लेखांक - ३: उघडा डोळे, बघा नीट!

लेखांक - ३: उघडा डोळे, बघा नीट!

लेखन: आल्हाद महाबळ

 याआधी: लेखांक  |

 

काय मग? खिडकी, उजेड, भिंत, सावली बघितलीत ना? की ट्यूबमागे लपलेल्या पालीवरच लक्ष ठेवून बसावं लागलं? तशी तुम्ही आजकालची मुलं शूर-वीर आहातच.

तर सावली म्हणजे काय? तर उजेड आणि अंधाराच्या मधली स्टेप. थोडासाच उजेड. पण पूर्ण अंधारही नाही. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? खिडकीच्या जवळ खूप उजेड होता. आणि खिडकीपासून दूर सावली हळूहळू वाढत गेलीय आणि खिडकीतून येणारा प्रकाश जिथे पोहोचतच नाहीये तिथे अंधार आहे. ह्याचं चित्र काढायला गेलं तर ते साधारण या पुढल्या आकृतीसारखं दिसेल.

इथे सावली आहे. पण उजेड आणि अंधाराच्या मधे सावली नक्की कुठे सुरू झाली आणि कुठे संपली ते पक्कं दाखवता येणार नाही.


तुम्ही भर दुपारी शाळेतून येत असता किंवा क्लासला वगैरे जात असता. कडक ऊन असतं, तेव्हा तुमची जी सावली पडते, तिचा एक आकार असतो. तुमची सावली तुमच्या आकाराचीच पडते. ह्याचं चित्र काढायला गेलं तर ते साधारण या पुढल्या आकृतीसारखं दिसेल. 

पण समजा, एखाद्या दुपारी खूप ढग असतील, तर मात्र अशी सावली दिसणार नाही. पुन्हा सगळा खिडकीतून येणाऱ्या उन्हासारखा प्रकार होईल. तर हा जो उजेड आणि अंधारातला फरक आहे ना, ह्याला म्हणतात  (contrast). ढगाळ वातावरणात उजेड आणि सावलीतली सीमारेषा धूसर होते, तेव्हा त्याचा अर्थ कॉन्ट्रास्ट कमी आहे असा होतो. आणि जेव्हा भर उन्हात याच्या बरोबर उलट परिस्थिती असते, तेव्हा जास्त contrast आहे असं म्हणतात.

गेल्या दोन लेखांकांमधून आपण फोटोग्राफीचा अभ्यास करतोय. अभ्यास म्हटला की गृहपाठ आलाच! अरे, चिडू नका रे… सोप्पा गृहपाठ देतो. जास्त आणि कमी कॉन्ट्रास्ट कुठे आणि कसा दिसला याची किमान ३ उदाहरणं मला कळवायची. जमेल ना?

फोटोग्राफी म्हणजे प्रकाशाने लिहिणं हे आपलं ठरलंय ना? मग प्रकाशासाठी फक्त सूर्यावर अवलंबून राहून कसं चालेल? आपल्याला हवा तसा, हवा तितका आणि हवा तेव्हा उजेड पाडता यायला हवा. ते कसं करायचं, ते पुढच्या आठवड्यात बघू. तोवर चला, गृहपाठाला लागा.

(क्रमशः)

 --------------------

यावेळी दिलेला गृहपाठ करून तुमची उत्तरं, तसेच मुलांना या प्रक्रियेत पडणारे प्रश्न तुम्ही आमच्या फेसबुक पेजवर किंवा इथेच खाली कमेंट्समध्ये किंवा monitor.atakmatak@Gmail.com या पत्त्यावर पाठवू शकता.

लेखातील चित्र/आकृती आल्हाद महाबळ यांची आहे. लेखाच्या सुरुवातीला असलेले चित्र (मुखपृष्ठ चित्र) आंतरजालावरून घेतले असून त्याचा मुळ छायाचित्रकार समजला नाही, मात्र सदर चित्र क्रिएटिव्ह कॉमन्स या प्रताधिकारांतर्गत वापरले आहे.