बायो बबल - भाग ८ (पाश्चरायझेशन)

बायो बबल - भाग ८ (पाश्चरायझेशन)
लेखन: विद्याधीश केळकर

याआधीचे भाग: भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६ | भाग ७

१९व्या शतकाच्या मध्यावर विज्ञानजगतात अनेक अभूतपूर्व घटना घडल्या. अशा घटना ज्यांनी या क्षेत्रात एक आमूलाग्र बदल घडवून आणला. १८३५ साली आगोस्तिनो बास्सी याने प्राथमिक स्वरुपातला ‘जंतू सिद्धांत’ मांडला. १८३८-३९ साली थिओडोर श्वॉन आणि मॅथिआस श्लाईडन यांनी पेशी सिद्धांताला बळकटी देणारे पुरावे सादर केले. १८४२ साली डॉपलर इफ्फेक्ट तर १८४८ साली लॉर्ड केल्व्हिन यांनी लावलेला अ‍ॅब्सोल्युट झिरो तापमानाचा शोध. १८५८-५९ मधे चार्लस डार्विन आणि अल्फ्रेड वॉलेस यांनी आपला उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला. सरतेशेवटी १८६५ मधे मेंडेलचा अनुवांशिकतेचा सिद्धांत. अशा आणि इतरही अनेक घटना घडल्या. यातच अजून एक नाव आवर्जून जोडलं पाहिजे ते म्हणजे लुई पाश्चर! १८५० पासून १८९० असा चाळीस वर्षांचा काळ या माणसाने गाजवला. काय केलं नाही याने, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, रोगप्रतिकारशास्त्र सगळ्या क्षेत्रात त्याने काम केले. एवढंच नाही तर जीवाणूशास्त्र (Bacteriology) ही जीवशास्त्राची नवी शाखाही पाश्चर पासूनच सुरू झाली! त्याने लस संशोधनासाठी स्थापलेल्या ‘पाश्चर इंस्टिट्युट’मधून अनेक उत्तमोत्तम शोधक घडवले. पाश्चर जितका त्याच्या शास्त्रीय ’वादां’मुळे (सिद्धांत) गाजला तितकाच इतर संशोधकांसोबतच्या विवादांमुळेही! अशाच या पाश्चरची ही कहाणी...


१८५०च्या दशकात रसायनशास्त्रात पाश्चरचं नाव गाजत होतं ते त्याच्या Molecular Asymmetryच्या शोधामुळे. या शोधाने रसायनशास्त्रातील ’Stereochemistry' या महत्त्वाच्या शाखेचा पाया रचला. अनेक विद्यापीठांकडून पाश्चरला बोलावणी आली होती. त्यातीलच फ्रान्समधील लिल विद्यापीठात १८५४ साली तो रसायनशास्त्राचा प्राध्यापक आणि विज्ञानशाखेचा प्रमुख म्हणून रुजु झाला. इथेच पाश्चरच्या जीवशास्त्रातील आणि पर्यायाने रोगप्रतिकारशास्त्रातील कार्याला सुरुवात झाली. त्याला कारणीभूत ठरलं फ्रेंच लोकांचं सर्वात आवडतं पेय, वाईन!

