टेकडीच्या निमित्ताने १३: झाडं

टेकडीच्या निमित्ताने १३:
झाडं
लेखन व चित्रे: ओजस फाटक,(इयत्ता ७वी, अक्षरनंदन)

याधीचे भागः एक । दोन | तीन | चार | पाच | सहा | सात | आठ | नऊ | दहा | अकरा | बारा

 

कांचनासारखीच बदामाच्या आकाराची असणारी छोटी पानं म्हणजे आपट्याची पानं या पद्धतीने मी आपटा ओळखू लागलो. आपट्याला शेंगा आल्या तेव्हा आम्ही त्या तोडून घेऊ लागलो, खाली पडलेल्या वेचू लागलो. घरी आणून खलबत्त्याने शेंगा फोडून बिया काढून त्या टेकडीवर पेरायचा डाव होता. पण मग कुटताना असं लक्षात आलं, की ज्या शेंगा झाडावरून तोडलेल्या आहेत त्यांच्यात किड्यांची घरं आहेत! त्यामुळे किड्यांना त्रास द्यायचा नसेल, तर फक्त खाली पडलेल्या शेंगाच आणणं योग्य ठरेल. प्रत्येक शेंग वेगळी असते, त्यामुळे प्रत्येक शेंग बत्त्याने वेगळ्या प्रकारे फोडावी लागते. पावसाळ्यात आणि साधारण नोव्हेंबरपर्यंत जमिनीतील आर्द्रता जास्त असल्यामुळे बिया जमिनीखाली पुरण्याची गरज कमी असते. मात्र सुमारे डिसेंबर ते साधारण ग्रीष्म ऋतू पर्यंत ( मे-जून पर्यंत ) मात्र शक्यतो जमिनीवर नुसत्या टाकू नयेत.

दसऱ्याला आपट्याची पानं फुकटची 'सोनं' म्हणून घेऊन जातात. अजिबात आवडत नाही मला हे! सोनं म्हणे सोनं! दिसलं झाड, की घेतलं ओरबाडून! असं करू नये. मी तर म्हणेन, की तुम्हाला जर पाच पाने द्यायची असतील, तर एक पडलेली शेंगही न्या आणि त्यातल्या बिया काढून तुमच्या घराजवळच्या टेकडीवर पेरा.

तसंच तुमची आंबे, जांभूळ, लिंबं, संत्री, चिंचा, कारली, पेरू, भोपळे, कलिंगड, काकड्या, बोरं खाऊन झाली, की फक्त बिया साठवायच्या. पुरेसा साठा झाला, की दर आठवड्यात फक्त सोमवार ते शुक्रवार टेकडीवर जायचं आणि प्रत्येक दिवशी फक्त पंचवीस बिया पेरायच्या बस्स! म्हणजे दर आठवड्याला तुम्ही १२५ बिया पेरता; महिन्याभरात ५००! आणि हेच गुणोत्तर कायम राखल्यास १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या काळात तुम्ही सुमारे तब्बल ६ हजारांहून जास्त बिया पेरता. याहून जास्त जमत असेल तर उत्तमच. पण हे एवढं जरूर करण्याचा सल्ला.

बिया पेरण्याचे परिणाम वर्षभरात तुम्हाला दिसून येतील. रोपं उगवतील. कमाल सव्वा वर्ष लागेल. आम्ही केलेल्या कामापैकी आंबा, चिंच, बहावा, मोह, पेरू या वनस्पतींची रोपं फळ म्हणून मिळाली. अजून जास्त झाडं येतील अशी आशा आणि खात्री आहे. ऐन आम्ही पावसाळ्यात पेरला. ऐकलं होतं की ऐनाला पाणी, आर्द्रता यांची खूप गरज असते. त्यामुळे आम्हाला वाटलं की ऐन आला तर पावसाळ्यातच नाहीतर येणार नाही. पावसाळ्यात काही आला नाही, पण गंमत म्हणजे लॉकडाऊन काळात टेकडीवर जाऊन पाहिलं तर ऐनाची रोपं उन्हाळ्यात उगवून आलेली. सध्या आम्ही टेकडीवर जात आहोत.

टेकडीवरच्या वाढलेल्या गवताखाली कामगारांनी लपवलेल्या पिशव्या सापडत आहेत. अक्षरशः २-३ दिवसात आम्ही दोनशेहून अधिक पिशव्या खाली नेल्या. एकदा आम्हाला योगायोगाने टेकडीवर भेटलेल्या ओळखीच्या लोकांची मदत मिळाली म्हणून बरं.

शिवाय मोहाचं पहिलं एकुलतं एक रोपही उन्हाळ्यातच आलेलं आढळलंय. कुणास ठाऊक त्याला फुलं, फळं, बिया कधी यायला लागतील! घरी आम्ही रोपं तयार करतोय मोहाची, त्यापेक्षा हे टेकडीवरचं रोप भरभर वाढतंय.

एक गोष्ट मला तीव्रतेने वाटते, ती म्हणजे, झाडाला फळं येतात; त्या फळांचा गर हा झाडाला उपयोगी नसतो. बिया येणं ही झाडाची मूलभूत गरज असते. झाडाच्या दृष्टीने फळं / शेंगा बियांकरता असतात, प्राण्यांकरता नाही. प्राणी फळे खातील आणि बिया टाकतील हा फळांमागचा हेतू आहे. त्यामुळे झाडांच्या दृष्टीने फळं ही प्राण्यांसाठी नसून ती, स्वतःच्या बियांसाठी असतात.

समाप्त