बायो बबल - भाग ४ (फ्यूस्टर जेन्नर व्हॅक्सीन!)
बायो बबल - भाग ४ (फ्यूस्टर जेन्नर व्हॅक्सीन!)
लेखन: विद्याधीश केळकर
याआधीचे भाग: भाग १ | भाग २ | भाग ३
१८व्या शतकाच्या पूर्वार्धात युरोपमध्ये व्हॅरीओलेशनचा (Variolation) जोमाने प्रसार सुरु झाला होता. खुद्द इंग्लंडच्या राजपरिवारानी आपलं व्हॅरीओलेशन करून घेतलं. मग काय, इतर सगळेच ते करून घेऊ लागले. हळूहळू देवीचा आजार आटोक्यात येईल असं वाटू लागलं. व्हॅरीओलेशन अजून प्रभावी बनवण्यासाठी नवे प्रयोग सुरू झाले. एकाच माणसाला एकाच वेळी दोन प्रकारे व्हॅरिओलेट करणे किंवा शरीरावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी छेद देऊन, त्यात स्कॅब पावडर अथवा पस भरणे असे अनेक प्रयोग सुरु झाले. इतर रोगांसाठीसुद्धा असं काही करता येईल का? असाही काही जणांच्या मनात विचार आला, तसे प्रयोगही झाले. जसजसे हे प्रयोग वाढू लागले तसतसे विविध संशोधक आपली निरीक्षणं इतरांबरोबर पडताळू लागले. या निरीक्षणांमधून एक चकित करणारी बाब समोर आली. संशोधकांच्या असं लक्षात आलं, की काही लोकांना व्हॅरिओलेट केल्यानंतर त्यांच्यामधे देवीची कोणतीच लक्षणं दिसत नाहीत. त्यांना साधा ताप देखील येत नाहीये. दोनदा-तीनदा कितीही वेळा त्यांना व्हॅरिओलेट केलं तरी त्यांना काहीच होत नाही. म्हणजे त्यांच्यात Variolation फेल होतंय का? पण तसं तर काही नव्हतं, कारण या लोकांना पुढच्या देवीच्या साथीतही रोग होत नसे! काय खास होतं या लोकांमधे? त्यांना काही दैवी देणगी लाभली होती की काय? यांना व्हॅरीओलेशनमुळे अथवा साथीतही देवीची लागण का होत नसावी?
याचं उत्तर दिलं ’जॉन फ्युस्टर’ने! हा जेन्नरचा मित्र आणि सहकारी होता. पेशाने डॉक्टर होता. जेन्नरपेक्षा ११-१२ वर्षांनी मोठा होता, जेन्नरचा मोठा भाऊच जणू. ‘Cowpox’मुळे स्मॉलपॉक्स पासून संरक्षण होते हे ताडणारा पहिला जॉनच होता आणि तेही १७६३मधे! जेन्नरची लस जनमान्य झाली ती १९व्या शतकाच्या सुरुवातीला, साधारण १८०२-०३ मध्ये. म्हणजे यामधे जवळपास ४० वर्षं गेली. का? फ्युस्टरने त्याचा हा अंदाज कोणाला बोलून दाखवला नाही का? त्यानी कोणाला याबद्दल सांगितलं नाही का? नक्कीच सांगितलं, आणि दुसर्या तिसर्या कोणाला नव्हे तर त्याच्या तीन जवळच्या मित्रांना, जोसेफ वॉलीस, डॅनिएल लडलॉ आणि त्याचा शिष्य एडवर्ड जेन्नर!
त्याचं झालं असं, की जॉन फ्युस्टर कडे दोन भाऊ व्हॅरिओलेशनसाठी आले. पण व्हॅरिओलेशननंतर या दोनही भावांमधे देवीची दिसणरी कुठलीच लक्षणं दिसली नाहीत. त्याने अजून एकदा त्यांचं व्हॅरिओलेशन करून पाहिलं पण छे! त्यांना पुढील साथीत तर लागण झाली नाहीच, पण याआधीही त्यांना देवीची लागण झालेली नव्हती हे ऐकून फ्युस्टरचं कुतूहल चाळवलं. त्यानी यात लक्ष घालायचं ठरवलं. तो त्या दोघा भावांना भेटला. त्यांना अनेक प्रश्न विचारले. त्यांचा सर्व वैद्यकीय इतिहास जाणून घेतला. त्यातूनच त्याला असं लक्षात आलं, की यांना जरी कधी देवी झाल्या नसल्या तरी यांना Cowpox मात्र होऊन गेलेला आहे. तसे हे दोनही रोग एकमेकांचे भाऊच म्हणायचे. पण Cowpox हा अतिशय सौम्य होता. तो मुख्यत्वे गाईंना होणारा रोग होता, पण त्यांच्या सहवासाने माणसालाही त्याची लागण होई. पण गाईंइतका त्रास माणसाला होत नसे. फ्युस्टरच्या मनात आलं, की Cowpoxमुळे तर यांचं स्मॉलपॉक्स पासून रक्षण होत नसेल ना? तसं असेल, तर हा फार मोठा शोध होता. कारण, जर cowpoxच्या फोडातील पस व्हॅरिओलेशन साठी वापरला तर व्हॅरिओलेशनमुळे होणार्या परिणामांची मात्रा कमी होणार होती. कदाचित त्यामुळे व्हॅरिओलेशन करूनही दगावणार्या २-३% लोकांचेही प्राण वाचणार होते. या विचारानिशी फ्युस्टरने या पद्धतीचा वापर करायला सुरुवात केली. त्याच्या मित्रमंडळीत त्यानी ही गोष्ट बोलून सुद्धा दाखवली.
