टेकडीच्या निमित्ताने ८: टचटची किडे

टेकडीच्या निमित्ताने ८:
टचटची किडे
लेखन व चित्रे: ओजस फाटक,(इयत्ता ७वी, अक्षरनंदन)

याधीचे भागः एक । दोन | तीन | चार | पाच | सहा | सात

 

शरद व हेमंत ऋतूमध्ये (साधारण सप्टेंबर ते जानेवारी) संध्याकाळी सहा - साडे सहा नंतर आम्ही टेकडीवरचं काम उरकून खाली येत असायचो... कारण या काळात दिवस छोटे असतात, रात्र मोठी, त्यामुळे अंधार लवकर पडतो.

२०१९ ला पावसाळा लांबला, त्यामुळे पावसाळ्यात जे किडे बाहेर पडतात ते ही उशीरापर्यंत बाहेर यायचे. नेहमीची पाखरं पावसाळ्यात बाहेर पडतात, एक प्रकारचा काळा-चॉकलेटी-करडा टोळ पावसाळ्यात जास्त दिसतो. बेडूकही पावसाळ्यात बाहेर येतात बरेच. बेडूक किडा नाही, पण पावसाळ्यात खूप किडे बाहेर पडतात. त्यातला माझा सर्वात नावडता किडा पावसाळ्यात आणि पावसाळा संपल्यावर काही काळ असतो. तो उडत येतो आणि पंख कमी हलवतो. तो तीन सेकंदात साधारण पाच-सहा वेळा पंख हलवतो, माझ्या निरीक्षणानुसार. पण तो पंख हलवतो, तेव्हा टच टच, खट खट आणि चर्रर्र चर्रर्र याचा एकत्र आवाज येतो. तो आवाज लिहिता येत नाही.

तो किडा दक्षिणमुखी मारुतीच्या मंदिराजवळ असतो. तो जवळ आला की किळस वाटते. त्याचं शरीर दोन पंखांच्या साधारण बेरजेएवढं... बहुदा त्याचा रंग चॉकलेटी असावा, कारण पावसाळ्यातले बहुतेक किडे मी चॉकलेटी पाहिलेत.

आभा म्हणाली की ते कुठले तरी टोळ असतील, पण मला नाही वाटत ते टोळ असतील. माझ्या मते ते पतंगासारखे मोठे पंखवाले किडे असावेत. त्यांच्या पंखांच्या आवाजावरून मी त्यांना ‘टचटची किडे’ नाव ठेवलं. टचटची किडा एकटा वावरताना मी कधी पाहिला नाही. कायम दोन-तीन कमीतकमी असतातच. ते नक्की कसे दिसतात ते अर्थात मला माहीत नाही कारण ते येतात तेव्हा अंधार असतो. पण मी चित्रात जो काढला आहे तो माझ्या कल्पनेतला.... तो तसा दिसत असावा.

आणखीन थोड्या गोष्टी आम्हाला टेकडीवर दिसल्या. एक म्हणजे ब्लॅक विंग्ड काईट. ती घार पांढरी असते. पांढरी म्हणण्यापेक्षा राखाडी म्हणणं योग्य ठरेल. ब्लॅक विंग्ड काईट ला मराठीत कापशी घार म्हणतात. कापशी घारीचे पाय इतर पक्ष्यांसारखे पिवळे केशरी असतात. पंख काळे राखाडी आणि शेपटीशी खाली काळा रंग. आम्ही म्हातोबा मंदिर टप्प्यात आलेलं असताना, चढत असताना ती घार आली. पूर्वेकडून पश्चिमेकडे जात होती. बहुदा सूर्य जातो कुठे जातो हे तिला पहायचं असेल! पण ती पश्चिमेकडे जाऊ शकत नव्हती कारण जोरदार वारं सुटलं होतं. आमचेही रेनकोट फडफडत होते. कापशी घार वर खाली वर खाली करत होती पण सरासरी ती खाली येत होती; ती जवळ आली तेव्हा तिचा लाल डोळा दिसला. पंख वरून करडे होते, खालून काळे होते. पंख फडफडवत होती, पण तिला पुढे मात्र जाता येत नव्हतं. अचानक वारा थांबला आणि घार झटकन पुढे गेली. ती NDA च्या हद्दीच्या भिंतीपलीकडे दिसेनाशी झाली.

