टेकडीच्या निमित्ताने १२: कणसं

टेकडीच्या निमित्ताने १२:
कणसं
लेखन व चित्रे: ओजस फाटक,(इयत्ता ७वी, अक्षरनंदन)

याधीचे भागः एक । दोन | तीन | चार | पाच | सहा | सात | आठ | नऊ | दहा | अकरा

 

कणसं पटपट उगवतात असं मी ऐकलं होतं, पण अनुभवलं नव्हतं. पण मी कधी मुद्दाम याचा अनुभव घ्यायचा प्रयत्नही केला नाही.

घरातले कीड लागलेले तांदूळ, ज्वारी, बाजरी आम्ही टेकडीवर टाकू लागलो. ग्लिरीसिडीया कापण्याचं काम चालूच होतं. टेकडीवर वनविभागाने पाट्या लावल्यात - इथल्या पक्ष्यांबद्दल विशेषतः, पण खरंतर इथल्या पाट्यांवर ज्या पक्ष्यांबद्दल लिहिलेलं आहे त्यातलं काही सपशेल खोटं वाटतं मला. पक्ष्यांबद्दल चुकीचं लिहिलेलं नाही, अशा पक्ष्यांबद्दल लिहिलेला आहे ते इथे आहेत असं मला मुळीच वाटत नाही. जे इथे दिसतच नाहीत त्यांची माहिती देऊन काय उपयोग?

काही दिवसांनी आम्ही पहिल्या मंदिरापर्यंत चढत गेलो आणि उजवीकडच्या भिंतीलगतचा चाफा अजागळ दिसत होता. फांद्याबिंद्या कापलेला. पायथ्याजवळ च्या ग्लिरीसिडीयाचीही नासधूस केलेली दिसत होती.

बरोबर विदेशी वनस्पतींची नासधूस झाली होती. आम्ही विचार केला की या लोकांना देशी-विदेशी बरोबर माहीत दिसतंय. पण ती इथे असायला काहीच हरकत नाही; विशेष हा चाफा तर मुळीच हरकत नाही. कारण जोपर्यंत ते भिंतीपलीकडे असलेल्या संरक्षित रानात जात नाही तोपर्यंत त्याचा काही धोका नाही. आज आम्ही खास निमित्त घेऊन टेकडीवर आलो होतो. काम करायला नाही, प्रवास करायला. शाळेत छोट्या मुलांचं संमेलन होतं त्याकरता वाहनानी जाण्याऐवजी आम्ही टेकडी पार करायची ठरवली. परमहंस नगर कडून चढलो – मारुती – म्हातोबा - वेताळबाबा असे चालत आम्ही पत्रकार नगरच्या गल्लीत उतरलो आणि मग रस्त्यावरूनच शाळेला पोचलो. दोन तास लागले. तेव्हा टेकडीच्या प्रवासात आम्हाला अजून एक गोष्ट खटकली. वनविभागाच्या पाट्यांवर कुणीतरी चिखल फासला होता, पाट्या चिखलात बरबटल्या होत्या.

पण आत्ता तर पावसाळा नव्हता. त्यांनी बहुधा हा चिखल बनवला असावा मातीत पाणी घालून! ही कुणीतरी हरामखोर, उडाणटप्पू, रिकामटेकडी, मवाली पोरं असावीत असा मी अंदाज बांधला. क्षणभर मला वाटलं की सर्व पायथ्यांशी एक पाटी लावावी की “या टेकडीवर उपटसुंभांना येण्यास मनाई आहे.” पण काय फायदा? कोणताही उपटसुंभ आपण उपटसुंभ असल्याचं कबूल करेल असे वाटत नाही. याच हरामखोरांचे अजून कारनामे आम्हाला पुढच्या वेळी सापडले. आम्ही ओतलेल्या बाजरीची कणसे उगवली होती ती त्यांनी तोडून टाकली! आता मात्र माझ्या मनात दुष्ट विचार आले. त्यांनी ज्याप्रकारे कणसं तोडून टाकली त्याप्रमाणे त्यांचे हात-पाय तोडून त्यांना किडेवाल्या घाण पाण्यात बुचकळून, त्यांची भयंकर काहीतरी अवस्था करूनच त्यांचा कडेलोट करावा...

पण हे करून काय होणार? आपण वेगळं काहीतरी केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? काहीतरी भन्नाट केलं पाहिजे! पण काय? एकानी दुसऱ्याला मारल्यावर आपण काय करतो? हां! मारणाऱ्यास शिक्षा करतो, मार खाणाऱ्याला बरं करतो! शिक्षाबिक्षा नको, पण कणसाला कसं बरं करणार?

मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला. दोन वनस्पतींचं कलम करतात तसंच करू! खालचा भाग अन तुटलेला वरचा भाग बांधून टाकला तर? आम्ही तसं करून बघितलं. बांधायला काही नसल्याने आम्ही पानांनी बांधायचा प्रयत्न करत होतो. आभा म्हणाली, “बांबूचं पातं आण.” मी आणायला गेलो आणि पातं उचकटताना उजव्या हातात मी नकळत पकडून ठेवलेली बांबूची सडपातळ काडी चुकून डाव्या हाताच्या अंगठ्यात घुसली. ती निघाली. भरपूर रक्त आलं, रक्ताने हात लाल झाला! पण डाव्या अंगठ्यावरचा एक इंची व्रण अजूनही आमच्या कणसं लावण्याचा पुरावा आहे.

(लेखात अपशब्द वापरल्याबद्दल क्षमस्व.)

(क्रमश:)