बायो बबल - भाग ३ (आशेचा किरण!)

बायो बबल - भाग ३  (आशेचा किरण!)
लेखन: विद्याधीश केळकर

 

व्हॅक्सीन, अ‍ॅंटीबॉडी, अ‍ॅंटीजेन, इम्युनिटी वगैरे शब्द काही आता आपल्याला नवीन नाहीत. जवळपास गेलं वर्षभर आपण हे शब्द ऐकतोय, वापरतोय. काहीजणांनी त्याबद्दल अधिक खोलात माहितीही घेतली असेल, तर काही जणांनी व्हॉट्स-ॲपवरून घेतली असेल. पण, एक तोंडओळख तर नक्कीच आहे या शब्दांची. याबद्दल बर्‍याच तज्ज्ञांनी लिहिलं, व्हिडिओ केले. तेव्हा, मी काही परत तेच सांगत बसणार नाही. मी काही त्यातला जाणकारही नाही. मीही त्याबद्दल अजून जाणून घेतो आहे. नुसतं त्याचं वर्तमानच नाही तर त्याचा भूतकाळसुद्धा. गेल्या काही महिन्यात या Immunology अर्थात ’रोगप्रतिकारशास्त्रा’नी मला चांगलीच भुरळ पाडली. आणि माझी एक खोडच आहे, मला काहीही आवडलं, पटलं की मला ते सगळ्यांना सांगायचं असतं. बघा तुम्हालाही आवडतंय का ते...!

याआधीचे भाग: भाग १ | भाग २

...आणि अशातच युरोपात स्मॉलपॉक्स विरोधातली एक नवी उपचार पद्धती येऊन थडकली. या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारी. आणि तरीही काही नवे प्रश्न निर्माण करणारी. ती पद्धती म्हणजेच Variolation!

Variolation (व्हॅरिओलेशन)!
काय होती ही उपचार पद्धत? तिची सुरुवात कुठे आणि कशी झाली? त्यामुळे स्मॉलपॉक्सच्या भयाणतेला आणि मृत्युदराला कितपत आळा बसला? सांगतो. सांगतो.
Variolationची सुरुवात ही नक्की कुठे आणि कधी झाली हे सांगता येणं अवघड आहे. पण जुन्या हस्तलिखितांत आणि इतर नोंदीत त्याचे बरेच संदर्भ सापडतात. १८व्या शतकातील काही इंग्लिश बखरकारांच्या मते भारतात ही पद्धत कित्येक शतकं रूढ होती. तर काहींच्या मते Variolationची सुरुवात सुदान प्रांतात झाली असावी, जी पुढे संपूर्ण अफ्रिकेत पसरली. या संदर्भातली पहिली लिखित नोंद सापडली ती चीनमधली, साधारण १५व्या शतकातली. त्यावरून कदाचित या पद्धतीचा उगम चीनमध्ये झाला असल्याची शक्यताही नाकारता येत नाही. पण ही पद्धत युरोप आणि इंग्लंडमध्ये येण्यासाठी १८वं शतक उजाडावं लागलं. किंवा असं म्हणू, की युरोपभरात ती मान्यताप्राप्त होण्यासाठी १८वं शतक उजाडलं. त्यापूर्वी युरोपात या पद्धतीला मज्जाव होता, किंवा त्यांचा यावर विश्वास नव्हता. त्याच्याही काही कहाण्या आहेतच. पण त्या सध्या बाजूला ठेवू आणि ही पद्धत नेमकी काय होती हे पाहू.

स्मॉलपॉक्स (किंवा देवी) झालेल्या रुग्णांच्या संपर्कात येणार्‍या लोकांनाही हा आजार होतो हे आपण पाहिलंच आणि आजाराच्या स्तरानुसार त्याच्या संसर्गात पडणारा फरक देखील पाहिला. याच निरिक्षणांचा एक जबरदस्त उपयोग काही चाणाक्ष व्यक्तींच्या लक्षात आला आणि त्यातूनच Variolationची निर्मिती झाली. काय केलं जायचं यात?
सर्वप्रथम काही सौम्य लक्षणं असणारे किंवा आजाराच्या शेवटच्या टप्प्यात असणारे रोगी निवडले जात. त्यांचे सुकलेले फोड किंवा त्याच्या खपल्या काळजीपूर्वक काढून घेतल्या जात असत. खपल्या ओल्या असतील तर त्या वापरल्या जात नसत कारण त्यामुळे होणारा रोग जीवघेणा ठरे. या खपल्यांना Scab (स्कॅब) म्हणतात. असे तीन-चार स्कॅब घेउन त्यांचं बारीक चूर्ण तयार केलं जाई. ह्या चूर्णात (स्कॅब पावडर) किंचितशी कस्तुरी मिसळली जाई आणि हे मिश्रण कापासाच्या बोळ्यात बांधलं जाई. मग वैद्य हा गोळा एका लांबलचक नळी मध्ये भरत. त्या नळीचं एक टोक इच्छुक व्यक्तीच्या नाकपुडीत घालुन वैद्य दुसर्‍या बाजूने फुंकर मारीत असे जेणेकरून ते चूर्ण असलेला कापूस व्यक्तीच्या नाकात जाई आणि त्यासोबत ते चूर्णसुद्धा. या व्यक्तीला मग पुढील २ आठवड्यांसाठी सर्वांपासून वेगळं ठेवलं जाई. याकाळात त्या व्यक्तीला हलकासा ताप येउन अंगावर काही पुरळ येत. पण फार जीवावरचं दुखणं शक्यतो होत नसे. दोन आठवड्यांनी ती व्यक्ती पूर्णपणे निरोगी आणि स्मॉलपॉक्सला ’immune’ होऊनच बाहेर येई.

