आहे नं, त्याची डरकाळी जरा जास्तच मोठी आहे. त्याच्या तुलनेत तुम्ही त्या खोकल्याच्या औषधाच्या जाहिरातीतल्या सिंहासारखे आहात."
एव्हाना सिंह रागाने लाल झाला, "दुसरा सिंह? कुठाय तो दुसरा सिंह?"
"तो त्या विहिरीत आहे..तशाच पाण्यात आहे बघा"
सिंह रागातच विहिरीजवळ गेला. त्याने विहिरीत डोकावून पाहिलं. पाण्यात त्याला दुसरा सिंह दिसला. हुबेहूब त्याच्यासारखा. सिंहाने वाकुल्या दाखवल्या तर त्या सिंहानेदेखील तशाच वाकुल्या दाखवल्या. सिंह आता भडकला. त्याने डरकाळी फोडली तशी त्या सिंहाने सुद्धा डरकाळीनेच प्रत्युत्तर दिले.

आता सिंह चांगलाच भडकला. या जंगलचा मी राजा आणि मला उलट धमकावतोस. सिंहाने रागातच झेप घेतली, ती त्या विहिरीत. तिथे त्याचे डोके दगडावर आपटले आणि चांगलाच कपाळमोक्ष झाला.

प्राणी खूश झाले. जंगलात आनंदी आनंद झाला.
सर्वांना प्रश्न पडला, "मुळात हि दुसरी डरकाळी आलीच कशी?"

आजीने सर्वांच्या शंकांचं समाधान केलं, "तो प्रतिध्वनी होता. आपण जेव्हा खोल विहिरीत किंवा पर्वतांच्या रांगा मध्ये मोठ्याने ओरडलो तर आपलाच आवाज आपल्याला पुन्हा ऐकू येतो. यालाच प्रतिध्वनी म्हणतात. ध्वनी या लहरी स्वरूपात असतात. ध्वनीचा प्रवास एका स्थानापासून दुसऱ्या स्थानापर्यंत तरंगाद्वारे असतो. त्यासाठी माध्यमाची गरज असते. ध्वनी लहरींचा हवेतील वेग दर सेकंदास सुमारे ३४३ मीटर इतका असतो. ध्वनी लहरींच्या मार्गात जेव्हा एखादा अडथळा येतो, तेव्हा ध्वनिलहरी परावर्तित होतात. हा परावर्तित आवाज आपल्याला प्रतिध्वनी म्हणून ऐकू येतो. आवाजाच्या लहरींचा परिणाम आपल्या कानावर सुमारे एक दशांश सेकंद इतका टिकतो. म्हणजे समजा एखादा ध्वनी आपल्या कानावर पडल्यानंतर एक दशांश सेकंदाच्या आत दुसरा ध्वनी कानावर पडला तर तो दुसरा ध्वनी आपणास समजत नाही.आता ध्वनीचा वेग दर सेकंदास ३४३ मीटर इतका आहे. म्हणजे एक दशांश सेकंदास ध्वनी ३४.3 मीटर अंतर पार करतात. थोडक्यात प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी १७.2 मीटर्स दूर अडथळा असला पाहिजे.सभागृह बांधताना या गोष्टींचा खूप विचार करावा लागतो.कारण नाहीतर वक्त्याचे भाषण आपणास ऐकू येणार नाही. तेव्हा कोल्होबा, सिंहाचा कपाळमोक्ष जसा अज्ञानामुळे झाला, तसा कोणाचाही होऊ नये. काय?"

(क्रमश:)

----------------------

लेखक शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनिअर असून, आजवर अनेक बालकथांचे लेखन केले आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांना विविध पुरस्कार प्राप्त आहेत. त्यांच्या या आधुनिक जंगल आजीच्या कथांना कोसामप आणि बालकुमारसाहित्य परिषदेने पुरस्कार दिले होते. या कथासंग्रहाबद्दल पु.ल. देशपांडे यांनीही लेखकाचे कौतुक केले होते. अटक मटक.कॉम'ची घोषणा होताच मोठ्या मनाने आपणहून त्यांच्या कथा साईटवर प्रकाशित करण्याची परवानगी त्यांनी दिली - त्याबद्दल त्यांचे आभार