टेकडीच्या निमित्ताने ६: बैल

टेकडीच्या निमित्ताने ६:
बैल
लेखन व चित्रे: ओजस फाटक,(इयत्ता ७वी, अक्षरनंदन)

याधीचे भागः एक । दोन | तीन | चार | पाच

 

पुण्यात, कोथरूडमध्ये, परमहंस नगरच्या टेकडीवर दक्षिणमुखी मारुती मंदिराच्या साधारण ४०-५० फूट पश्चिमेकडे आम्ही तिघं चालत होतो. संध्याकाळचे ७ वाजत आले होते. २-३ मिनिटात काळोख होणार होता. आम्ही परतत होतो. त्या दिवशी थोडा उशीरच झाला होता.
याच टेकडीवर एक गृहस्थ यायचे ते त्यांच्या बैलांना कुठेतरी चरायला सोडायचे शिवाय इथलेही काही रानातले बैल होते.
जेव्हा आम्हाला परतायला उशीर व्हायचा, तेव्हा दक्षिणमुखी मारुतीपाशी काही बैल आमच्यापासून तीस-एक फूट डावीकडून आम्हाला समांतर चालत होते. ते १०-१२ होते. मगाशीच आम्हाला ४-५ बैल उजवीकडे आमच्याकडे टक लावून बघताना दिसले होते.
आमची वाट सुन्न होती. थंड होती. काळी होती. (अर्धवट विचित्र उजेडात ती जांभळी, काळी व पांढरट बनल्यासारखी वाटत होती)
तेवढ्यात अचानक उजवीकडच्या फाट्याच्या पुढच्या मोकळ्या जागेत मोकळ्या जागेत १०-१२ बैल बसलेले दिसले.
काही काळे, काही जांभळे व काही निळे दिसत होते.  बहुधा काळे दिसणारे काळे असतील. जांभळे दिसणारे तपकिरी असतील आणि निळे दिसणारे पांढरे असतील.
आम्हाला पाहून ते सगळे ताडकन उभे राहिले.
“आपणही त्यांना घाबरलोत, ते ही आपल्याला घाबरलेत!” मी म्हणालो.
ते बैल मोठे-तगडे, बलदंड शरीराचे होते. हिंस्र वाटत होते. पण बिचारे बैल गरीब होते. हिंस्र नव्हते. आम्ही त्यांना पाहून नकळत थबकलो. लक्षात आल्यावर आम्ही चालायला लागलो.

त्या डावीकडच्या बैलांपैकी एक बैल हंबरला. उजवीकडच्या एका निळ्या दिसणाऱ्या बैलाने त्याला प्रत्युत्तर दिलं.
आभा बैलांना खूप घाबरायची. त्यामुळे ती जवळ-जवळ पळायलाच लागली. तुहिन पण तिचं अनुकरण करू लागला. मी भरभर पावलं टाकून व ढांगा टाकून त्यांना गाठू शकत होतो.
मंदिराजवळ आलं तितक्यात डावीकडचे १०-१२ बैल त्याच वाटेला आमच्या पुढे आले. त्यांच्या वेगात त्यांच्या मागूनच जायचा निर्णय आम्ही घेतला.

मध्येच ते थबकून वळून बघायचे. काही वेळाने आमच्या असं लक्षात आलं, की बैल आमच्या मागे आहेत.
“ते आपल्याच वाटेनी आपल्या बरोबर आले तर?” तुहिननी विचारलं.
“ते काही घरी येणार नाहीत” मी म्हणालो.
“ते उलटे वळले तर?” तुहिन
“मग काय! मग मरायचं” मी
मागून गवत झटकण्याचा आवाज आला. तो बैल भरधाव वेगानी आमच्यावर घावून येत होता. वळलेल्या टोकदार शिंगांचा जांभळा बलदंड बैल. (तपकिरी)
इकडे आड तिकडे विहीर, डावीकडे काटेरी गवत उजवीकडे खड्डा! आम्ही खड्डापार उडी मारली. बैल हळू-हळू पुढे जाऊन दिसेनासे झाले.


खड्डेपार उडी घेतली पण मला अटकेपार झेंडे फडकवल्यासारखं वाटलं.
वाह!! वाहवा, वाहवा, बैलांच्या तावडीतून सुटले आम्ही.

(क्रमश:)

या लेखनाचे डिजिटल टंकन करण्यास मदत केल्याबद्दल उदय क्षीरसागर यांचे आभार