लेखांक - २: उघडा डोळे, बघा नीट!

लेखांक २: उघडा डोळे बघा नीट!

लेखन: आल्हाद महाबळ

याआधी: लेखांक १

 

मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही विकीपेडीया एव्हाना पालथा घातला असेल ह्याची मला खात्री आहेच. पण डोळ्यांचा फोटोग्राफीशी नक्की काय संबंध? त्यासाठी आपल्याला डोळा कसं काम करतो हे ‘बघावं’ लागेल.

माणसाचा किंवा तसं बघायला गेलं तर इतर कोणत्याही प्राण्याचाही डोळा एकच काम करतो. येणारा प्रकाश एकत्र करून त्याचं प्रतिबिंब डोळ्याच्या आतल्या भागावर पाडायचं (खालील आकृतीत पडदा/पटल). आपल्या डोळ्यांत डिजीटल कॅमेऱ्यासारखेच सेंसर्स असतात. एक नव्हे, दोन-दोन. एक सेंसर (संवेदी) फक्त उजेडाची तीव्रता मोजतो आणि दुसरा रंग. मग उजेडाच्या तीव्रतेबद्दलची आणि रंगांबद्दलची सेंसर्सनी मिळवलेली ही सगळी माहिती ऑप्टीक नर्व्हद्वारे (दृष्टीचेता/दृष्टीमज्जातंतूद्वारे) मेंदूला पुरवली जाते; म्हणजेच एका प्रकारे लिहिली जाते. तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने दिसू लागतं.

म्हणजे एकूण काय, तर दादाला त्याचे मोठे-मोठे कॅमेरे आणि लांब लांब लेंसेस यांबद्दल कितीही गमजा मारू देत. तुमच्याकडेही 'जगात-भारी' असलेले - एक नाही, तर दोन-दोन कॅमेरे आहेत. उजवा डोळा आणि डावा डोळा. कितीही ऊन असो किंंवा रात्रीचा अंधार असो, सतत सेटींग्ज चेंज करत न बसता दिसतं म्हणजे दिसतंच. तर फोटो कसे काढायचे हे शिकण्याआधी आपण प्रकाश बघायला शिकूया का? कारण प्रकाश नसेल तर प्रकाशाने लिहिणार कसं?

प्रकाश बघायचा म्हणजे काय करायचं? सोपंय. तुम्ही कुठे बसला आहात? हॉलमध्ये? खिडकीतून बाहेर बघा. बाहेर ऊन पडलंय. मग हळूहळू नजर फिरवत ती समोरच्या भिंतीवर आणा. भिंतीवर तितकासा उजेड नाही. पण सगळ्या भिंतीवर पडलेला उजेड एकसारखाही नाही. खिडकीजवळ जास्त प्रकाश आहे आणि खिडकीपासून दूर बघत जाऊ तशी भिंत अंधारी होत जाते. हो ना? ग्रेट! प्रकाशाबद्दल जाणून घेण्यातली सगळ्यांत मोठी मजा तुम्हांला माहिती आहे. पण मजा अशी, की तुम्हांला काय माहिती आहे तेच तुम्हांला कळलेलं नाहीये!

प्रकाश बघायचा असेल, जाणून घ्यायचा असेल, तर चक्क सावली बघा. प्रकाश कसा आहे ते सावली सांगते. नाही बसत विश्वास? पण खरंच! डोक्याला थोडा ताण द्या… कसं मी सांगीनच पुढच्या लेखात. तोवर उघडा डोळे आणि बघा नीट!

टाटा…

 

प्रताधिकारात श्रेयअव्हेर: डोळ्यांच्या आकृतीच्या चित्रकार: सौ. स्वाती वर्तक. हे डोळ्यांचे चित्र तसेच पहिले छायाचित्र आंतरजालावरून घेतले आहे. जालावर मुक्तपणे उपलब्ध असल्याने आणि प्रताधिकार स्प्ष्ट केला नसल्याने, क्रियेटीव्ह कॉमन्स या प्रताधिकारात हे चित्र गृहित धरले आहे.