मग तरीही जेन्नरला लसीकरणाचा जनक का म्हणतात? फ्युस्टरनी यावर पुढे काहीच काम केलं नाही का? केलं ना! नक्कीच केलं. इतकंच नव्हे तर त्यानी या सर्व अभ्यासावर, १७६५मध्ये, ’Cowpox and its ability to prevent smallpox’ या नावाने शोधनिबंध लिहून London Medical Societyला सुद्धा पाठवला होता. पण, त्यांनी तो प्रकाशित करायला नकार दिला. फक्त प्युस्टरच नाही तर इतरही काही वैद्यकीय संशोधकांनी हा अंदाज बांधला होता. पीटर प्लेट्ट, बेंजामिन जेस्टी हे असेच काही. पण, यापैकी कोणीच आपले निष्कर्ष प्रसिद्ध केले नाहीत, प्रकाशित केले नाहीत. पण एडवर्ड जेन्नरनी मात्र हे सगळं केलं. त्यानी अनेक वर्षं प्रयोग केले. विविध चाचण्या घेतल्या आणि या सगळ्यावर त्याने 'An Inquiry into the Causes and Effects of the Variolae Vaccinae' या नावाने एक प्रबंध लिहिला.
त्याचे प्रयोग आणि हे ‘व्हॅक्सीन’ व ते देण्याची पद्धत काय होती ते आपण लवकरच पाहू. पण, त्याआधी ही गंमत पहा!
जेन्नरच्या प्रबंधाच्या नावातील दोन शब्दांनी तुमचं लक्ष वेधलं असेल. एक म्हणजे Variolae (व्हॅरिओलाय) आणि दुसरं म्हणजे Vaccinae (व्हॅक्सीने). यातील Variola म्हणजे देवीचेच दुसरे नाव, यावरूनच Variolation हा शब्द आला. ज्याद्वारे एखाद्या व्यक्तीला Variola रोग दिला जातो ते Variolation. पण खरी गंमत आहे ती दुसर्या शब्दाची, तो म्हणजे Vaccinae! आता याच शब्दावरून vaccination हा शब्द आला हे तर सरळ आहे. पण मुळात जेन्नर ने त्याच्या औषधासाठी किंवा पद्धतीसाठी हा शब्द का वापरला?
तर त्याकाळी किंवा अजूनही विज्ञानात, विशेषतः जीवशास्त्रात ’लॅटीन’ भाषेचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. Variola हेही लॅटीनच नाव आहे. किंवा Corona हा शब्द लॅटीनमधील Coronatus म्हणजेच Crown या शब्दावरून आला आहे. तर तसंच जेन्नरनेही केलं. त्याने या पद्धतीत स्मॉलपॉक्सपासून संरक्षणासाठी Cowpoxचा वापर केला आणि गाईला लॅटीनमध्ये Vacca (व्हाक्का) असं म्हटलं जातं. त्यामुळे गाईपासून जे तयार झालं अथवा मिळालं ते म्हणजे Vaccine! जेन्नरच्या लसीसाठी हे नाव योग्यच होतं. पण त्यांनतर पुढची लस शोधणार्या लुई पाश्चरनी जेन्नरच्या शोधाच्या सन्मानार्थ हेच नाव सरसकट सर्व लसींना दिलं आणि आजही आपण तेच नाव वापरतो!
(क्रमश:)
चित्र: आंतरजालावरून साभार (चित्रस्रोत)
अटक मटकच्या मॉनिटरकडून:
ही एक नवीन लेखमालिका आहे. एकुणच लसीचा शोध आणि त्याचा इतिहास समजून घेणं अत्यंत रंजक आहेच तितकंच माणसाच्या चिकाटीबद्दल कौतुक वाटायला लावणारंही आहे. दर बुधवारी या मालिकेतील पुढील भाग प्रकाशित होणार आहे. तुम्हाला जर याबद्दल काही प्रश्न असतील तर monitor.atakmatak@gmail.com या इमेल पत्त्यावर किंवा फेसबुक कमेंटमध्ये जरूर विचारा. आम्ही ते लेखकापर्यंत पोचवू. त्याचं उत्तर पुढील भागांत असेल किंवा आम्ही ते पुढील भागात देण्याची विनंती करू