बायो बबल - भाग ५ (जेन्नर: लसीकरणाचा जनक)

बायो बबल - भाग ५ (जेन्नर: लसीकरणाचा जनक)
लेखन: विद्याधीश केळकर

याआधीचे भाग: भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४

 

काऊपॉक्स होऊन गेला असेल तर स्मॉलपॉक्स पासून संरक्षण होते हे जॉन फ्युस्टरनी ताडलं. त्याच्या मित्रमंडळीत त्यानी हे बोलून दाखवलं. एवढंच नव्हे, तर काही प्रमाणावर त्याने व्हॅरिओलेशनसाठीदेखील याचा उपयोग करून पाहिला. ही गोष्ट आहे साधारण १७६०च्या दशकातली. पण, पद्धतशीर प्रयोगातून स्मॉलपॉक्स विरोधातील ’व्हॅक्सीन’ १८०२ साली वापरलं जाऊ लागलं. मग या मधल्या चाळीस वर्षांत काय घडलं? फ्युस्टरच्या शोधाने प्रेरीत होऊन जेन्नरनी स्मॉलपॉक्स विरोधात नवीन उपचारपद्धती शोधण्यासाठी प्रयोग सुरु केले. पण ते बर्‍याच उशीरा. कारण त्या काळात जेन्नरचे स्वतःचे काही इतर प्रयोग चालू होते. तो त्यावेळी रॉयल सोसायटीचा फेलो होता. त्याचं मुख्य कार्यक्षेत्र होतं प्राणीशास्त्र (zoology). कोकीळा आपली अंडी दुसर्‍या पक्षांच्या घरट्यात घालते, हे पारंपारिक ज्ञानातून माणसाला ठाउक होतं. पण त्या सर्व प्रक्रियेबाबत बरेच मतभेद होते. त्याच्या खोलात आपण शिरायला नको. तर मुद्दा असा की, कोकिळेच्या हालचालींची आणि तिने दुसर्‍या घरट्यात दिलेल्या अंड्यातून येणार्‍या पिल्लांची पद्धतशीर निरीक्षणं घेउन ती ’प्रोसेस’ विशद करणारा. कोकिळेची पिल्लं बाहेर आल्यानंतर इतर अंड्यांना अथवा पिल्लांना घरट्यातून खाली पाडतात हे प्रथम सांगणारा, कोकिळेतील ’Brood Parasitism'ची संकल्पना पहिल्यांदा मांडणारा जेन्नर होता! थोडक्यात, या मधल्या वर्षांत तो बराच बिझी होता. पण त्याच्या प्राणीशास्त्राच्या अभ्यासाचा त्याला पुढे त्याच्या व्हॅक्सीनच्या प्रयोगात खूपच उपयोग झाला. या अभ्यासातून शिकलेली मनुष्याची शरीरचना, प्राण्यांमधून माणसात येणारे रोग याचा त्याचा अभ्यास त्याला पुढे कामी आला.

जेन्नरनी त्याचा पहिला प्रयोग त्याच्या माळ्याच्या मुलावर केला. त्याचं नाव जेम्स फिप्स, वय वर्षं ९. ब्लॉसम नावाच्या गाईपासून काऊपॉक्स झालेल्या सेरा नेल्म्स हिच्या हातांवरील फोडातील द्रव काढून जेन्नरने तो जेम्सच्या शरीरात टोचला. जेम्सला त्याजागी एक दोन फोड आले पण इतर कुठलीच लक्षणे दिसली नाहीत. पुढे काही आठवड्यांनी जेन्नरनी आपली कल्पना पडताळून पाहण्यासाठी जेम्सला व्हॅरिओलेट केले, म्हणजेच स्मॉलपॉक्सचा द्रव टोचला आणि 'Eureka!' जेम्समधे स्मॉलपॉक्सची कोणतीच लक्षणं आढळली नाहीत. तो अगदी ठणठणीत बरा होता. जेन्नरचा पहिला प्रयोग तर सफल झाला. पण खरी कसोटी पुढे होती. हा प्रयोग एकाच माणसात यशस्वी होऊन चालणार नव्हतं तो सर्वांमधे यशस्वी व्हायला हवा. दुसरं म्हणजे व्हॅरिओलेशन करूनही प्राण गमवावा लागणार्‍या २-३% लोकांनाही ही पद्धत वाचवणारी ठरायला हवी होती. व्हॅक्सीनेट केलेल्या लोकांमधे मृत्युदर ०% असायला हवा होता. त्याशिवायही अनेक गोष्टी पुढील प्रयोगात लक्षात घेणं आवश्यक होतं. व्हॅक्सीनेशन नंतर लोकांना स्मॉलपॉक्स द्यायचा म्हणजे फक्त व्हॅरिओलेट करायचं होतं. पण हे व्हॅरिओलेशन काऊपॉक्स होऊन गेल्याच्या नक्की किती काळानंतर करायचं? स्मॉलपॉक्सच्या ‘पस’नी व्हॅरिओलेशन करायचं की मग स्कॅब पावडरनी? अशा अनेक गोष्टी तपासून पाहणं गरजेचं होतं. याचसोबत व्हॅक्सीनची मात्रा काय ठेवायची हेही तपासणं गरजेचं होतं.