मॉसिएर बिगो, हे लिल मधील एका स्थानिक डिस्टिलरीचे मालक होते. त्यांच्या बिटाच्या वाईनची ख्याती सार्‍या लिलभर होती. व्यवसायही बरा चालला होता, पण तरी काही कुरबुरी, समस्या होत्याच. त्यातली सर्वात मोठी समस्या होती साठवलेल्या वाईनला कालांतरानी येणारा अल्कोहोलच्या चवी ऐवजी येणारी दह्यासारखी आंबट चव. त्याचं काय करावं त्यांना काही केल्या कळत नव्हतं. मॉ. बिगोंचा मुलगा लिल विद्यापीठात रसायनशास्त्र शिकत होता, तेही खुद्द लुई पाश्चरच्या हाताखाली. तेव्हा, मॉ. बिगोंनी, मॉसिएर पाश्चर यांची भेट घ्यायचं ठरवलं. कदाचित ते काही उपाय सुचवतील. त्याप्रमाणे मॉ. बिगो, मॉ. पाश्चर यांना जाऊन भेटले, त्यांना सगळ्या समस्या ऐकवल्या आणि त्यांची मदत मागितली. मॉ. पाश्चर स्वखुशीने तयार झाले. पुढील वर्षभर त्यांनी वाईन निर्मितीचा आणि त्यात अंतर्भूत सर्व प्रक्रीयांचा कसून अभ्यास केला. त्यात त्यांना आढळून आलं, की वाईन बनवताना होणारं Fermentation हे दुसर्‍या तिसर्‍या कोणामुळे नाही तर सूक्ष्मजीवांमुळे होतं आहे आणि, हे सूक्ष्मजीवसुद्धा दोन प्रकारचे आहेत. त्यातील एक वाईन साठी काढलेल्या फळाच्या अर्कातील साखरेचे अल्कोहोलमधे रुपांतर करतात. तर, दुसरे त्या साखरेचं रुपांतर आंबट चवीच्या लॅक्टिक आम्लात करतात. त्यांच्या असंही लक्षात आलं की ऑक्सिजनच्या उपस्थितीत ही प्रक्रिया मंदावते. त्यामुळे ’Ageing' साठी बॅरेल्समध्ये घट्ट बंद केलेल्या वाईनमध्ये ही प्रक्रिया उत्तम घडू शकते. पण मग हा वाईनला येणारा आंबटपणा टाळायचा कसा? तर त्यासाठी हे लॅक्टिक आम्ल तयार करणारे जीवाणू मारायला हवेत! ते कसे मारायचे? तर वाईनला उष्णता देऊन, तिला ५०-६० अंश तापमानापर्यंत तापवून. अगदी साधी प्रक्रिया होती पण ती अतिशय उपयोगी ठरली. मॉ. पाश्चरच्या या शोधाने केवळ मॉ. बिगोंचाच नव्हे तर संपूर्ण फ्रान्सचाच वाईन व्यवसाय वाचवला. वाईनच्या वाहतुकीत, निर्मितीत बर्‍याचदा वाईन या लॅक्टिक आम्लकारक जीवाणूंनी दूषित होत असे, त्याच्यापासून वाईन वाचवण्याचा उपाय आता गवसला होता. मॉ. लुई पाश्चर हे नाव फ्रांसभर गाजू लागलं होतं.
१८६५ साली पाश्चरने या ’वाईनच्या रोगाविरोधातल्या’ प्रक्रियेवर (उपचारावर) पेटंट घेतलं. ही पद्धत पुढे बियरच्या आणि दुधाच्या ’रोगाविरोधतही वापरली गेली आणि हीच पद्धत, आज आपण पाश्चराईझेशन नावानी ओळखतो. हल्ली वाईनसाठी ही पद्धत फरशी वापरली जात नाही पण दूध, ज्युस व इतर अनेक पॅकेज्ड पेय, पदार्थ टिकवण्यासाठी ही पद्धत वापरली जाते.
पण तरीसुद्धा अनेक जणांना पाश्चरची ही पद्धत मान्य नव्हती. त्यांच्या मते अशाप्रकारे उष्णता देउन वाईनमधील सारे जीवाणू जरी मारले आणि वाईन बॅरेलमध्ये घट्ट बंद करून ठेवली तरी त्यात परत जीवाणू वाढू शकतात. या संशोधकांच्या, लोकांच्या मते जीवन हे कुठेही, कोणत्याही परिस्थितीत, दुसर्‍या सजीवाच्या उपस्थितीशिवायही आकार घेउ शकतं. हवाबंद, निर्जंतूक बरणीतसुद्धा उत्स्फुर्तपणे नवे सूक्ष्मजीव तयार होऊ शकतात. यालाच 'Theory of spontaneous generation' (उत्स्फुर्त उत्त्पतीचा सिद्धांत) असं म्हटलं जातं. एखादा सजीव फक्त लैंगिक प्रजननातूनच नव्हे तर एखाद्या निर्जीव घटकातूनही उत्स्फुर्तपणे, अचानक आकार घेउ शकतो व त्यासाठी त्याचसारख्या दुसर्‍या सजीवाची गरज नसते असं हा सिद्धांत सांगतो. हा सिद्धांत त्याकाळात सर्वदूर प्रचलित होता. त्याला पाश्चरची ही प्रक्रिया एकाप्रकारे छेदच देत होती. इतकंच नाही तर पाश्चरने ही प्रक्रिया शोधल्यानंतर एका वर्षातच डार्विनने त्याचा उत्क्रांतीवाद जगासमोर मांडला. आणि एक युद्ध पेटले.

पाश्चरसुद्धा या ’युद्धा’त उतरला. नुसता उतरलाच नाही तर त्याने व इतर काही संशोधकांनी पद्धतशीर प्रयोगांद्वारे उत्स्फुर्त उत्पतीचा सिद्धांत खोटा ठरवला. खरंतर या कहाणीचा आपल्या Immunologyच्या कथेशी तसा संबंध नाही पण तरी हा सिद्धांत आणि तो खोटा ठरवायला झालेले प्रयोग रंजक आहेत. तेव्हा म्हटलं आपण आपली वाट सोडून जरा आडवळण घेउया. ही कहाणीपण जाणून घेउया, भेटू पुढच्या भागात!

(क्रमश:)
चित्र: आंतरजालावरून साभार 


अटक मटकच्या मॉनिटरकडून:
ही एक नवीन लेखमालिका आहे. एकुणच लसीचा शोध आणि त्याचा इतिहास समजून घेणं अत्यंत रंजक आहेच तितकंच माणसाच्या चिकाटीबद्दल कौतुक वाटायला लावणारंही आहे. दर बुधवारी या मालिकेतील पुढील भाग प्रकाशित होणार आहे. तुम्हाला जर याबद्दल काही प्रश्न असतील तर monitor.atakmatak@gmail.com या इमेल पत्त्यावर किंवा फेसबुक कमेंटमध्ये जरूर विचारा. आम्ही ते लेखकापर्यंत पोचवू. त्याचं उत्तर पुढील भागांत असेल किंवा आम्ही ते पुढील भागात देण्याची विनंती करू