चीनमध्ये तर ही पद्धत म्हणजे एक प्रकारचं कर्मकांडच (Ritual) बनली होती. त्यामध्ये अनेक नियम-अटी-रुढी आणि विधी होते. उपचारादरम्यान वापरली जाणारी नळी (ब्लो-पाईप) ही चांदीचीच असे. स्कॅब पावडर मुलाच्या उजव्या, तर मुलीच्या डाव्याच नाकपुडीत सोडली जाई आणि बरंच काही. या उपचारांनी देवीचा मृत्युदर जो ३०% वगैरे होता तो उतरून जवळपास २-३%वर आला. चीन, भारत, अरबस्तानात यामुळे देवी आटोक्यात रहायला खूपच मदत झाली.
याच्या अजूनही काही पद्धती होत्या. प्रत्येक प्रांतात, देशात हिचा वेगवेगळ्या प्रकारे अवलंब केला जाई. जसं आफ्रिका आणि इस्तंबूलमध्ये इच्छुक व्यक्तीच्या हातावर अथवा दंडावर हलकीशी जखम करून, त्यात ही स्कॅब पावडर भरली जाई. यामध्ये तर पुरळ व फोड फक्त हातापुरते मर्यादित रहात असत आणि हलकासा ताप येत असे. काही ठिकाणी या स्कॅब पावडरऐवजी फोडांमधील पस वापरला जाई. पण तो अतिशय सौम्य अशा द्रावणाच्या स्थितीत असे, जेणेकरून त्याची रोगकारकशक्ती (potency) कमी होईल. आपली लहानग्या एडवर्डची कथा आठवा!

"डॉक्टरांनी सुरी उचलली, तसे एडवर्डनी डोळे घट्ट मिटून घेतले. डॉक्टरांनी त्याच्या दंडाला एक छोटासा छेद दिला. हलकेच बाटलीतला थोडासा द्रव काडीवर घेउन त्या जखमेत भरला आणि जखम बांधून टाकली"

त्यामधल्या डॉक्टरांनी नेमकं हेच केलं. एडवर्डला 'व्हॅरिओलेट’ केलं आणि त्यामुळेच पुढच्या देवीच्या साथींमधून लहानगा एड सुखरूप राहिला आणि कदाचित याच उपकारांची (?) फेड करण्यासाठी म्हणून की काय, या रोगाला पूर्णपणे आळा घालण्यासाठी पेटून कामाला लागला. या रोगावर लस (Vaccine) तयार करण्यासाठी झटला. व्हॅक्सिनेशनचा जनक ठरला. अर्थात, सारं श्रेय त्याला एकट्यालाच देऊन चालणार नाही.

कारण, सतत गाईंच्या आसपास असणार्‍या गवळी आणि गवळणींना स्मॉलपॉक्स होत नाही. उलट गाईंमुळे त्यांना Cowpoxची (अर्थात गाईंचा देवी रोग) लागण होते हे दाखवणारा आणि याचाच उपयोग स्मॉलपॉक्स विरोधात उपाय करता येईल हे सुचवणारा कोणी वेगळाच होता! त्याची कहाणी? थोडा धीर धरा!

(क्रमश:)
चित्र: आंतरजालावरून साभार (चित्रस्रोत) सदर चित्र व्हेरिओलेशनच्या चीनमधील पद्धतीचे आहे. 


अटक मटकच्या मॉनिटरकडून:
ही एक नवीन लेखमालिका आहे. एकुणच लसीचा शोध आणि त्याचा इतिहास समजून घेणं अत्यंत रंजक आहेच तितकंच माणसाच्या चिकाटीबद्दल कौतुक वाटायला लावणारंही आहे. दर बुधवारी या मालिकेतील पुढील भाग प्रकाशित होणार आहे. तुम्हाला जर याबद्दल काही प्रश्न असतील तर monitor.atakmatak@gmail.com या इमेल पत्त्यावर किंवा फेसबुक कमेंटमध्ये जरूर विचारा. आम्ही ते लेखकापर्यंत पोचवू. त्याचं उत्तर पुढील भागांत असेल किंवा आम्ही ते पुढील भागात देण्याची विनंती करू