हे सर्वकाही जेन्नरनी अतिशय सुसूत्रपणे पार पाडलं. त्यासाठी तब्बल ५-६ वर्षं त्याला खर्ची घालावी लागली. पण सरतेशेवटी त्याने स्मॉलपॉक्स विरोधात १००% परिणामकारक अशी लस शोधून काढलीच. गाईमुळे होणार्‍या रोगापासून या नव्या उपचाराची निर्मिती झाली होती. हे नवीन ’औषध’ गाय म्हणजेच Vacca (latin) पासून तयार केलं म्हणून ते Vaccine! आणि ही लस, हे औषध म्हणजे होतं तरी काय? तर Cowpox मुळे अंगावर उठणार्‍या फोडांमधील पसचं द्रावण (Solution)! Simple yet elegant! महत्त्वाचं म्हणजे, ‘व्हॅरिओलेशन’प्रमाणे हातावर जखम वगैरे करून न देता, त्यानी हे व्हॅक्सीन सरळ सुईद्वारे शरीरात, रक्तात टोचलं. जेन्नरनी या व्हॅक्सीनद्वारे अनेक गोष्टी दाखवून दिल्या. त्याने ’इम्युनिटी’ सोबतच ’क्रॉस इम्म्युनिटी’ची संकल्पना रुजवण्यास हातभार लावला. (त्याकडे आपण येऊच.) याआधी झालेल्या प्रयोगात गाईच्या सडांवरील फोडांमधला द्रव वापरला गेला होता त्याऐवजी जेन्नरने काऊपॉक्स झालेल्या माणसांच्या फोडांतील द्रव वापरला. काऊपॉक्स झालेले लोक हे स्मॉलपॉक्सला ’इम्युन’ असतात हे त्याने शास्त्रोक्तरित्या सिद्ध केलं. अशा २३जणांवर प्रयोग करून जेन्नरने रॉयल सोसायटीला आपला शोधनिबंध पाठवला. त्यांनी अतिशय काळजीपूर्वकपणे त्याचे सर्व निष्कर्ष आणि प्रयोग पडताळले आणि सरतेशेवटी जेन्नरच्या व्हॅक्सीनला परवानगी मिळाली. त्यानंतर हळूहळू १८४०साली युरोपात व्हॅरिओलेशन पूर्णपणे बंद झालं. हळूहळू जेन्नरच्या व्हॅक्सीनचा उपयोग युरोपभर होऊ लागला. युरोपभर व्हॅक्सीन विनामूल्य उपलब्ध झालं. जेन्नरच्या या प्रयोगांनी इतर अनेक संशोधकांना प्रेरणा दिली. इतर अनेक रोगांच्या विरोधात व्हॅक्सीन निर्माण करण्याचे प्रयोग सुरु झाले.

जेन्नरला लसीकरणाचा जनक तर म्हणतातच, पण अनेक ठिकाणी त्याला रोगप्रतिकारशास्त्राचाही जनक मानलं जातं. जेन्नरच्या प्रयोगांनी आणि शोधानी जीवशास्त्रातील ’Immunology’ची नवी शाखा उघडली. रोगाचे कारण, निदान आणि त्याचे निवारण याविषयी प्रयोग होऊ लागले. एकदा रोग होऊन गेल्या नंतर तो रोग परत का होत नाही? या प्रश्नाचे उत्तर शोधायला सुरुवात झाली. त्यातूनच मनुष्यातील ’Immune System'चा शोध लागला. होता होता जेन्नरच्या अथक प्रयत्नातून व्हॅक्सीन जगभर पोहोचलं. त्याचा वापर सगळीकडे होऊ लागला आणि १९८० साली स्मॉलपॉक्स अर्थात देवीचं जगभरातून समूळ उच्चाटन झाल्याची घोषणा WHOने केली. देवीचं समूळ उच्चाटन झालं, तरी आजही देवीच्या पसचे काही नमुने अमेरिका आणि रशियातील इन्स्टिट्युट्समधे जपून ठेवले आहेत.

जेन्नरनी स्मॉलपॉक्स वरील लस तयार केली खरी, पण ही लस का काम करते, ती का प्रभावी ठरते याचं उत्तर सापडलं नव्हतं. स्मॉलपॉक्स नक्की होतो कशामुळे हे सुद्धा कोणाला माहित नव्हतं. इतकंच काय रोग हे जीवाणू, विषाणू, बुरशी अशा सूक्ष्मजीवांमुळे होतात, त्यांच्याद्वारे ते पसरतात हेही अजून समजायचं होतं. वास्तविक Antonie van Leeuwenhoek (आंटोनी फान लेउवेन्होक)नी सूक्ष्मदर्शक तयार केल्याला आता १५० वर्षं झाली होती. सूक्ष्मजीवांचं अस्तित्त्व माणसाला ठाउक होतं. अनेक जीवाणू या सूक्ष्मदर्शकाखाली पाहिले अभ्यासलेही गेले होते. पण त्यांचा रोगांशी असलेला संबंध अजून कोणाच्या लक्षात आला नव्हता, आणि ते लक्षात यायला अजून ३०-४० वर्षं वाट पहावी लागणार होती. 

(क्रमश:)
चित्र: आंतरजालावरून साभार (चित्रस्रोत) चित्र हूकच्या ऑप्टिकल सूक्ष्मदर्शकाचे आहे. 


अटक मटकच्या मॉनिटरकडून:
ही एक नवीन लेखमालिका आहे. एकुणच लसीचा शोध आणि त्याचा इतिहास समजून घेणं अत्यंत रंजक आहेच तितकंच माणसाच्या चिकाटीबद्दल कौतुक वाटायला लावणारंही आहे. दर बुधवारी या मालिकेतील पुढील भाग प्रकाशित होणार आहे. तुम्हाला जर याबद्दल काही प्रश्न असतील तर monitor.atakmatak@gmail.com या इमेल पत्त्यावर किंवा फेसबुक कमेंटमध्ये जरूर विचारा. आम्ही ते लेखकापर्यंत पोचवू. त्याचं उत्तर पुढील भागांत असेल किंवा आम्ही ते पुढील भागात देण्याची विनंती करू