टेकडीच्या निमित्ताने ११: बहावा आणि चिंच
टेकडीच्या निमित्ताने ११:
बहावा आणि चिंच
लेखन व चित्रे: ओजस फाटक,(इयत्ता ७वी, अक्षरनंदन)
याधीचे भागः एक । दोन | तीन | चार | पाच | सहा | सात | आठ | नऊ | दहा
किती बिया पेरल्या की किती झाडं येतात ते काही आम्हाला माहीत नाही! काही बिया खराब असतात. त्यांच्यात कुवत नसते. काही बियांवर बुरशी चढते. काही बियांना किडे पोखरतात. काही बिया जिथे पेरलेल्या असतात तिथे त्यांच्या खालीच प्लास्टिक असतं. काही बिया माणसांकडून तुडवल्या जातात. काही बिया चुकीच्या ठिकाणी फेकल्या जातात. काहींना पाणी मिळत नाही. काहींना सत्त्व पुरत नाही. काही बियांना कुत्रे खाऊन टाकतात, पक्षी खातात.
काही बियांच्यातून मात्र झाडं उगवून येतात. ज्या बियांना अशा कशालाही तोंड द्यावे लागत नाही, बळी द्यावा लागत नाही त्यांची झाडं बनतात. बिया जास्ती करून फळांच्या किंवा शेंगांच्या असतात पण ऐनासारख्या वनस्पतींच्या पंखवाल्या बिया नुसत्या झाडावर लागतात. वाऱ्याबरोबर पंखवाल्या बियांना इकडे-तिकडे उडत जायचं असेल तर बाजूनी फळ किंवा शेंग असून कसं चालेल?! बिजा, वावळ, अर्जुन ही पण काही पंखवाल्या, फळ किंवा शेंगा नसणाऱ्या, थेट झाडावर लागणाऱ्या बियांची झाडं आहेत. बिजा, वावळ, अर्जुन, ऐन यापैकी बिजा आणि ऐनाच्या बिया आम्ही पेरलेल्या बियांमध्ये समाविष्ट आहेत.
आम्ही काही वनस्पतींच्या बिया पेरल्या, त्याचे बिया शेंगा लावण्याचे ऋतू अर्थात वेगळे असतात. त्यामुळे सर्व बिया गोळा करण्याचा एकाच वेळी ताण पडत नाही. या महिन्यात या, तर पुढचे दोन महिने त्या असं चालू असतं. जसे जसे आपण झाडं, बिया यांच्यात काम करू लागतो तशी झाडांकडे बघण्याची दृष्टी बदलत जाते.
आधी आम्ही उन्हाळ्यात कधी एकदा बहाव्याला फुलं येतात अशी वाट बघायचो. फुलं आली कीच बघायचो. पण जसं आम्ही टेकडीचं काम सुरू केलं तसं आम्ही पावसाळ्यात हिवाळ्यात येणाऱ्या शेंगांची वाट जास्त आतुरतेनी बघायला लागलो. मी पानं, खोड, फांद्या यांचं निरीक्षण करू लागलो. बहावा अर्थातच उन्हाळ्यात फुलतो आणि पावसाळ्यात त्याला शेंगा येतात. पण त्या हिरव्या, कच्च्या असतात. सप्टेंबरमध्ये त्या वाळायला सुरुवात होते. लांब सळई किंवा जाड काठी घेऊन शेंगेच्या देठाशी मारावी लागते. मग शेंग सहजरीत्या खाली पडते. एका शेंगेत कप्पे कप्पे असतात आणि एका कप्प्यात एक बी, काही कप्प्यांमध्ये बियाच नसतात. एका शेंगेत सुमारे शंभर ते दोनशे बिया निघतात. बाकी ठिकाणी चीक असतो. त्याचा वास फार घाण असतो. आधी आम्ही फक्त शेंगा टाकायचो, मग कळलं की शेंगेचा चीक बिया उगवून येण्यासाठी महत्त्वाचा आहे. मग चीक तर काढून स्वतंत्र टाकू शकत नाही! मग आम्ही दगडांनी शेंगा फोडून, शेंगांचे तुकडे करून, बिया चिकासकट टाकू लागलो.
उन्हाळा जवळ आल्याने आम्ही जास्तीत जास्त पाण्याच्या बाटल्या सॅकमध्ये कोंबून टेकडीवर पाणी घालू लागलो. ते अगदी कमी होतं खरं... मार्च पर्यंत आम्ही ३० का ४० लीटर पाणी घालू शकलो फक्त आणि मग आम्ही पेरलेल्या पैकी दोन प्रकारची रोपं उगवून आली – एक सहजासहजी येतं आणि एक सहजासहजी येत नाही. चिंच आणि बहावा. चिंचेला खायच्या चिंचा लागतात त्या शेंगा असतात. चिंचोके बहाव्यासारखे गरासकट टाकावे लागत नाहीत. चिंचेला संयुक्त पानं असतात. चिंचेला अरबी भाषेत तमर-ए-हिंद म्हणतात. अरबीमध्ये म्हणजे तमर म्हणजे खजूर... चिंच आफ्रिकेतून थेट भारतात आली, भारत पूर्वी आफ्रिकेचा भाग होता. अरबांकडे खजूर असायचा. चिंच त्यांना खजुरासारखी वाटली. म्हणून तमर-ए-हिंद (हिंदुस्तानी खजूर)...
आमच्या सोसायटीच्या हद्दीच्या लगत, बाहेर एक चिंचेचा डेरेदार वृक्षराज आहे. चिंचा वेचून आम्ही छान पैकी मिटक्या मारून चिंचोके टेकडीवर टाकतो. हे अगदी सोपं आहे. तुमच्याकडे तोंड, हात, पाय आणि पिशवी असली की पुरे! हातात पिशवी धरायची, पायाने चालत जायचं, हातानी चिंचा वेचायच्या, पायांनी चालत यायचं, तोंडानी चिंचा खायच्या आणि पिशवीतून घेऊन हाताने टेकडीवर बिया टाकायच्या! झालं.
(क्रमशः)