टेकडीच्या निमित्ताने ४: ही तुझी आई की ताई?

टेकडीच्या निमित्ताने ४:
ही तुझी आई की ताई?
लेखन व चित्रे: ओजस फाटक,(इयत्ता ७वी, अक्षरनंदन)

याधीचे भागः एक । दोन | तीन

 

चालता चालता माझ्या बुटाचा सोल थोऽऽडासा फाटला. अवघड चढ चढून मी मारुती मंदिरापाशी थांबलो. दगडावर बसून बूट तपासला. आभा व तुहिन (आई व मुलगा) पुढे गेले. मी दुसराही बूट तपासला. तेव्हा ३ तरुण मुलं चढत आली, कॉलेजमध्ये जात असावीत. बघून तरी ती इतर कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांपेक्षा शहाणी आणि सभ्य दिसत होती. त्यातला लाल टीशर्टवाला मुलगा ओळखीचा वाटत होता. ते पुढे गेल्यावर मी त्यांना ओव्हरटेक केलं आणि काही अंतरावर जाऊन पाणी प्यायचं निमित्त काढून त्या लाल टीशर्टवाल्याला पाहून घेतलं. नव्हता तो माझ्या ओळखीचा. मी पुढे गेलो.

मी म्हातोबा मंदिरा जवळचा उंच दगड शिवून आलो आणि खैराच्या झाडाच्या फांदीचा काटा तोडून हिवरीच्या फांदीचा काटा तोडून दोन्ही जवळ जवळ धरले. हिवरीचा पांढरट होता दुसरा फरक काढायच्या आतच आभा (आई) म्हणाली की आपण ग्लिरीसिडीया (उंदिरमार) कापूयात. आम्ही सुऱ्याने ग्लिरीसिडीया कापू लागलो.

३० वर्षांपूर्वी वनविभागाने ग्लिरीसिडीया पटपट वाढतो म्हणून लावला, तो विदेशी होता; त्यामुळे त्याला खाणारे प्राणी-पक्षी-कीटक नसल्याने तो खूप भरभर वाढायचा. त्यामुळे तो इतर देशी वनस्पतींना मारायचा. वनस्पती कमी झाल्यामुळे त्यांना खाणारे प्राणी-पक्षी-कीटक कमी झाले/संपले.

मग आपल्याला शक्य आहे तितका हा ग्लिरीसिडीया कमी करू, म्हणून आम्ही हा कापायचो (वनविभाग कापायचा).

शिवाय कोणावर राग असेल तर तो ही निघायचा!

कापलेला ग्लिरीसिडीया आम्ही नत्र स्थिरीकरणासाठी (फिक्सिंगसाठी) व खत म्हणून टाकायचो.

मी असाच टाकायला गेलो तेव्हा ती तीन मुलं परत दिसली.

तो लाला टीशर्टवाला म्हणाला
"ती तिथे फांद्या कापत आहे, ती तुझी कोण लागते का?"
"हो" मी म्हटलं "लागते" .
“ती तुझी आहे की ताई?"
“आई आहे. का; काय झालं?"
“ती म्हटली, या ग्लिरीसिडीया फांद्या तिथे टाका"
"मग? तुम्ही टाकल्यात?"
"हो त्या काटेवाल्या झाडापाशी टाकल्या"
मग आम्ही पुढे गेलो
"ती नक्की तुझी आईच आहे ना? - म्हणजे ताई नाही ना?" त्याने परत विचारलं. "नाही, आईच आहे". मी मुद्दाम वैतागल्या सारख्या सुरात म्हणालो.

ती तिघं पुढे गेल्यावर. तिथे काम करणारा दारुडा कामगार त्याच्याशी काहीतरी बोलू लागला.
बडबड चालू होती त्या कामगाराची.
मध्येच तो काहीतरी उडी मारल्यासारखं विचित्र करून मागे आमच्याकडे बघायचा. काय हो तुमचं नाव? गाव काय? गाडी चालवता येते? डंपर येतोय तिथे, चिमणी एवढा ट्रॅक्टरही आहे. इथे कमान बघायची आहे, असं काहीतरी बडबडत होता. ती मुलं त्याला 'गप बस' 'शांत बस' 'मुकाटपणे काम कर' वगैरे काहीतरी बोलत होती.

आणि मग दारुड्याची गंमत पुढच्या लेखात.....

(क्रमश:)

या लेखनाचे डिजिटल टंकन करण्यास मदत केल्याबद्दल उदय क्षीरसागर यांचे आभार