टेकडीच्या निमित्ताने १०: पिशव्या

टेकडीच्या निमित्ताने १०:
पिशव्या
लेखन व चित्रे: ओजस फाटक,(इयत्ता ७वी, अक्षरनंदन)

याधीचे भागः एक । दोन | तीन | चार | पाच | सहा | सात | आठ | नऊ

 

सुमारे तीस वर्षांपूर्वी वनविभागाने टेकडीवर ग्लिरिसिडीया ची लागवड केली. ग्लिरिसिडीया या लेखात दिल्याप्रमाणे त्याचे दुष्परिणाम त्यांना कळले, तेव्हा २०१८-१९ च्या हिवाळ्यात त्यांनी काही ग्लिरिसिडीया बुंध्याशी कापला. त्यानंतर आम्ही बिया पेरू लागलो तेव्हा साधारण त्याच सुमारास वनविभागाचे कामगार टेकडीवर राहायला लागले. ते झाडं लावण्याकरता आले होते पण ते बिया नाही पेरायचे. ते प्लास्टिकच्या छोट्या-मोठ्या काळा पिशव्यांच्यातून तयार उगवलेली झाडं आणायचे, ती लावायचे आणि पिशव्या तिथेच टाकून जायचे. झाडं तर लावली, पण प्लास्टिककही तिथेच!

हे ज्या दिवशी आम्हाला कळलं तेव्हा आम्ही शक्य तेवढ्या पिशव्या (ज्या कोरड्या आहेत त्या, कारण पावसाळा सुरू होता.) sack मध्ये कोंबल्या आणि घरी आणल्या. पुढच्या दिवशीही आम्ही तसंच केलं. पिशव्या जास्त प्रमाणात खाली आणण्यासाठी आम्हाला युक्ती काही केल्या सुचेना.

मग सुचलं की एकमेकांवर ठेवून सुतळीने घट्ट बांधून हातात धरून खाली आणणे. बऱ्याच पिशव्या साठल्या तेव्हा आम्ही त्या रिसायकलिंगला देऊ लागलो. फोटोबिटो काढले कसा कचरा केला होता वनविभागाच्या कामगारांनी त्याचे. मग वनविभागाचे कामगार पिशव्या नीट उचलून एके ठिकाणी ठेवायचे. पिशव्या आम्हीच खाली न्यायचो. तरी निदान ते आता पिशव्या गोळा करून एकत्र तरी ठेवत होते, आम्हाला नेता यावं म्हणून. इकडे तिकडे टाकत नव्हते. ते पाहून आम्हाला थोडं हुश्श वाटलं.

पण पुढे काही दिवसांनी असं आढळून आलं, की त्यांनी पिशव्यांच्यातून झाडं मागवली पण ती मातीत लावलीच नाहीत! एके ठिकाणी गर्दी करून शेजारीशेजारी जवळजवळ अनेक झाडं ठेवली होती. सुमारे सहा सात फूट उंचीची झाडं. काळ्या पिशव्या, त्यात भरलेली माती आणि लावलेली बारकुडी सहा-सात फूट उंच झाडं. काटेसावर, पिंपळ जास्त होते. ती झाडं जमिनीत लावायचेही कष्ट घेतले नाहीत. झाडं मागवली आणि ठेवून दिली. पाणी, क्षार, सत्व वगैरे कमी पडल्याने ती झाडं वाळूनही गेली. त्याचाही फोटो काढून आम्ही ठेवला. आम्ही बिया पेरणी, ग्लीरीसीडिया कापणी हे सुरूच ठेवलं. रोज येता जाता आम्ही त्या वाळलेल्या झाडांवर नजर टाकायचो. आठवडाभर झाडं तशीच असायची. त्यानंतर ती झाडं गायब झाली. आम्हाला वाटलं ती गायब झाली असतील. मग लगेचच पुढच्या दिवशी वाळलेल्या गवताच्या पेंड्यांच्या यांच्या खाली काहीतरी काळं दिसलं. एक पेंडी उचलून पाहिली तर प्लास्टिकच्या पिशव्या होत्या... काम करायचं नव्हतं आणि ओरडा पण खायचा नव्हता; त्यामुळे अप्रामाणिकपणे कुणाला कळू नये म्हणून गवताच्या पेंड्यांखाली ढीग केलेल्या पिशव्या! काही दिवसांनी त्याही गायब झाल्या.

पुढचे बरेच दिवस नवं प्लांटेशन केलं नाही आणि मग परत पिशव्यांना सुरुवात झाली. पुन्हा प्रत्येक रोपाशी एक पिशवी पडली होती. यावेळी प्लांटेशन मोठ्या प्रमाणात केलं होतं. आम्हाला तिघांना इथल्या सगळ्या पिशव्या उचलायला फार दिवस लागणार होते. आमच्या समोर दोन मार्ग होते - एक तर जास्त दिवस लावून तिघांनी साफ करायचं, दुसरा म्हणजे ओळखीच्या लोकांना बोलावून मदत घेऊन एक-दोन दिवसात साफ करायचं. आम्ही दुसरा मार्ग निवडला. दर चार पाच आठवड्यांनी आम्ही टेकडी ड्राईव्ह घोषित करायचो आणि जेवढे लोक येतील त्यात ठरवलेलं काम करायचो. एकूण चार-पाच वेळा आम्ही टेकडी ड्राईव्ह घोषित केला. पुरेसा प्रतिसाद न आल्याने एकदा आम्हाला इरादे रद्द करावे लागले. शेवटी मध्ये एकदा आम्ही गेलो तेव्हा बऱ्याच पिशव्या उपसल्या होत्या तेव्हा कळलं, की हे कामगार आड ठिकाणी मातीच्या ढिगाखाली पिशव्या लपवत आहेत! त्याचे आम्ही फोटो काढले. मग आम्हाला वाटलं की ते कामगार ज्यांच्या हाताखाली काम करत आहेत त्यांनी त्यांना झापला असावं; कारण पिशव्या दिसेनाशा झाल्या.

पण एक गोष्ट नवीन खटकली ती म्हणजे प्लास्टिक जाळण्याचा वास. तो वास बरेच दिवस येत राहिला. मग आम्ही ठरवलं, बघूच, हा वास कुठून येतोय. मग एके ठिकाणी आम्हाला धूर दिसला. आम्ही तिथे जाऊ लागलो. पण तेवढ्यात कळलं की सूर्यास्त कधीच होऊन गेलाय.

आम्ही ताबडतोब पायथ्याची वाट पकडली. त्यादिवशी आम्हाला खूप उशीर झाला यायला. टचटची किडे येतील असं वाटलं, पण ते नाही आले, कारण आता जानेवारीच काय फेब्रुवारीही संपला होता.

दुसर्‍या दिवशी आम्ही धूर निघण्याच्या ठिकाणी आलो, तेव्हा जळलेल्या पिशव्या दिसल्या. आणि कळलं की हे कामगार पिशव्या जाळत आहेत... धन्य आहेत बाबा, धन्य!