दुसरी गोष्ट म्हणजे हिरव्या पोपटी रंगाचं पेरभर लांबीचं सुरवंट. आम्ही चढाईच्या मार्गावर असताना वाटेच्या उजवीकडे ते सुरवंट आम्हाला दिसलं. ते पोपटी होतं आणि अंगावर निळे लाल पिवळे ठिपके. त्याच्या अंगावरचे केस पांढरे होते आणि पाय काळे. मी त्याचा फोटो काढला जरा वेगळ्या अँगलनी. मी कॅमेरा त्याच्या जवळ त्याच्या उंचीच्या पातळीवर आणला आणि थोडासा वर तिरका करून फोटो काढला. तो खूप भारी आला. मला असे फोटो काढायला आवडतं. त्यानी ज्याचा फोटो काढलाय ते मोठं वाटतं.

तिसरी गोष्ट म्हणजे चॉकलेटी चपटी आळी वाटेच्या मधोमध चालत होती. कुणीतरी चुकून किंवा मुद्दामून तिला चिरडून टाकेल! जवळच धावड्याचं झाड होतं, त्यातल्या एका पानावर आम्ही तिथूनच पडली असेल असा अंदाज बांधून तिला धावड्याच्या पानावर ठेवलं. घरी जाऊन फुलपाखरांच्या पुस्तकात पाहिलं तर कळलं की ती आळी खालचं गवत खाते.... म्हणे त्या गवताचं नाव रानमोडी असतं.

म्हातोबा मंदिर टप्प्यात येण्याचा जो परिसर आहे, त्यातल्या म्हातोबा मंदिराच्या दक्षिण-नैऋत्य वाटेवरून आम्ही चढतो. त्या वाटेच्या डावीकडे NDA ची हद्द आहे. वनविभाग आणि आर्मीच्या सीमेवर भारत-पाकिस्तान सीमेसारखी जाड दगडी भिंत बांधली आहे आणि वरती तारा आणि काचा लावल्यात! भिंत आणि म्हातोबा मंदिराची दक्षिण नैऋत्य वाट यांच्यामध्ये हिवर, धामण, ऐन अशा वनस्पती आहेत. धामणीच्या काही वेली भिंतीवर सुद्धा चढल्यात. हिवर आणि खैर यांच्यातला मला माहीत असणारा मुख्य फरक म्हणजे हिवरीच्या खोडावरचं साल पांढरट असतं आणि खैराच्या खोडावरचं साल काळपट चॉकलेटी. हिवरीला हिवाळ्यात गोलाकार म्हातारी सारखी पांढरी पिवळी फुलं येतात आणि शेंगा होऊन वसंतात वाळायला सुरुवात होते. वाळलेल्या खाली पडलेल्या हिवरीच्या शेंगा आम्ही बऱ्याच आणल्यात.

हिवरीच्या झाडावर आम्हाला व्हाईट आय पक्षाचं घरटं सापडलं. हिवरीला खूप अणकुचीदार तीक्ष्ण काटे असतात. बहुतेक तिने मुद्दाम तिथे काट्यांच्या ठिकाणी संरक्षणार्थ घरटं केलं असावं. घरट्यात तीन अंडी होती. आम्ही तिच्याकडे पाहतोय हे त्या व्हाईट आयला कळलं की ती तिथेच निश्चल बसून राहायची. पण अशा पक्षांना कावळ्यांपासून धोका असतो. आपण त्यांच्याकडे सरळ सरळ बघत बसलो तर कावळ्यांना कळतं की ते तिथे आहेत. मग ते येऊन अंडी खाऊन टाकतात. पण कुणास ठाऊक एवढ्या काट्यांमधून येऊ शकतील की नाही कावळे!

तरीही आम्ही खबरदारी बाळगायचो की असं सरळ टक लावून व्हाईट आय कडे बघायचं नाही. मग मध्ये काही कारणांनी आठवडाभर टेकडीवर येणं शक्य झालं नाही, पण जेव्हा आलो तेव्हा पाहिलं तर व्हाईट आय गायब. फुटलेली अंडी घरट्यात होती... याचा अर्थ मी वाईट नाही घेतला. बहुतेक पिल्लं बाहेर आली असावीत आणि ते सगळे निघून गेले असतील, पुढचं आयुष्य जगायला...

(क्रमश:)