जंगल आजी ६: वाघोबा वाघोबा कुठे रे गेलास!

वाघोबा वाघोबा कुठे रे गेलास
लेखनडि व्ही कुलकर्णी
चित्रेप्राची केळकर भिडे

याआधी: ससोबा का आयतोबा आजीच्या जवळी घड्याळ कसले. | करकोच्याचा पाहुणचार | कोल्ह्याला द्राक्षं आंबट | सिंहाची फजिती

आपल्या लेकीकडे निघालेल्या आजीचा जंगल प्रवास संपला. खरं म्हणजे जंगलात तिने अजून मुक्काम करावा अशीच प्राण्यांची इच्छा होती, परंतु आजीचा एकच धोशा होता, “लेकीकडे जाईन, तूप रोटी खाईन, जरा धष्टपुष्ट होईन!”
आजीचं म्हणणं अखेर सगळ्यांनी मान्य केलं आणि आजीला निरोप द्यायचं ठरलं.
आजी निघाली. सगळे प्राणी जंगलाच्या वेशीवर जमले.
अचानक वाघाची डरकाळी ऐकू आली. जोरजोरात गुरगुरत तो आजी समोर उभा राहिला.
“आजी, मी तुला खाणार.”
सगळे प्राणी वैतागले. सिंहाची जुलूम जबरदस्ती चालू होती, तेव्हा हा गपचूप बसला होता.
आजीने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, “वाघोबा, तू मला अवश्य खा, परंतु आज नको.”
“मग कधी?”
“लेकीकडे जाईन, तूप रोटी खाईन, धष्टपुष्ट होईन आणि मगच तू मला खा. आता खाशील तर हाडं तेवढी चघळायला मिळतील. माझ्या शरीरावर मांस नाहीच आहे.”
वाघोबा गुरगुरायचा थांबेना तसा हत्ती भडकला. त्याने हवेत सोंड फिरवली आणि म्हणाला, “काय रे ए वाघ्या, आजीने एकदा सांगितले नं तुला, की लेकीकडून आल्यावर खा म्हणून मग आता काय आहे तुझं?”
वाघोबा नरमला. त्याच्या लक्षात आलं की, आता आपण ताणून धरलं तर हत्ती उचलून फेकून देईल.
“मी कुठे नाही म्हणतो, तेच तर म्हणतोय.”, असा सावध पवित्रा वाघाने घेतला.

सगळ्यांचा निरोप घेऊन आजी निघाली. शहरात लेकीच्या घरी गेली. खूप दिवस राहिल्यानंतर एके दिवशी लेकीला म्हणाली, “कोणास ठाऊक किती काळ गेला ते. आता निघते. माझ्या घरी जाते. भोपळ्यात बसते आणि चल रे भोपळ्या टुणुक टुणुक म्हणत वाघाच्या हातावर तुरी देते.”
लेक म्हणाली, “आई, भोपळा कशाला हवा? छोटी गाडीच देते दिमतीला.”


आजी छोट्या गाडीत बसली. आजीचा जावई गाडी चालवीत होता. आजी टुकू टुकू बाहेर पाहत होती, परंतु तिच्या ओळखीचं जंगल काही तिला दिसेना .

कुठं बरं गेलं जंगल?
दिसतंय सारच अमंगल .
कुठे आहेत ते पशू पक्षी
अन पानांची हिरवीगार नक्षी

अखेर न राहवून तिने विचारलं. तसे जावई म्हणाले, “माणसाने प्रगती केली खरी .परंतु त्याच बरोबर बेसुमार जंगलतोड देखील झाली.”
आजी हे ऐकता क्षणी हिरमुसली झाली.

झाडी तोडून कसं चालेल? झाडांचं जीवन माणसाला पूरक आहे. झाडं आपल्याला अन्न देतात. आपल्या भवतालची हवा शुद्ध करतात. दिवसा झाडे हवेतला कार्बन-डाय-ऑक्साईड शोषून घेतात आणि माणसासकट बहुतेक सगळ्या जीवांना आवश्यक असलेला प्राणवायू हवेत सोडतात. कार्बन-डाय-ऑक्साईड, पाणी, पेशीतील हिरवा रंग आणि सूर्यप्रकाश याच्या मदतीने झाडे अन्न तयार करतात. पर्णछिद्रांवाटे झाडे श्वास घेतात अथवा सोडतात. निसर्गाच्या चक्रात झाडांचे असलेले योगदान लक्षात घेता झाडांची अशी बेसुमार तोड पर्यावरणाच्या दृष्टीने अयोग्य आहे.

आजी अस्वस्थपणे बाहेर पाहत राहिली .तिला जंगल दिसेना की तिथलं वन्य जीवन दिसेना. बरं ज्या वाघाच्या हातावर तुरी द्यायची तो वाघ तरी कुठे आहे?

शेवटी जावई म्हणाले, “आजी तुमचा तो वाघोबा आता राहतोय प्राणी संग्रहालयात.”
आजी कासावीस झाली. गाडी प्राणी संग्रहालयात घ्या असा आग्रह धरू लागली. अखेर गाडी तिथे वळवली. तो वाघोबा देखील आता म्हातारा झाला होता. 

आजीला पाहताच तो धावत आला म्हणाला,
“आजीबाई आजीबाई कुठे गं गेलीस?
बघता बघता गायब झालीस
हाकेला ओ माझ्या देशील का?
आम्हाला जीवनदान देशील का?”

वाघ करुण नजरेने आजीकडे पाहत होता. आजीला जाणवलं, जंगलच गेलं तर आपले हे मित्र राहणार तरी कुठे? त्याचं अस्तित्वाच नाहीसं होईल.

आजीच्या डोळ्यात पाणी आलं. ती आता सगळ्यांना एकच सांगते, “बाबांनो जसं माणसांवर प्रेम करता तसं निसर्गावर प्रेम करा”

(कथामालिका समाप्त)

----------------------

लेखक शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनिअर असून, आजवर अनेक बालकथांचे लेखन केले आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांना विविध पुरस्कार प्राप्त आहेत. त्यांच्या या आधुनिक जंगल आजीच्या कथांना कोसामप आणि बालकुमारसाहित्य परिषदेने पुरस्कार दिले होते. या कथासंग्रहाबद्दल पु.ल. देशपांडे यांनीही लेखकाचे कौतुक केले होते. अटक मटक.कॉम'ची घोषणा होताच मोठ्या मनाने आपणहून त्यांच्या कथा साईटवर प्रकाशित करण्याची परवानगी त्यांनी दिली - त्याबद्दल त्यांचे आभार